युक्रेनच्या खारकीव्ह शहरावर रशियाचे जोरदार आक्रमण !
रशियाच्या सैनिकांनी वायूवाहिनी उद्ध्वस्त केल्यामुळे शहरात हाहाःकार !
किव (युक्रेन) – युक्रेनच्या खारकीव्ह शहरावर रशियाच्या सैनिकांनी जोरदार आक्रमण केल्यामुळे शहरात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनची राजधानी किव शहरानंतर खारकीव्ह हे युक्रेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. रशियाच्या सैनिकांनी शहरातील वायूवाहिनी स्फोटाने उडवून दिल्यामुळे शहरात हाहाःकार उडाला आहे.
Russia blows up gas pipeline in Ukraine’s Kharkiv, massive mushroom cloud seen | WATCH https://t.co/mh0uHwoVUa
— Republic (@republic) February 27, 2022
अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास !
वायूवाहिनी उद्ध्वस्त झाल्यामुळे शहरात धुराचे मोठे लोट उसळले आहेत. ही स्थिती लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने सतर्कतेची चेतावणी दिली आहे. लोकांना घराची दारे आणि खिडक्या बंद करण्यास सांगण्यात आले असून ‘अधिकाधिक पाणी प्यावे आणि नाकावर ओले कपड ठेवावे’, असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे.
शहरातील शासकीय इमारतींवर बेछूट गोळीबार !
खारकीव्ह शहर कह्यात घेण्यासाठी रशियन सैनिकांनी हे भयंकर आक्रमण केले असून युक्रेनी सैनिक त्याला प्रत्युत्तर देत आहेत, असे एका अधिकार्याने सांगितले. खारकीव्ह शहर रशियाच्या सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहराला रशियन सैनिक लक्ष्य करत आहेत. येथील शासकीय इमारतींवरही बेछूट गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मारियुपोल शहरावरील आक्रमणात १० ग्रीक ठार !
रशियाच्या सैनिकांनी मारियुपोल शहरावर केलेल्या आक्रमणात १० ग्रीक नागरिक ठार झाले असून ६ जण घायाळ झाले आहेत. या घटनेनंतर ग्रीसच्या राजदूतांनी रशियाच्या राजदूतांना समन्स बजावले आहे. याविषयी ग्रीसचे पंतप्रधान कॅरिकोस मित्सोटाकिस यांनी ट्वीट करून, ‘रशियाच्या आक्रमणात १० निर्दोष नागरिकांना प्राण गमवावे लागणे, हे चिंताजनक असून रशियाने हे आक्रमण तत्काळ थांबवायला हवे’, असे आवाहन रशियाला केले.
Greece says 10 expats killed in Ukraine, summons Russian ambassador https://t.co/gXAt9qLfq7 pic.twitter.com/WRp4SawvhA
— Reuters (@Reuters) February 26, 2022