पंचगंगेच्या रूकडी (जिल्हा कोल्हापूर) बंधार्यावर शेकडो मृत माशांचा खच !
दायित्वशून्य प्रदूषण नियंत्रण मंडळ
कोल्हापूर, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – काही दिवसांपूर्वीच कसबा बाबडा, शिये, शिंगणापूर, इचलकरंजी परिसरात मृत मासे आढळून आलेले असतांनाच आता रुकडी येथील बंधार्यावर शेकडो मृत माशांचा खच पडलेला आढळून आला आहे. या बंधार्यानजिक रुकडी गावास पाणीपुरवठा करणारे ‘जॅकवेल’ असून त्यामध्ये मृत मासे अडकले आहेत. यामुळे ‘जॅकवेल’मधून पाणीपुरवठा करणे अडचणीचे झाले असून गावात दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. (हिंदूंच्या गणेशोत्सव, तसेच अन्य सणांमुळे प्रदूषण होते, अशी आरोळी ठोकणारे कथित पर्यावरणप्रेमी, तसेच अंनिससारख्या संघटना अशा वेळी गप्प बसतात, यातून हे सर्व हिंदुद्वेषी आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)
मृत मासे बंधार्यावर आहेत, हे कळताच अनेक लोकांनी नदीपात्रात उतरून मासे पोत्यात भरून ते विक्रीसाठी नेले. गावातील नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत ‘नदीतील दूषित पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेहमीप्रमाणे ‘पंचनामा आणि अन्वेषण करून याचे कारण नंतर सांगण्यात येईल’, असे ठोकळेबाज उत्तर दिले. गेल्या अनेक वेळा मासे मृत्यूमुखी पडल्याच्या प्रकरणांतही प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतेही ठोस कारण स्पष्ट केले नव्हते.