चाणक्याविना चंद्रगुप्ताला आणि समर्थांविना शिवाजीला कोण विचारेल ? – राज्यपाल कोश्यारी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याविना चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांविना शिवाजीला कोण विचारेल ? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूंचे मोठे स्थान असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले, ‘तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे.’ आता या देशाची परंपरा आहे, गुरु आहे, तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे ‘मी जिंकलोय, राज्याची स्थापनाही झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो’, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना सांगितले; पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचे सांगितले. हा भाव अशा सद्गुरूंकडून मिळतो. समर्थांचा जो भारत, समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात केले.


समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचा पुरावा नाही ! – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

सुप्रिया सुळे

राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांची भेट झाल्याचा पुरावा नाही’, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने १६ जुलै २०१८ या दिवशी दिलेल्या निकालानुसार तपास अधिकार्‍यांनी इतिहासतज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही.’’


ब्राह्मण शिक्षकांचे नाव स्वीकारणारे डॉ. आंबेडकर यांना त्यांचे शिक्षक ब्राह्मण होते म्हणून हटवणार का ? 

करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांचे ट्वीट !

श्री. अजयसिंह सेंगर

समर्थ रामदासस्वामी छत्रपती शिवराय यांचे गुरु होते किंवा नाही या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी पुढील ट्वीट केले आहे, ‘डॉ. आंबेडकरांचे गुरु ब्राह्मण होते, त्यांनाही तुम्ही हटवणार का ? ब्राह्मण गुरु होते म्हणून डॉ. आंबेडकर घडले. ब्राह्मण गुरूंचे आडनाव त्यांनी स्वीकारले. ब्राह्मण गुरु भेटले, तेच महापुरुष बनले, हे सत्य. राज्यपाल कोश्यारीजींचे ते अभ्यासू वक्तव्य १०० टक्के खरे आहे.’

  • चाफळच्या श्री शिवसमर्थ ट्रस्ट यांच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या ‘श्री शिव-समर्थ भेट’ या पुस्तकात पृष्ठ क्र. ११ वर राज्यपालांनी उल्लेखलेल्या आशयाचाच मजकूर आहे. याचा संदर्भ कोश्यारी यांनी घेतला, असे म्हणण्यास वाव आहे !

  • समर्थ वाङ्मयाचे गाढे अभ्यासक कै. पू. सुनील चिंचोलकर यांच्या ‘पत्र समर्थांची’ या पुस्तकात छत्रपती शिवरायांनी समर्थ रामदासस्वामींना, तसेच समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवरायांना लिहिलेली पत्र प्रसिद्ध केली आहेत. ‘श्री सद्गुरुवर्य श्री सकलतीर्थरूप श्री केवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी, स्वामींचे सेवेसी’ असा यातील ‘चाफळची सनद’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पत्राचा मायना आहे.

  • नगरमध्ये वर्ष २००८ मध्ये समर्थ प्रशालेने छत्रपती शिवाजी महाराज हे रामदासस्वामींच्या पाया पडतांनाचा जिवंत देखावा सादर केल्यावरून संजीव भोर यांनी शाळेच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवला. शाळेने तो गुन्हा रहित करण्यासाठी याचिका केली असता ‘समाजातील काही घटकांचा याला विरोध आहे आणि त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने’ न्यायालयाने गुन्हा रहित करण्यास नकार दिला आणि या चित्राला काही पुरावा किंवा आधार नाही असा निष्कर्ष काढला.