रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

रशियाच्या सैन्य ताफ्याचे उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र

कीव (युक्रेन) – युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी युद्धाने अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील  सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत. हे शहर खारकीव आणि कीव या शहरांच्या मध्ये आहे. रशियाचे सैन्य वेगाने युक्रेनची राजधानी कीवकडे आगेकूच करत आहे. रशियाने आक्रमणाची तीव्रता वाढवली आहे. रशियाचा सैन्य ताफा ६४ किमी लांब असल्याचे उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून समोर आले आहे. रशियाने युक्रेनमध्ये पाठवलेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कुमक आहे.

रशियाने टाकला खारकीवच्या मुख्य सरकारी कार्यालयावर बाँब !

रशियाने राजधानी कीवनंतर सर्वांत महत्त्वाचे शहर असणार्‍या खारकीवच्या मुख्य सरकारी इमारतीवर बाँब टाकला आहे.

रशियाने युक्रेनवर टाकला बंदी असलेला ‘व्हॅक्युम बाँब’ !

रशियाने २८ मार्चच्या रात्री युक्रेनवर ‘व्हॅक्युम (थर्मोबॅरिक) बाँब’द्वारे आक्रमण केले आहे, असा दावा युक्रेनने केला आहे. या आक्रमणात किती जणांचा मृत्यू झाला किंवा किती हानी झाली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘जिनेव्हा करारा’नुसार या बाँबचा वापर करण्यावर बंदी आहे. याला ‘फादर ऑफ ऑल बाँब’ असेही म्हणतात. थर्मोबॅरिक शस्त्रे पारंपरिक दारूगोळा वापरत नाहीत. हे उच्च-दाबाच्या स्फोटकांनी भरलेले आहेत. हे शक्तीशाली स्फोटामुळे आसपासच्या वातावरणातील प्राणवायु शोषून घेतले जातात. थर्मोबेरिक बाँबची गणना जगातील सर्वांत घातक आण्विक शस्त्रांमध्ये केली जाते. या बाँबची निर्मिती रशियानेच केलेली आहे. याला ‘एयरोसोल बाँब’ असेही म्हणतात. हा अतिशय धोकादायक बाँब आहे. ७ सहस्र १०० किलो वजनाचा हा बाँब वापरल्यावर इमारती आणि माणसे यांचा नाश होतो. यापूर्वी रशियाने वर्ष २०१६ मध्ये सीरियावर या ‘व्हॅक्युम बाँब’चा वापर केला होता. या बाँबच्या स्फोटामुळे ‘अल्ट्रासोनिक शॉकवेव्ह’ बाहेर पडतात आणि अधिक विनाश घडवून आणतात.

अमेरिकेच्या ‘मदर ऑफ बाँब’ला प्रत्युत्तर म्हणून रशियाचा ‘फादर ऑफ ऑल बाँब’ !

प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकेने वर्ष २००३ मध्ये ‘मदर ऑफ ऑल बाँब’ बनवला होता, ज्याचे नाव जीबीयू-४३/बी आहे. त्याची ११ टन ‘टीएन्टी’च्या शक्तीने स्फोट करण्याची क्षमता आहे, तर रशियाचा ‘व्हॅक्युम बाँब’ ४४ टन ‘टीएन्टी’च्या शक्तीने स्फोट करण्यास सक्षम आहे. अमेरिकेने बनवलेल्या बाँबला प्रत्युत्तर म्हणून रशियाने ‘फादर ऑफ ऑल बाँब’ बनवला. हा बाँब ३०० मीटरच्या परिघात हानी करू शकतो. हा बाँब लढाऊ विमानांद्वारे टाकला जातो आणि त्याचा हवेमध्ये स्फोट होतो आणि हवेतील प्राणवायु शोषून घेतो. प्रचंड उष्णता निर्माण होऊन मोठा स्फोट होतो. त्यामुळे सामान्य स्फोटापेक्षा अधिक काळ स्फोटाची लहर निर्माण होते. मानवी शरिराचे वाफेत रूपांतर करण्याची क्षमता या बॉम्बमध्ये आहे. लहान आण्विक शस्त्राप्रमाणेच तो प्रभाव निर्माण करतो. या शक्तीशाली बॉम्बमुळे अण्वस्त्रांप्रमाणे पर्यावरणाला कोणताही धोका नाही.

मानवाधिकार संघटनांकडून रशियाला विरोध

अमेरिकेतील युक्रेनचे राजदूत आणि मानवाधिकार गट यांनी सांगितले की, रशिया युक्रेनवर ‘व्हॅक्युम बाँब’ आणि ‘क्लस्टर बाँब’द्वारे आक्रमण करत आहे. मानवाधिकार संघटना ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ आणि ‘ह्युमन राइट्स वॉच’ यांनी रशियालाच्या या कृतीला विरोध करत म्हटले आहे की, रशियाचे सैन्य मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित क्लस्टर युद्धसामग्री वापरत आहे. रशियाने हे धोकादायक बाँब ईशान्य युक्रेनमधील प्रीस्कूल शहरावर टाकले, जेथे नागरिक आश्रय घेण्यासाठी जमले होते.

अमेरिकेनेही अण्वस्त्रे सज्ज ठेवली !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांचा अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र सिद्ध ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही अण्वस्त्र सिद्ध ठेवण्याचा आदेश दिला आहे. बायडेन यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटगॉनला सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. बायडेन यांनी म्हटले, ‘युरोपचे रक्षण करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. अण्वस्त्रयुद्धामुळे अमेरिकेला घाबरण्याचे कारण नाही. या आक्रमणाला अमेरिका उत्तर देऊ शकते.’