राज्यातील आयुर्वेद रुग्णालये शहरापासून दूर असल्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची वानवा !
ऋषिमुनींनी सिद्ध केलेल्या आयुर्वेद उपचारपद्धतीचा समाजाला उपयोग व्हावा, यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णालयांना जागा देतांना ती रुग्णांना जाण्यास सोयीची व्हावी, याचा विचार होणे आवश्यक आहे. – संपादक
पुणे – महाविद्यालयापासून किंवा शहरापासून आयुर्वेद रुग्णालये दूर असल्याने तिकडे रुग्ण येत नाहीत. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य जिल्ह्यांतील आयुर्वेद रुग्णालयामध्ये रुग्णांची कमतरता भासत आहे. त्यामुळे ‘बी.ए.एम्.एस्.’ची पदवी संपादन करणार्या आयुर्वेदाच्या भावी वैद्यांना तपासण्याकरता रुग्णच मिळत नाहीत. त्यातून आयुर्वेदाच्या भावी वैद्यांना ‘प्रॅक्टिस’ किंवा ‘इंटर्नशिप’ करण्यावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ञांनी नोंदवले आहे.
आतापर्यंत आयुर्वेदाची पदवी घेतलेल्यांपैकी केवळ २ टक्केच वैद्य आयुर्वेदाची सेवा करतात. उर्वरित ९८ टक्के हे पदवी घेऊन ‘अॅलोपॅथी’ची सेवा (प्रॅक्टिस) करत असल्याचे निरीक्षण जाणकरांनी केले आहे.
महाराष्ट्रामध्ये बीड, बुलढाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया, धुळे तसेच कोकणातील जिल्ह्यांमधील आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये रुग्ण पहायला मिळत नसल्याचे प्राध्यापकांनी सांगितले आहे. राज्यामध्ये ६४ आयुर्वेद महाविद्यालये असून त्यातील केवळ २४ महाविद्यालयांमध्ये वैद्यांना रुग्ण पहाण्याची संधी मिळते. इतर महाविद्यालयातील वैद्यांना रुग्ण पहाण्याची संधी मिळत नाही. ते केवळ अभ्यास करून पदवी प्राप्त करतात, अशी स्थिती आहे. यातून केवळ शिक्षक सिद्ध होतील. त्यामुळे आयुर्वेदाच्या शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याविषयी तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. (याविषयी प्रशासनाने गांभीर्याने विचार करून रुग्णालयांमध्ये रुग्ण येण्याच्या दृष्टीने काय करू शकतो ? हे पहाणे आवश्यक आहे. – संपादक)