अणूयुद्धाचा धोका !

संपादकीय

  • रशियाची युद्धनीती आणि त्याला चीनचे समर्थन, ही भारतासाठी धोक्याची घंटा !
  • युद्धात अणूबाँबचा वापर म्हणजे जग विनाशाच्या वाटेवर असल्याचे द्योतक !
(प्रतीकात्मक छायाचित्र)

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अजूनही चालू आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीववर चढाई केल्यावर राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ‘९६ घंटे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत’, असे म्हटले होते. आता त्यांतील ७२ घंटे संपले आहेत. आता त्यांनी ‘पुढील २४ घंटे महत्त्वाचे आहेत’, असे म्हटले आहे. गेल्या ३ दिवसांपासून युक्रेनने रशियाच्या सैन्याला कीवमध्ये घुसण्यापासून रोखून धरले आहे. त्याच वेळी खारकीव या युक्रेनच्या अन्य एका शहरामध्ये रशियाच्या सैन्याने नियंत्रण मिळवले होते; मात्र नंतर युक्रेनने रशियाच्या सैन्याच्या नियंत्रणातून या शहराची मुक्तता केली आहे. रशियाला जितके सोपे वाटले होते, तितके हे युद्ध सोपे राहिलेले नाही, हेच यातून जगाच्या लक्षात आले आहे. ‘युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर १-२ दिवसांत राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की शरण येतील किंवा देशातून पळून जातील’, असे रशियाला वाटत होते; मात्र झेलेंस्की यांनी ‘मी पळून जाणार नाही, तर लढणार’, असे सांगत त्यांनी युक्रेनच्या नागरिकांना शस्त्रे पुरवून लढण्यासाठी सिद्ध केले. त्याला जनतेनेही तितक्याच राष्ट्रभक्तीने प्रतिसाद दिला आहे आणि जनता लढण्यासाठी सिद्ध झाली आहे. युक्रेनी नागरिक पेट्रोल बाँब बनवून रशियाच्या सैन्याशी लढण्यास सिद्ध झाले आहेत. युक्रेन सैन्याकडून रशियाच्या सैन्याची मोठी हानी होत आहे. रशियाची लढाऊ विमाने, रणगाडे यांना युक्रेनच्या सैन्याने मोठ्या संख्येने नष्ट केल्याचे वृत्त आहे. साडेचार सहस्र रशियन सैन्यालाही ठार करण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या शहरात घुसलेल्या रशियन सैन्याला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. युक्रेन रशियाच्या शस्त्रसामर्थ्याच्या तुलनेत पुष्कळ लहान असला, तरी तो त्याच्याकडील शस्त्रांचा परिणामकारक वापर करत आहे. विशेष म्हणजे या युद्धात युक्रेनने त्याला तुर्कस्तानकडून मिळालेल्या ड्रोनचा वापर करून रशियाच्या सैन्याला जेरीस आणले आहे. या ड्रोनने रशियाच्या अनेक रणगाड्यांना नष्ट केले आहे. युक्रेनच्या प्रत्युत्तरामुळे पुतिन यांना मोठा शह बसला आहे. कोणतेही युद्ध अधिक काळापर्यंत चालणे, हे दोन्ही देशांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. मग तो रशिया असो कि अमेरिका. रशियाने युद्ध चालू केल्याने त्याच्या देशाची थेट कोणतीही हानी होत नसली, तरी युद्धासाठीच्या शस्त्रांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. त्याचा क्षेपणास्त्रांचा साठा न्यून होत आला आहे. क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यास ३-४ मास लागतात. रशियाला क्षेपणास्त्रांसाठी लागणारा कच्चा माल फिनलँड, जर्मनी आदी देशांतून आयात करावा लागतो. या देशांनी या युद्धामुळे रशियावर निर्बंध घातल्यामुळे रशियाची या संदर्भात कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांच्या अण्वस्त्रांचा वापर करणार्‍या दलाला सिद्ध रहाण्याचा आदेश दिला आहे. याचाच अर्थ रशियाकडून युक्रेनच्या विरोधात अणूबाँबचा वापर होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांकडून म्हटले जात आहे. रशियाच्या या निर्णयानंतर या युद्धात रशियाला साथ देणार्‍या बेलारूसनेही त्याच्या राज्यघटनेत संशोधन करून अणूबाँबविषयीच्या आधीच्या धोरणात पालट केला आहे. आता तो रशियाला त्याच्या देशातून अण्वस्त्रे डागण्याची अनुमती देऊ शकणार आहे.

