‘फोन टॅपिंग’ प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुणे येथे गुन्हा नोंद !
पुणे – रश्मी शुक्ला यांनी पुण्यातील राज्य गुप्त वार्ता विभागामध्ये आयुक्तपदाच्या कार्यकाळामध्ये पदाचा अपलाभ घेत ‘फोन टॅपिंग’ (अवैध अभिवेक्षण) केले. ज्या व्यक्तींच्या ‘फोन टॅपिंग’ची अनुमती घेतली होती, त्या नावांमध्ये पालट केले. त्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तांत्रिक अन्वेषणामध्ये निष्पन्न झाले आहे, असा अहवाल तत्कालिन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने सादर केला आहे. या अहवालानुसार पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या त्या भाग्यनगर येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.
रश्मी शुक्ला यांनी वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीमध्ये राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅपिंग’ करून त्यातील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याविषयी वर्ष २०२१ च्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.