भरभरून कृपावर्षाव केला, उपमाच नाही या गुरुमायेला ।
प्रत्येक साधकावर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉक्टर आठवले !
परात्पर गुरुदेवांनी प्रत्येक साधकावर भरभरून कृपा केली आहे; म्हणून ‘त्यांचे जीवनातील असणे, हा आपला एकमेव आधार आहे’, असा अनुभव आपण सर्व जण घेतो. ‘गुरुदेवांमुळे जीवनप्रवाह कसा पालटतो ?’, हे प्रकर्षाने जाणवते. अशा गुरुदेवांप्रती कृतज्ञता शब्दांत व्यक्त करणे अशक्यच आहे. याविषयी विचार माझ्या मनात चालू होते. तेव्हा मला माझे आतापर्यंतचे जीवन आठवले. जीवनात मला सर्व काही मिळाले होते. मी सुखी होते, तरी माझ्या मनाची स्थिती आनंदी नव्हती. त्यात परात्पर गुरुदेवांनी आमूलाग्र पालट केला; म्हणून त्यांनीच माझ्याकडून शब्दबद्ध करून घेतलेली कविता त्यांच्याच चरणी समर्पित करते.
भरभरून मजवरी कृपावर्षाव केला ।
उपमाच नाही या गुरुमायेला ।। धृ. ।।
आयुष्याच्या प्रश्नांत हा जीव गोंधळलेला ।
काय हवंय स्वतःला हेही न कळलेला ।।
कंटाळले होते मी मायेतील असहाय्यतेला ।
तेव्हा गुरुदेवच धावले माझ्या साहाय्याला ।। १ ।।
अंधार असलेल्या खोलीत, सूर्यप्रकाशाचा कवडसा यावा ।
असाच माझ्या जीवनात गुरुदेवांनी प्रवेश केला ।
अन् तेजाने तयांच्या सारा अंधःकार मिटला ।। २ ।।
लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला ।
तयांच्या कृपेनेच जीवनदीप हा उजळला ।।
भावकिरणांनी तो तेजोमय झाला ।
आनंदासह हास्याचा फुलोरा फुलला ।
मग नवजीवनाला आकार मिळाला ।। ३ ।।
गुरुदेव, शब्दच नाहीत मजपाशी कृतज्ञतेला ।
गुरुदेव, खरंच तुम्ही कसे आहात ।।
जे माझे असूनी सार्यांचेच आहात ।
सार्यांचे असूनही केवळ माझेच आहात ।
असे या जगती गुरुदेव आपणच आहात ।। ४ ।।
– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |