कराड येथील कृष्णामाई घाटावर पू. विठ्ठलस्वामी यांना आढळून आली १८ व्या शतकातील गजलक्ष्मीची मूर्ती !

सामाजिक बांधिलकी जपत मूर्ती केली संग्रहालयाकडे सुपुर्द !

प्रतिकात्मक छायाचित्र

कराड, १ मार्च (वार्ता.) – वडगाव येथील जयरामस्वामी मठाचे मठपती पू. विठ्ठलस्वामी वडगावर हे कराड येथील प्राचीन विष्णु-लक्ष्मी मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेसाठी आले होते. कृष्णामाई घाटावर त्यांना एक पुरातन गजलक्ष्मीची मूर्ती आढळून आली. त्यांनी याविषयी सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क साधला, तसेच सामाजिक बांधिलकी जपत ही मूर्ती त्यांनी शिंदे यांच्याकडे सुपुर्द केली. त्यांनी ही मूर्ती १८ व्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गजलक्ष्मी देवीची मूर्ती पद्मासनात बसलेली असून चतुर्भुजा आहे. एका हातात कमळ आणि दुसर्‍या हातात अभयमुद्रा आहे. गजलक्ष्मीच्या मूर्तीला ऐश्वर्याचे प्रतिक मानले जाते. प्राचीन नाणेघाटात भग्न अवस्थेत ही मूर्ती आढळून आली. कौसंबी नाण्यावर ही देवता कोरलेली आढळते. इसवी सनाच्या ६-७ व्या शतकातील ताम्रपटावर गजलक्ष्मीयुक्त राजमुद्रा कोरलेल्या आढळतात. कलचुरी राजाच्या काळापर्यंत अशा मुद्रा प्रचलित होत्या.