ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेल्या परिणामांविषयी केलेला संशोधनात्मक प्रयोग
‘२५ आणि २६.२.२०२२ या दोन्ही दिवशी ‘ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रयोग करण्यात आले. त्यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
१. श्री. प्रदीप चिटणीस यांनी सप्त स्वरांचे गायन चालू केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती
१ अ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘शुद्ध स्वर’ (टीप १) गायल्यावर साधकांवर झालेले परिणाम
टीप १ – जेव्हा सातही स्वर आपल्या मूळ जागेवरच (त्यांच्या मूळ कंपनस्थानी (frequency ला)) असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’ असे म्हणतात.
१. काही साधकांना प्रयोगापूर्वी डोक्याभोवती जडपणा जाणवत होता, तो प्रयोगानंतर नाहीसा झाला आणि त्यांना हलकेपणा जाणवला.
२. हे स्वर ऐकतांना काही साधकांना अनाहतचक्रावर स्पंदने जाणवून हलकेपणा जाणवला.
३. एका साधिकेला ‘श्री. चिटणीसकाका यांचे त्या ठिकाणी अस्तित्व न जाणवता त्यांच्या जागी केवळ संगीतच उरले आहे’, असे जाणवत होते.
(‘त्या वेळी श्री. चिटणीसकाकांचे ध्यान लागले होते. काकांमध्ये अहं अत्यल्प असल्याने गातांना त्यांचे अस्तित्व नसते, हे साधिकेने अनुभवले.’ – संकलक)
१ आ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘तीव्र स्वर’ (टीप १) गायल्यावर साधकांवर झालेले परिणाम
टीप १ – जो स्वर आपली मूळ जागा सोडून अधिक कंपनस्थितीला जातो; परंतु पुढील स्वरापेक्षा अल्प कंपनसंख्येला असतो, त्याला ‘तीव्र स्वर’, असे म्हणतात.
१. हे स्वर ऐकतांना दैवी सुगंधाची अनुभूती येऊन जिभेवर गोडवा जाणवला.
२. ‘तीव्र म’ या स्वरामुळे प्रयोगातील काही जणांना भगवान शिवाचे दर्शन झाले.
३. तीव्र स्वर ऐकल्यावर साधकांना ‘सर्व देहांची शुद्धी होत आहे’, असे जाणवले. या स्वरातील चैतन्यामुळेही साधकांना नंतर हलकेपणा जाणवला.
४. श्री. चिटणीसकाकांनी ‘तीव्र म’ स्वरसंगती गायल्यावर त्रास नसणार्या साधकांना ‘तीव्र म’ या स्वरात मारक शक्ती जाणवली.
५. ‘तीव्र म’ हा स्वर समष्टीप्रधान असल्याचे जाणवले.
१ इ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘कोमल स्वर’ (टीप २) गायल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती
टीप २ : जो स्वर आपली मूळ जागा सोडून खालच्या कंपनस्थितीला येतो; परंतु मागील स्वरापेक्षा अधिक कंपनसंख्येचा असतो, त्याला ‘कोमल स्वर’, असे म्हणतात.
१. प्रयोगात सहभागी काही साधकांना ज्योतीचे दर्शन झाले.
२. काही साधकांना अनाहतचक्र, तसेच अधिक प्रमाणात आज्ञाचक्र यावर संवेदना जाणवल्या.
३. या स्वरांच्या गायनाने साधकांनी शांती अनुभवली. साधक प्रयोग संपल्यावरही काही क्षण त्याच अवस्थेत होते.
४. श्री. चिटणीसकाकांनी गायलेले कोमल स्वर ऐकल्यावर या स्वरांत निर्गुण तत्त्व अधिक जाणवले.
२. निष्कर्ष
अ. सर्व शुद्ध स्वरांची स्पंदने अनाहतचक्रावर जाणवतात. तसेच ‘हे स्वर ऐकल्यावर हलकेपणा जाणवणे’, हे शुद्ध स्वरांचे सगुण-निर्गुण स्वरूप दर्शवते.
आ. ‘तीव्र म’ स्वरातून मारकता अधिक प्रक्षेपित होते. त्यामुळे साधकांनी या प्रयोगात शक्तीची अनुभूती घेतली.
इ. कोमल स्वर हे निर्गुणाकडे नेणारे असल्याने साधकांनी गाढ शांतीची अनुभूती घेतली, हे प्रयोगात दिसून आले. ‘कोमल स्वर मनुष्याच्या वरच्या चक्रांवर, म्हणजे अनाहत आणि आज्ञा चक्रांवर अधिक परिणाम करतात’, हेही यातून स्पष्ट होते.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |