भाज्यांना असलेली उन्हाची आवश्यकता
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
बर्याचदा सर्वांनाच, त्यांतही नवीन बागकर्मींना काही प्रश्न नेहमी पडत असतात अन् ते म्हणजे ‘कुठल्या भाज्यांना किती ऊन लागते ? भाज्यांच्या पेरणी ते काढणी या संपूर्ण जीवनचक्रात त्यांची उन्हाची आवश्यकता काय असते ? अन् आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उन्हात, मग ते थेट ऊन असो किंवा सूर्यप्रकाश, आपण कोणकोणत्या भाज्या घेऊ शकतो ?’, या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख !
१. उन्हाचे पालटणारे प्रमाण आणि त्याची कारणे
‘आपल्या बागेमध्ये दिवसभरात पडणार्या उन्हाच्या वेळा, प्रमाण, जागा आणि त्याची तीव्रता हे सारे वेगवेगळे असते. यामध्ये सूर्याचे उत्तरायण अन् दक्षिणायन यांमुळे तर वर्षभर सतत पालट होत असतोच; पण आजूबाजूला होणारी बांधकामे आणि बाहेरील किंवा आपणच आपल्या बागेत लावलेल्या झाडांची सतत होणारी वाढ यांमुळेही उन्हाचे घंटे न्यून-अधिक होत असतात, तसेच त्याची तीव्रताही न्यून-अधिक होत असते. यावर आपले काहीच नियंत्रण नसते. फार फार तर आपण आपल्या बागेतील वाढलेल्या झाडांची छाटणी करू शकतो; पण इतर विषयांत मात्र आपल्याला आणि आपण लावलेल्या रोपांना मिळेल तेवढ्या उन्हावर अन् सूर्यप्रकाशावरच भागवून घ्यावे लागते.
२. उन्हाच्या आवश्यकतेनुसार भाज्यांचे वर्गीकरण
आपण किती उन्हात कोणकोणत्या भाज्या लावू शकतो, हे आता पाहू. यासाठी आपण ३ प्रमुख गटांत भाज्यांची विभागणी करू. ते गट असे –
अ. ६ ते ८ घंटे ऊन आवश्यक असलेल्या भाज्या\
आ. ४ ते ६ घंटे ऊन आवश्यक असलेल्या भाज्या
इ. २ ते ४ घंटे ऊन आवश्यक असलेल्या भाज्या
येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कुठल्याही वनस्पतीच्या वाढीसाठी ऊन न्यून-अधिक प्रमाणात आवश्यकच असते. त्यामुळेच फळांना चव अन् फुलांना रंग मिळत असतो; परंतु काही भाज्या अल्प उन्हातही तग धरू शकतात अन् फुलतात, तसेच फळतातही. अर्थात् अशा भाज्या जर उन्हात असत्या अन् आपण त्यांची पूर्ण काळजी घेत त्यांना वाढवले असते, तर त्यांच्या रंगरूपात अन् चवीत निश्चितच अंतर पडले असते; पण तरीही ‘काहीच नाही, त्यापेक्षा थोडे तरी’ या न्यायाने त्या वाढतात अन् आपली अन्नाची आवश्यकता भागवतात.
२ अ. ६ ते ८ घंटे थेट ऊन आवश्यक असलेल्या भाज्या : टोमॅटो, वांगी, काकडी, मिरची, मका, दुधी, लाल भोपळा, भेंडी, चवळी आणि इतर शेंगवर्गीय भाज्या, तसेच सर्व वेलवर्गीय भाज्या यांना जेवढे अधिक ऊन मिळेल, तेवढी त्यांची वाढ उत्तम होते. तीव्र उन्हाच्या दिवसांत दुपारच्या वेळी, म्हणजे साधारण सकाळी ११.३० ते दुपारी २.३०-३ या कालावधीत या भाज्यांवर सावली येईल, अशी व्यवस्था केली, तर ते अधिक लाभदायक होईल. ऊन अधिक, म्हणजे पाण्याची आवश्यकता अधिक हे गणित ठरलेले असते; कारण कुंडीत लावलेल्या भाज्यांना पाण्यासाठी सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून रहावे लागते. त्यामुळे या भाज्यांना पाण्याचा ताण बसू देऊ नये. (‘झाडे पाण्याच्या अभावामुळे कोमेजली’, असे होऊ देऊ नये.)
२ आ. ४ ते ६ घंटे ऊन आवश्यक असलेल्या भाज्या : बीट, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, (फ्लॉवर सारखी एक भाजी) गाजर, कांदा, लसूण, मटार, बटाटा, मुळा, आले इत्यादी भाज्या, म्हणजेच बहुतांशी कंदवर्गीय भाज्या अर्धवट सावलीत चांगल्या वाढतात. तीव्र ऊन वा प्रमाणाबाहेर जास्त ऊन असल्यास यांची वाढ व्यवस्थित होत नाही. कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांची वाढ अतीउन्हात न्यून होतेच; पण त्यांच्या चवीतही अंतर येते. ज्या भागात ऊन तीव्र असते, तिथे मोठ्या वृक्षांच्या सावलीत यांची लागवड केली, तर उपलब्ध जागेचा वापरही होतो आणि भाज्याही मिळतात.
२ इ. २ ते ४ घंटे ऊन आवश्यक असलेल्या भाज्या : मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर इत्यादी सर्व पालेभाज्या, तसेच लेट्यूससारख्या विदेशी भाज्या यांसाठी अल्प ऊन असल्यास त्यांची वाढ उत्तम होते. साधारणतः पालेभाज्या कोवळ्या असतांनाच खाल्ल्या जातात. त्यामुळे जर त्या अल्प उन्हात वाढवल्या, तर त्यांचे सर्व गुण आणि चव अबाधित रहाते.
३. बागेत कुठे, कधी आणि किती प्रमाणात ऊन येते ? याचा अभ्यास करून योग्य नियोजन करून लागवड करा !
आपल्या बागेत किती ऊन येते ?, दिवसाच्या कुठल्या वेळांत ते बागेमधल्या कुठल्या भागात आणि किती प्रमाणात अन् तीव्रतेत असते ? यांचा अभ्यास आरंभीचे काही दिवस, तसेच वर्षभरातील वेगवेगळ्या ऋतूंमध्ये करून त्याप्रमाणे नियोजन करून भाज्या लावण्याच्या जागा ठरवाव्यात. अर्थात् आपण कितीही अभ्यास केला अन् त्याप्रमाणे ठरवले, तरीही शेवटी तो निसर्ग आहे ! त्यामुळे, तसेच सभोवतीच्या इमारती, मोठी झाडे इत्यादींमुळे सर्वच दिवस एकसारखे ऊन निश्चितच मिळत नाही. यासाठी आपण आपल्या उपलब्ध जागेनुसार झाडांची आणि कुंड्यांची रचना करून त्याप्रमाणे मिळणारे ऊन आणि सावली यांमध्ये भाज्या लावून त्यांची उन्हाची आवश्यकता भागवू शकतो. अधिक ऊन लागणार्या भाज्या मधल्या मोकळ्या जागेत लावून किंवा त्या ठिकाणी कुंड्या ठेवून मोठ्या झाडांच्या पडणार्या सावलीमध्ये आपण अल्प उन्हाची आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता असणार्या भाज्या लावू शकतो. बागेत सावली असणारा भाग असतोच. त्या भागात सावलीत वाढणार्या भाज्या लावून तीही जागा आपण उपयोगात आणू शकतो. बागेच्या ज्या भागात थेट ऊनच नव्हे, तर सूर्यप्रकाशही अभावानेच पडत असेल, तिथे आपण फुलझाडे किंवा शोभेची झाडे लावू शकतो. शोभेची किंवा घरात ठेवता येण्याजोगी (इन्डोअर) झाडे अशा भागात चांगली वाढतात. ज्या भाज्यांना भरपूर ऊन आवश्यक असते आणि ज्या आपण एका रांगेत लावत असू, अशा झाडांच्या रांगा उत्तर-दक्षिण ठेवल्या, तर सर्वच झाडांना सकाळ ते संध्याकाळ समान ऊन मिळेल. उन्हात वाढणार्या भाज्यांच्या मुळांपाशी कुंडीत अर्धवट सावलीत वाढणार्या भाज्या लावल्या, तर एकाच खतात दोन भाज्या तर घेता येतातच; पण अल्प जागेत अधिक भाज्या आपल्याला मिळू शकतील.
४. उन्हाच्या न्यूनतेमुळे उत्पन्न न्यून आले, तरी ते स्वतःच्या कष्टाचे असल्याने त्याचे महत्त्व अधिक असणे
पूर्ण उन्हाची आवश्यकता असलेल्या भाज्या अर्ध उन्हात आणि अर्ध उन्हात होणार्या भाज्या, जर सावलीत लावल्या, तर त्या फळणार नाहीत, असे नाही, तर त्यांना लागणारी फळे रंग आणि आकार यांनी अल्प असतील. चव तीच असेल; पण संख्या न्यून असेल आणि कळी ते पक्व भाजी हा काळही अधिक असेल. कारण एकच – ‘त्यांना वाढीसाठी आवश्यक असणारे ऊन अल्प प्रमाणात मिळणे आणि त्यामुळे मिळणारी जीवनसत्त्वे अन् अन्नद्रव्ये न्यून पडणे’. या जीवनसत्त्वांची उणीव आपण खतांद्वारे भरून काढू शकत नाही; म्हणून आपल्या जागेनुसार काय लावायचे ते ठरवा आणि त्याप्रमाणेच बागेकडून अपेक्षा ठेवा. शेवटी आपल्या बागेत पिकलेला टोमॅटो पेठेतील टोमॅटोप्रमाणे
२ इंच व्यासाचा नसला, तरी ‘तो आपण स्वतः पिकवला आहे आणि त्याला कुठले खत अन् कुठले पाणी दिले आहे, ते आपल्याला ठाऊक आहे, तसेच त्यावर आपला अंकुश आहे’, हे महत्त्वाचे !
– श्री. राजन लोहगांवकर, कल्याण
(साभार : vaanaspatya.blogspot.com)
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !लागवडीसंबंधी प्रायोगिक लिखाण पाठवा !‘लागवड हा एक प्रायोगिक विषय आहे. यामध्ये लहान लहान अनुभवांनाही पुष्कळ महत्त्व असते. जे साधक आतापर्यंत लागवड करत आले आहेत, त्यांनी त्यांना लागवड करतांना आलेले अनुभव, झालेल्या चुका, त्या चुकांतून शिकायला मिळालेली सूत्रे, लागवडीसंबंधी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यांविषयीचे लिखाण स्वतःच्या छायाचित्रासहित पाठवावे. हे लिखाण दैनिकातून प्रसिद्ध करता येईल. यातून इतरांनाही शिकता येईल. लिखाण पाठवण्यासाठी टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ |