‘मावळ्यांची शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवणार ! – छत्रपती उदयनराजे भोसले

सातारकरांच्या वतीने खासदार उदयनराजे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला

सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला हिंदवी स्वराज्याचा लढा आधुनिक पद्धतीने शालेय मुला-मुलींपर्यंत पोचवणारा ‘मावळ्यांची शाळा’ हा अभिनव उपक्रम चालू करणार आहे, अशी घोषणा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. येथील गांधी मैदानावर आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उदयनराजे भोसले म्हणाले,

१. ‘मीती इन्फोटेन्मेंट’ यांच्या तांत्रिक सहयोगातून या उपक्रमास सातारा येथून प्रारंभ होणार आहे. शाळांमध्ये इतिहास शिकवतांना तो केवळ एक विषय म्हणून शिकवला जातो. सनावळी, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकवतांना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी, ती मिळतांना दिसत नाही.

२. ‘मावळ्यांची शाळा’ या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीने इतिहास शिकवला जाईल. ‘प्रोजेक्टर्स’ आणि ‘व्हिजुअल ग्राफिक्स’च्या माध्यमातून आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या योद्धयांच्या शौर्यगाथा शिकवल्या जातील.

३. शालेय अभ्यासक्रमात वीरयोद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित न ठेवता, त्या स्वराज्ययोद्ध्यांना त्यांच्यापर्यंत आधुनिक पद्धतीने पोचवतांना त्यांच्या चरित्रातून काय शिकावे ? एकूणच शिवचरित्रातून काय बोध घ्यावेत ? या सर्व गोष्टींचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.