पुणे येथे गुंगीचे औषध देऊन अधिवक्त्या महिलेवर एका अधिवक्त्यांचा अत्याचार !
अधिवक्त्या महिलेवर अत्याचार करणारे अधिवक्ता हे वकिली क्षेत्राला कलंकच आहेत. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. उच्चशिक्षित लोक वासनेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, हे सिद्ध करणारी घटना ! यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. – संपादक
पिंपरी (जिल्हा पुणे) – एका अधिवक्त्यांनी कामानिमित्त हॉटेलवर भेटायला बोलावून अधिवक्त्या महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करून विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र, व्हिडिओ काढल्याची लज्जास्पद घटना पुणे येथे घडली आहे. या प्रकरणी अधिवक्ता अजय साताळकर आणि त्यांची मैत्रीण असलेल्या एक अधिवक्त्या, तसेच अन्य एक महिला, अशा ३ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (महिलांवरील अत्याचारात महिलांचाही सहभाग असणे लज्जास्पद आहे ! – संपादक) पिंपरी, शिवाजीनगर, वडगावशेरी, खराडी या भागात जून, जुलै २०१८ ते ३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित ३८ वर्षीय महिलेने २६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. तक्रारदार महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत आरोपीने महिलेला विविध ठिकाणी बोलावून बळजोरीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपी असलेले अधिवक्ता आणि आरोपी असलेली दुसरी महिला यांनी पीडितेला मारहाण अन् शिवीगाळ करून पीडितेचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र, व्हिडिओ तिच्या बहिणीच्या भ्रमणभाषवर पाठवले. पीडितेच्या पतीला ती छायाचित्रे दाखवून पीडितेला त्रास दिला, असे तक्रारीत नमूद केले आहे.