प्रेमळ, समंजस, स्वयंशिस्त आणि साधनेची तीव्र तळमळ असलेली पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) !
‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. या दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. नम्रता
‘कु. प्रार्थना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना अनेक साधक येता-जाता तिच्याशी गमतीने बोलतात. त्या वेळी ती सर्वांशी हसत-खेळत आणि नम्रतेने बोलते.
२. प्रेमभाव
प्रार्थना तिच्या ओळखीच्या व्यक्तींच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना देण्यासाठी भेटकार्डे (शुभेच्छापत्रे) बनवत असते. ती संबंधितांना संस्कृतमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वातावरण प्रसन्न आणि आनंदी करते.
३. समंजस
अ. माझी पत्नी सौ. मनीषा (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि मुलगी कु. प्रार्थना या दोघी मार्च २०२० मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्या होत्या. तेव्हा मी अन्य सेवाकेंद्रात सेवा करत होतो. मी नोव्हेंबर २०२० मध्ये रामनाथी आश्रमात गेलो. दळणवळण बंदीच्या या काळात माझी आणि प्रार्थनाची भेट ८ मासांनंतर झाली. त्या आधी आम्ही भ्रमणभाषवरून संपर्कात होतो. त्या कालावधीत प्रार्थना आश्रमजीवनाशी इतकी समरस झाली होती की, तिला मायेतील अन्य गोष्टींचा विसर पडला होता. तिने मला सोडून इतके दिवस अन्य ठिकाणी रहाण्याची ही पहिलीच वेळ होती; परंतु तिने ‘मी तिला भेटण्यासाठी यावे’, असा हट्ट कधीच केला नाही. अन्य बालसाधकांचे वडील आश्रमात यायचे. तेव्हा ती मला म्हणायची, ‘‘तुम्हाला जमेल, तेव्हा इकडे या. आमची काळजी करू नका. परात्पर गुरु डॉक्टर आहेत. तेच आमची काळजी घेतात.’’
आ. कु. प्रार्थना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने होणार्या संशोधनातील प्रयोगांसाठीही जाते. तेथे गेल्यानंतर तिला पुष्कळ वेळ एका ठिकाणी बसावे लागते; परंतु याविषयी तिने कधी कंटाळा आल्याचे म्हटले नाही कि कधी गार्हाणे केले नाही.
४. आश्रमजीवनाशी एकरूप होणे
ती आश्रमात आल्यापासून ते आतापर्यंत तिच्या राहणीमानाकडे पाहून असे वाटते की, ती पुष्कळ वर्षे आश्रमातच राहिली आहे. ती मला भ्रमणभाषवर म्हणायची, ‘‘तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला काही अवघड जाणार नाही. मी तुम्हाला चुका करू देणार नाही.’’ मला वाटायचे की, ती हे गंमतीने म्हणत आहे; परंतु मी आश्रमात आल्यानंतर माझ्या लक्षात आले की, ती खरेच सांगत होती. ती मला लहानातील लहान गोष्टीची जाणीव करून देते, उदा.
अ. उद्वाहकातून (लिफ्टमधून) गरम द्रवपदार्थ न्यायचे नाहीत.
आ. ध्यानमंदिराच्या बाजूने चालतांना शांतपणे आणि न बोलता चालायचे.
इ. महाप्रसाद ग्रहण करतांना भोजनकक्षात अधिक वेळ बसू नये.
तिने मला अशी अनेक सूत्रे आणि आश्रमातील कार्यपद्धती समजावून सांगितल्या. ‘प्रत्येक साधकाचे नाव, तो कोणती सेवा करतो ? त्याचे नातेवाईकही येथे आहेत का ?’, अशी सर्व माहिती तिच्या लक्षात आहे.
५. स्वयंशिस्त
तिच्यातील ‘तत्परता, वेळेचे पालन करणे, सातत्य’ हे गुण मला शिकायला मिळतात. तिने ‘फलकावर चूक लिहिली नाही’, असे एकही दिवस झाले नाही. ‘सकाळी ७ वाजता ‘ऑनलाईन’ शाळेच्या वर्गात उपस्थित रहाणे, ९.३० वाजता शाळा संपल्यावर स्नान करून दत्तमाला पठणाला जाणे, नंतर महाप्रसाद घेऊन साधकांना लहान सेवांत साहाय्य करणे, दुपारी ४ वाजता न्याहारी करून स्तोत्रपठणाला जाणे, त्यानंतर नामजप करून रात्रीच्या महाप्रसाद ग्रहण करणे’ या सर्व तिच्या कृतींमध्ये कधीही खंड पडला नाही किंवा तिने वेळही चुकवली नाही. ‘प्रत्येक सूत्र नीट समजून घेणे आणि ते कृतीत आणणे’, यासाठी तिला अतिशय कठोर प्रयत्न करावे लागले, तरी तिने कधी कंटाळा केला नाही.
६. ती उत्स्फूर्तपणे कविता करते. ती चित्रे काढणे, नृत्य करणे, या कलाही कोणतीही शिकवणी न लावता शिकत आहे.
७. साधनेची तीव्र तळमळ
एकदा आम्ही (मी आणि कु. प्रार्थना) भोजनकक्षात असतांना आश्रमातील ध्वनीक्षेपकावर सूचना सांगण्यात येत होती. त्या वेळी प्रार्थना त्वरित एका खोलीच्या दिशेने पळत गेली. नंतर मी तिला विचारले, ‘‘तू पळत का गेलीस ?’’ त्या वेळी तिने सांगितले, ‘‘भोजनकक्षात सगळे बोलत असल्याने मला सूचना ऐकायला येत नव्हती; म्हणून मी पळत ध्वनीक्षेपक लावलेल्या ठिकाणी गेले.’’ प्रार्थनाला साधना करायला अतिशय आवडते. ती साधनेच्या संदर्भातील प्रत्येक कृती अतिशय तळमळीने करते. ‘त्यातील बारकावे जाणून घेणे, विचारून कृती करणे’ हे गुण तिच्यात उपजतच आहेत’, असे वाटते.
८. चुकांविषयी संवेदनशीलता
एकदा महाप्रसाद घेतांना साधक तिला म्हणाले, ‘‘आज महाप्रसाद लवकर झाला वाटते.’’ तेव्हा ती त्या साधकाला म्हणाली, ‘‘घड्याळाकडे पहा !’’ त्या वेळी मला तिच्या बोलण्यात उद्धटपणा जाणवला. त्यामुळे मी तिला त्याची जाणीव करून दिली. तेव्हा तिने लगेच त्या साधकाची क्षमा मागितली.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु आणि संत यांच्याप्रती भाव
अ. तिला प.पू. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉक्टरांची) सतत आठवण येत असते. प.पू. गुरुदेवांची आठवण येऊन तिचा भाव जागृत होतो. ‘प.पू. गुरुदेवांना भेटून किती दिवस झाले ?’, असे आठवून ती दिवस मोजत असते.
आ. संत आणि सद्गुरु यांच्याशी बोलतांना तिच्या बोलण्यातून त्यांच्याविषयी पुष्कळ आदर जाणवतो.’
– श्री. महेश पाठक (कु. प्रार्थनाचे वडील, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (२७.९.२०२१)
‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील डोळ्यांची हालचाल होत असून ते सर्व साधकांकडे कृपादृष्टीने पहात आहेत’, असे जाणवणे
‘७.७.२०२१ या दिवशी सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा दिनांकानुसार जन्मोत्सव होता. त्या दिवशी मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ‘ज्योतसे ज्योत जगाओ । सद्गुरु ज्योतसे ज्योत जगाओ ।……’ ही सद्गुरूंची आरती म्हणत होते. आरती म्हणत असतांना मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहात होते. त्या वेळी ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रामध्ये हालचाल होत आहे’, असे मला जाणवले. ‘छायाचित्रातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या डोळ्यांची हालचाल होत असून ते सर्व साधकांकडे कृपादृष्टीने पहात आहेत’, असे मला वाटले. तसेच ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रामध्ये विशुद्ध चक्राच्या ठिकाणी (गळ्याजवळ) हालचाल होत आहे’, असेही मला दिसले. हे दृश्य पाहून मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी भावजागृती झाली.
ही अनुभूती दिल्यामुळे मी भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– गुरुदेवांच्या चरणांवरील आनंदी फूल,
कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे (१५.७.२०२१)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |