‘सॅफ्रॉन थिंक टँक’ या मुंबईस्थित हिंदु संघटनेच्या समान नागरी कायद्याची मागणी करणार्या ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहिमेला दीड लाख लोकांचा प्रतिसाद !
मुंबई – सिद्धांत मोहिते यांनी स्थापन केलेल्या ‘सॅफ्रॉन थिंक टँक’ या मुंबईस्थित हिंदु संघटनेने समान नागरी कायद्याची (Uniform Civil Code) मागणी करणारी एक ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे. ज्याला १६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी १ लाख ५० सहस्र लोकांचा प्रतिसाद मिळाला. दीड लाख स्वाक्षर्या हा केवळ या मोहिमेचा प्रारंभ असून या मोहिमेअंतर्गत १ कोटी स्वाक्षर्या मिळवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला आशा आहे की, माननीय पंतप्रधान आणि केंद्र सरकार या मागणीकडे लवकरात लवकर लक्ष देतील, असे सिद्धांत मोहिते यांनी सांगितले. ‘समान नागरी संहिता आणि त्याचे महत्त्व’ याविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्यही ही संघटना करत आहे.
सिद्धांत मोहिते पुढे म्हणाले की, राज्य सरकारांना भारतीय राज्यघटनेच्या ४४ व्या कलमान्वये समान नागरी कायदा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही मागणी मूलतःच घटनात्मक आहे. भविष्यात सर्व नागरिकांनी समान नागरी संहितेकडे हळूहळू आणि सहमतीने वाटचाल करणे, हे संविधान निर्मात्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्राने समान नागरी संहिता लवकरात लवकर लागू करावी.
यूनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी सबंध नाही. म्हणजेच जर समान नागरी कायदा लागू झाला, तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल. या कायद्यामध्ये प्रत्येक धर्मात त्यांच्या वैयक्तिक कायद्यानुसार विवाह, घटस्फोट, दत्तक आणि वारसा याविषयी जे काही वेगवेगळे नियम आहेत ते नियम या कायद्यात सर्व धर्मासाठी एकच असतील. लग्न आणि घटस्फोट याविषयी विविध कायद्यांमधल्या वेगवेगळ्या तरतुदींमुळे वाद निर्माण होत असून ते संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक आहे.