सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘१९.१०.२०२१ या दिवशी माझा तिथीनुसार ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी मी परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि साधक यांची कृपा अन् अमृतमय अन् अवर्णनीय प्रीती अनुभवली. मी ती येथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकार्यात अखंड रहाण्याची पू. वटकरकाका यांची आंतरिक इच्छा पूर्ण करणे
‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आणि त्यांच्याकडे सेवेसाठी जाऊ लागल्यावर त्यांनी माझा वाढदिवस साजरा करण्यास आरंभ केला. ‘त्यांच्याच कृपेने माझ्या जीवनातील ७५ वर्षे कधी सरली ?’, ते मला जाणवलेही नाही. ईश्वरेच्छेने आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असतांना जीवनाचे सार्थक करण्यासाठी मला परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा लाभली.
सृष्टीच्या निसर्गचक्रात काळ जितक्या सहजतेने अखंड वहात आहे, तितक्याच सहजतेने गुरुकार्यात अखंड रहाण्याची माझी आंतरिक इच्छा परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्ण करत आहेत.
२. ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांची कृपा अन् साधकांची प्रीती अनुभवणे
२ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवल्याने भावजागृती होऊन कृतज्ञता व्यक्त होणे : १९.१०.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पहिल्या पानावर ‘माझे छायाचित्र आणि ७५ व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम !’, असे छापून आले होते. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या आतील पृष्ठावर ‘साधकांना माझी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, कविता, छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली होते. ‘आपत्काळ चालू झाला असतांना आणि ‘राष्ट्र अन् धर्मजागृती’ या विषयांवरील लिखाणाला प्राधान्य असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये माझ्याविषयी एवढे लिखाण प्रसिद्ध होणे, म्हणजे ‘माझ्यासारख्या साधकावर परात्पर गुरु डॉक्टरांची असीम कृपाच आहे’, या विचाराने माझी भावजागृती होऊन गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.
२ आ. वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याचे शिकवून आनंद दिल्याचे जाणवणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पहिल्या पानावरील माझ्या छायाचित्राखाली ‘सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत’, ही सूचना होती. ती वाचल्यावर ‘मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद मिळत आहे’, असे जाणवले, तसेच ‘ज्या साधकांनी सूचना वाचली असेल, ते मला मानस नमस्कार करत आहेत आणि ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायाने आम्ही आपापसात चैतन्यरूपी आशीर्वादाची देवाण-घेवाण करत आहोत’, असे वाटले. यावरून परात्पर गुरु डॉक्टर आम्हा साधकांना ‘मानसिक स्तरावर न रहाणे, औपचारिकतेत वेळ न घालवणे आणि स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, हे प्रत्यक्ष शिकवत आहेत अन् आनंद देत आहेत’, याची मला जाणीव होऊन माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे संत यांची कृपा अनुभवतांना आध्यात्मिक स्तरावरील चैतन्यमय सन्मान सोहळ्यामुळे धन्य झाल्यासारखे वाटणे : मी रहात असलेल्या देवद आश्रमातील खोलीमध्ये दुपारी अकस्मात् सद्गुरु आणि संत असे एकूण ६ जण आले. एवढ्या संतांचे दर्शन झाल्याने माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी मला भेटवस्तू दिल्या आणि त्या माझ्या पाया पडल्या. तेव्हा मी स्तब्ध झालो. वय सोडल्यास त्या माझ्यापेक्षा आध्यात्मिक आणि सर्वच क्षेत्रांत ज्येष्ठ अन् श्रेष्ठ आहेत, तरीही त्या माझ्या पाया पडल्या. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांची लीला आणि कृपा अनुभवली अन् माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी मी सनातनच्या संतांची गुणवैशिष्ट्ये आणि कृपा अनुभवत होतो. थाटमाटातील कार्यक्रमापेक्षा या आध्यात्मिक स्तरावरील चैतन्यमय सन्मान सोहळ्यामुळे मी धन्य झालो. तेव्हा मला वाटले,
‘सनातनचे साधक, संत आणि सद्गुरु दिसती वेगळाले ।
परि ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्वस्वरूपाशी मिळाले ।
त्यांचा चरणरज होऊनी मी आनंद अन् चैतन्य अनुभवले ।।’
२ ई. समाजात वाढदिवसानिमित्त व्यक्तीला मूल्यवान भेटवस्तू देतात आणि पुष्कळ पैसे व्यय करून कार्यक्रम आयोजित करतात; मात्र ‘श्री. तुकाराम लोंढे या आध्यात्मिक मित्राने स्वतःच्या अनमोल आयुष्याची वर्षे भेट म्हणून देणे’, हे केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच शक्य आहे’, याची जाणीव होऊन भावजागृती होणे : सकाळी मला माझे आध्यात्मिक मित्र श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचा भ्रमणभाष आला. ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या वाढदिवसानिमित्त मला पुष्कळ आनंद होत आहे. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. तुमचे वय झाले आहे; म्हणून मी तुम्हाला माझे राहिलेले आयुष्य देतो.’’ ‘समाजात लोक वाढदिवसानिमित्त मूल्यवान भेटवस्तू देतात, पुष्कळ पैसे व्यय करून थाटामाटाने कार्यक्रम आयोजित करतात; पण ‘स्वतःच्या अनमोल आयुष्याची वर्षे भेट म्हणून कोण देऊ शकते ?’, हे केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच शक्य आहे’, याची मला जाणीव होऊन मी परात्पर गुरु डॉक्टर आणि श्री. तुकाराम यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. ‘भावावस्थेमुळे काय बोलावे ?’, हे मला सुचत नव्हते.
३. स्वतःची काहीच पात्रता नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पात्र बनवून सर्वकाही दिले असल्यामुळे जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद मिळणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासाठी स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर काही करायचे किंवा मला काही द्यायचे शेष ठेवलेले नाही. माझी घेण्याची काहीच पात्रता नसतांना त्यांनी मला पात्र बनवून सर्वकाही दिले आहे. आता मला माझे जीवन कृतार्थ आणि सार्थक झाल्याचा आनंद मिळत आहे.
४. प्रार्थना
यापुढेही ‘माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी मला केवळ त्यांच्या चरणी ठेवावे’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१०.२०२१)