राज्यशासनाने मागण्या मान्य केल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण स्थगित !
मुंबई – मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य काही मागण्या यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ३ दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता. २८ फेब्रुवारी या दिवशी राज्यशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले. २८ फेब्रुवारी या दिवशी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांसह अन्य नेत्यांनी खासदार संभाजीराजे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. मराठा समाजाच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मान्य केलेल्या मागण्यांची माहिती या वेळी एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांना देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण स्थगित केले.