विनाशाच्या उंबरठ्यावर !

रशियाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने युरोपमधील त्याच्या नागरिकांना रशियात परतण्यास सांगितले आहे. त्यासाठी तो स्वतः प्रयत्न करणार आहे. रशियाच्या या निर्णयाकडेही अणूयुद्धाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. ‘रशिया युरोपवरही अणूबाँबचा वापर करण्यास मागे-पुढे पहाणार नाही’, अशी प्रत्यक्ष धमकीच पुतिन यातून अलिखितपणे देत आहेत, असाच याचा अर्थ काढला जात आहे; म्हणजे पुढील काही दिवसांत जर युद्ध थांबले नाही, वाटाघाटीतून कोणताच मार्ग निघाला नाही, तर हे युद्ध लवकर संपवून ते जिंकण्यासाठी पुतिन अणूबाँबचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. रशियाने यापूर्वीच युक्रेनमधील चेर्नाेबिल येथील अणूप्रकल्प नियंत्रणात घेतला आहे. त्यानंतर येथील किरणोत्सर्गात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. काल रशियाने युक्रेनमधील अणूकचर्‍यावर क्षेपणास्त्र डागल्याने तेथूनही किरणोत्सर्ग होऊ लागल्याचे वृत्त आहे. यातून रशियाने स्पष्ट संदेश दिला आहे, ‘आम्ही अणूयुद्ध करण्याच्या सिद्धतेत आहोत.’ आता त्याने त्याच्या अण्वस्त्रांचा वापर करणार्‍या दलाला सिद्ध राहून तेच सांगितले आहे. अशा प्रकारचा आदेश दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणूबाँबनंतर आतापर्यंत कुणीच दिला नव्हता. रशियाने तो ८० वर्षांनंतर प्रथमच दिला आहे. त्यामुळे ‘रशिया-युक्रेन युद्ध तिसर्‍या महायुद्धाचा प्रारंभ आहे’, असे आता कुणी म्हणत असेल, तर ते चुकीचे ठरणार नाही.

आता केवळ जे काही प्रतिदिन घडणार आहे, ते पहाण्याची सिद्धता आणि त्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याची सिद्धता जगाला करावी लागणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्राँन यांनी ‘हे युद्ध दीर्घकाळ चालणार’, हे स्पष्ट केले आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही तिसरे महायुद्ध नाकारलेले नाही. हे तिसरे महायुद्ध रशिया-युक्रेन यांच्यामध्ये होणार कि हे युद्ध युरोप पुरते सीमित रहाणार कि त्याचा विस्तार अन्य खंडांमध्येही होणार किंवा अन्य काही कारणामुळे ते पुढील १-२ वर्षांत होणार, हे आता सांगणे कठीण असले, तरी संतांनी सांगितल्यानुसार तिसरे महायुद्ध संपूर्ण पृथ्वीवर लढले जाणार आहे. रशियाकडे १०० ते २०० नाही, तर जवळपास ४ सहस्र ४७७ अणूबाँब असल्याचे म्हटले जात आहे. जपानमध्ये केवळ २ अणूबाँबचा परिणाम आणि तोही त्या काळातील शक्तीशाली असणार्‍या अणूबाँबचा परिणाम जगाने पाहिलेला आहे; मात्र आता त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक शक्तीशाली असणार्‍या १-२ अणूबाँबचा जरी वापर केला गेला, तर विनाशाविना काहीच असणार नाही. अणूबाँबच्या किरणोत्सर्गाचा परिणाम जपानमधील लोक आजही भोगत आहेत, तर आताच्या अणूबाँबचा परिणाम पुढील किती शतके मानवजातीला भोगावा लागेल, याची कल्पना करता येत नाही.