युक्रेनला अन्य देशांकडून अर्थ आणि सैन्य बळ; मात्र रशिया वरचढ !

‘नाटो’मध्ये सहभागी झाल्यास  स्विडन आणि फिनलँड यांची युक्रेनसारखी अवस्था करू ! – पुतिन

रशिया – युक्रेन युद्ध

मॉस्को (रशिया) – स्विडन आणि फिनलँड हे देश ‘नाटो’मध्ये सहभागी झाल्यास त्यांची अवस्थादेखील युक्रेनसारखी करू, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली.

युक्रेनवरील आक्रमणावरून स्विडन आणि फिनलँड यांनी रशियावर टीका करत ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याविषयी विधान केले आहे.

बाबा वेंगा यांची रशियाविषयीची भविष्यवाणी रशिया जगाचा अधिपती म्हणून उदयाला येईल !

भविष्यवेत्त्या बाबा वेंगा

प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी वर्ष १९७९ मध्ये भविष्यवाणी करतांना म्हटले होते, ‘सगळे काही थिजून जाईल, एखाद्या बर्फाप्रमाणे. केवळ एकच गोष्ट अबाधित राहील. व्लादिमिरचा (रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमितर पुतिन यांचा) प्रभाव आणि रशियाचे सामर्थ्य. कुणीही रशियाला रोखू शकत नाही. इतर सगळ्यांना रशिया त्याच्या मार्गातून बाजूला सारेल आणि जगाचा अधिपती म्हणून उदयाला येईल.’

बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाणी काही अंशी खर्‍या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांचे वर्ष १९९६ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे.

रशिया – युक्रेन युद्ध

भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांविषयी आम्हाला कोणतीही अडचण नाही ! – अमेरिका

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्हाला ठाऊक आहे की, भारताचे रशियाशी असलेले संबंध हे आमच्या आणि रशिया यांच्या संबंधांपेक्षा फार वेगळे आहेत. यात आम्हाला कोणतीही अडचण नाही, असे अमेरिकेने भारताने युक्रेनविषयीच्या युद्धाविषयी घेतलेल्या भूमिकेनंतर म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, अमेरिकेचे भारताशी चांगले संबंध आहेत. भारताचे रशियाशी घनिष्ट संबंध आहेत, तेवढे आमचे निश्चितच नाहीत. भारत आणि रशिया यांच्यात संरक्षणविषयक संबंध आहेत, जे आमचे नाहीत. ज्यांचे संबंध आहेत आणि जे लाभ घेऊ शकतात, त्यांनी त्याचा वापर रचनात्मक पद्धतीने करावा, असे आम्ही प्रत्येक देशाला सांगितले आहे.

फ्रान्सने रशियाचे जहाज पकडले !

पॅरिस – युद्धानंतर जागतिक स्तरावर अनेक देशांनी रशियावर निर्बंध घोषित केले. त्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने रशिया आस्थापनाच्या मालकीचे एक जहाज पकडले आहे.

हे व्यापारी जहाज असून त्यात चारचाकी गाड्या आहेत. ते रशियाच्या दिशेने चालले होते.

‘युद्ध’, ‘आक्रमण’ किंवा ‘घुसखोरी’ असे शब्द वापरू नयेत ! – रशियाचा प्रसारमाध्यमांना आदेश

आदेशाचे उल्लंघन केल्यास प्रसारमाध्यम बंद केले जाणार !

मॉस्को (रशिया) – रशिया सरकारच्या अधिपत्याखाली असणारे ‘मीडिया रेग्युलेटरी डिव्हिजन’ने एक आदेश काढला आहे. यात म्हटले आहे, ‘कोणत्याही प्रसारमाध्यमांनी युद्धाच्या काळात ‘युद्ध’, ‘आक्रमण’ किंवा ‘घुसखोरी’ असे शब्द वापरू नयेत. असे करणार्‍या संबंधित पत्रकारांना शिक्षा होऊ शकते आणि संबाधित प्रमारमाध्यम बंद केले जाऊ शकते.

नियम मोडल्यास दंडही ठोठावला जाईल.’ प्रसारमाध्यमांना केवळ सरकारकडून देण्यात आलेली माहितीच प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे.

रशियाची मोठी हानी होत असल्याने आदेश जारी केल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा !

या आदेशामागे ‘युक्रेनच्या सैन्याने रशियाची पुष्कळ मोठी हानी केली आहे आणि रशियाचे सैनिक सतत मारले जात आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे’, असे  काही प्रसारमाध्यमांकडून सांगितले जात आहे.