मराठी भाषेच्या समृद्धतेची जाणीव ठेवून तिचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – अभिजित बांगर, महापालिका आयुक्त
नवी मुंबई – मराठी भाषेच्या समृद्धतेची जाणीव ठेवून तिचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. ज्या गोष्टीचा आपण अभिमान बाळगतो तीच गोष्ट मनापासून टिकवून ठेवत असतो, असे प्रतिपादन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी वाशी येथे केले. जागतिक मराठी भाषादिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘मायबोली मराठी’ हे खुले सुलेखन प्रदर्शन आयोजित केले आहे.
महापालिकेने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या माध्यमातून सुंदर हस्ताक्षरातील मराठी साहित्यातील कविता आणि विचार प्रदर्शित केले आहेत. मराठी साहित्याची विविधता आणि समृद्धता लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रदर्शनाचे प्रयोजन आहे. यामध्ये सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या विद्यार्थ्यांसह मराठी भाषेचा गौरवशाली अविष्कार अत्यंत आकर्षक पद्धतीने साकारला आहे, असे या प्रदर्शनाला भेट दिल्यावर अभिजित बांगर बोलत होते.