युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम आणि भारताची भूमिका !
‘युक्रेन-रशिया युद्ध हे ८-९ वर्षांपासून चालू होते, ज्याला आपण ‘हायब्रिड वॉर’ (एकही गोळी न चालवता युद्ध पुकारणे) किंवा ‘ग्रे झोन वॉर’ (युद्ध नाही आणि शांतताही नाही) म्हणत होतो. त्या अंतर्गत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. सायबर आक्रमणे होत होती, घुसखोरांना आत घुसवण्यात आले होते, खासगी लष्कराचा वापर केला जात होता. शेवटी रशियाने पारंपरिक युद्धाला प्रारंभ केला. प्रारंभी वाटले होते की, हे नुसतेच ढोंग आहे, खरे युद्ध चालू झालेले नाही; परंतु रशियाने हवाईदलाचा वापर केला, तोफांचा मारा चालू झाला, त्यांचे रणगाडे आत घुसले आणि नंतर खरोखरचे युद्ध चालू झाले. त्यांनी युक्रेनचे अनेक वायूतळ आणि लष्करीतळ नष्ट केले आहेत. एवढेच नाही, तर रशियाने चेर्नाेबिल अणूभट्टीवरही ताबा मिळवला. युक्रेनची राजधानी कीव याला रशियाच्या सैन्याने वेढा घातला आहे. या युद्धात युक्रेनचे सैन्य किती दिवस टिकेल ? याविषयी शंका आहे.
१. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना परत आणणे भारतासमोर मोठे आव्हान !
हे युद्ध किती दिवस चालेल, याविषयी कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार आहे, याचे विश्लेषण करायला पाहिजे. युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या १८ सहस्र विद्यार्थ्यांपैकी ४ सहस्र विद्यार्थ्यांना परत आणण्यात आले आहे आणि १४ सहस्रांहून अधिक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. त्यांना गुणवत्ता सूचीनुसार भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला नाही आणि खासगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी अनुमाने २० लाख रुपये व्यय येतो. त्यामुळे ते युक्रेनला गेले. यासाठी तेथे अनुमाने ३ लाख रुपये वर्षाला फी आहे. तसेच तेथे रहाण्याचा व्यय भारताएवढाच आहे. त्यामुळे केवळ ४-५ लाख रुपयांमध्ये तेथे वैद्यकीय शिक्षण घेता येऊ शकते. त्यामुळे तेथे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाला जात असतात.
युक्रेनमधून हवाई मार्गाने विद्यार्थ्यांची सुटका करण्याचा मार्ग बंद झाला आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलले. तेव्हा या विषयावरही चर्चा झाली. त्यातून जे पुढे येत आहे, ते असे आहे की, या विद्यार्थ्यांना हवाई मार्गाने परत आणणे कठीण दिसत आहे. हे युद्ध अधिक काळ चालले, तर या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या मार्गाने शेजारच्या राष्ट्रांमध्ये नेण्यात येईल आणि तेथून त्यांना भारतात आणण्यात येईल. युक्रेनच्या शेजारी पोलंड आणि अन्य ३-४ राष्ट्रे आहेत. तेथे परिस्थिती सामान्य आहे. या देशांमध्ये हे विद्यार्थी जातील आणि तेथील सीमांवर पोचल्यावर भारतीय दूतावासाचे अधिकारी त्यांना साहाय्य करतील. युद्धभूमीच्या बाहेर असलेल्या लोकांनाच रस्त्याच्या मार्गाने जाता येणे शक्य आहे. ज्या भागात युद्ध चालू आहे, तेथे स्वत:चे रक्षण करणे एवढेच अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. जोपर्यंत ते पश्चिमेकडील देशांमध्ये जाऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आशा करूया की, युद्धाचा लवकर निर्णय लागून हे विद्यार्थीही लवकर भारतात परत येतील.
२. युद्धाचा वायू आणि खनिज तेल यांचा पुरवठा अन् मूल्य यांवर होणारा परिणाम !
भारत अनुमाने ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. अरब, मेक्सिको, रशिया, आफ्रिकी देश आणि काही प्रमाणात अमेरिका येथून हे तेल आयात केले जाते. या युद्धामुळे तेलाचे मूल्य लगेचच वाढून ते प्रति बॅरल १०५ डॉलरपर्यंत पोचले आहे. भारत विविध राष्ट्रांकडून कच्चे तेल खरेदी करत असतो. यासंदर्भात भारताने ‘लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट’ (दीर्घकालीन करार) केलेले आहेत. असे असूनही तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडथळा आला, तर त्याचे मूल्य वाढू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे मूल्य प्रचंड वाढले असतांनाही भारत तेलाचे मूल्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या चालू असलेल्या निवडणुका संपेपर्यंत तरी हे मूल्य वाढू दिले जाणार नाही.
भारताकडे खनिज तेलाचा ७० ते ८० दिवसांचा ‘स्टॅट्रेजिक रिझर्व्ह’ (आपत्कालिन ठेवलेला राखीव साठा) आहे. याचा अर्थ एवढे दिवस तेलाचा पुरवठा झाला नाही, तरी भारत या साठ्यामधून देशाला तेल पुरवू शकतो. त्यामुळे तेलाचे मूल्य स्थिर राहील. याखेरीज आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये कच्चे तेल घेऊन अनेक जहाजे येत असतात. त्यांच्याकडून तेल खरेदी केले, तर तेल स्वस्त दरात पडते. यासमवेतच भारत स्थानिक तेल उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करील. असे असले, तरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर एक देश म्हणून भारताचे नियंत्रण अल्प असते. त्यामुळे अशा संकटसमयी सर्वसामान्य भारतियांनी हातभार लावणे महत्त्वाचे आहे. आपण काही नियम आणि सूचना यांचे पालन केले, तर २५ ते ३० टक्के वायू आणि तेल वाचवू शकतो.
३. युद्धामुळे होणार्या व्यापारावरील परिणामांना तोंड देण्यास भारताने सिद्ध रहाणे आवश्यक !
भारताचा युक्रेन आणि रशिया यांच्याशी अल्प व्यापार आहे. काल भारताचा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४ टक्क्यांनी, तर रशियाचा शेअर बाजार ५० टक्क्यांनी खाली आला. तसेच आंतरराष्ट्रीय शेअर बाजार त्याहूनही खाली आहे. या युद्धाचा भारतीय रुपयावर थोडाफार परिणाम होईल. रुपयाचे मूल्य उणे-अधिक होऊ शकते. भारताकडे प्रचंड प्रमाणात विदेशी चलन म्हणजे डॉलर्सचा साठा आहे. त्यामुळे या परिस्थितीचा रुपयावर विशेष परिणाम होण्याची शक्यता अल्प आहे. युरोप आणि अमेरिका हे रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादत आहेत. या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रांच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. भारत आणि रशिया संयुक्तपणे ‘ब्राह्मोस’ नावाचे क्षेपणास्त्र सिद्ध करत आहेत. त्याची फिलीपिन्सकडून मोठ्या प्रमाणात मागणी मिळाली होती. त्याच्या निर्मितीवरही थोडाफार परिणाम होऊ शकतो.
४. भारताने चीनपासून सावध रहाणे आवश्यक !
या लढाईमध्ये भारताने सध्या तटस्थ भूमिका घेतलेली आहे; पण लक्षात घेतले पाहिजे की, रशियाची कृती ही अवैध होती. यावर आपण विशेष बोलत नसलो, तरी या सगळ्या गोष्टींवर चीन लक्ष ठेवून आहे. तज्ञांच्या मनात अशी भीती आहे की, ज्याप्रमाणे रशियाने युक्रेनच्या विरोधात दादागिरी केली आणि युरोप अन् जगातील सर्वांत मोठे लष्करी संघटन असलेले ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) यांचे त्याला सैनिकी प्रत्युत्तर देण्याचे धाडसही झाले नाही. ‘नाटो’मध्ये लढण्याची क्षमता राहिली नाही, हे रशियाला समजले आहे. दुर्दैवाने ते चीनलाही कळलेले आहे. त्यामुळे चीन रशियासारखा प्रकार तैवानमध्ये करू शकतो का ? चीन भारताच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये असा प्रकार करू शकतो का ? आणि केला, तर काय होईल ? तैवानचा विषय वेगळा आहे; पण चीनने असा प्रकार भारतात केला, तर तो रक्तबंबाळ होईल, एवढे नक्की.
५. भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही !
केवळ माहिती युद्ध आणि मानसिक युद्ध करून होत नाही. तुम्हाला पारंपरिक युद्धाचीही सिद्धता करावी लागते. त्यासाठी भारतीय सैन्य सदैव सिद्ध असते; परंतु त्यांना देशवासियांची साथ मिळणे आवश्यक आहे. हे युद्ध कधीपर्यंत चालेल, हे कुणीही सांगू शकत नाही; पण त्याच्या परिणामांना तोंड देण्यासाठी भारतियांना सदैव सिद्ध रहावे लागेल. चीनने भारतावर युद्ध लादले, तर भारताला लढण्यासाठी सिद्ध रहावे लागेल; कारण नाटो आणि अमेरिका हे अतिशय निष्क्रीय झाले आहेत. जर्मनीच्या सैन्यप्रमुखाने सांगितले, ‘‘आमचे सैन्य युद्धासाठी सिद्ध नाही !’’ त्यामुळे भारतावर संकट आले, तर त्याला स्वतःच्या पायावरच उभे रहावे लागेल, हा या युक्रेन युद्धाचा सर्वांत मोठा धडा आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे