५ लाख किलो वजनाचे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (स्पेस स्टेशन) भारतावर पाडायचे आहे का? – निर्बंधांवरून रशियाचा अमेरिकेला प्रश्‍न

रशियाची अंतराळ संस्था ‘रॉसकोमोस’चे प्रमुख दिमित्रि रोगोजिन (डावीकडे) आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (उजवीकडे)

मॉस्को (रशिया) – जर तुम्ही आमच्या समवेतच्या सहकार्यांवर निर्बंध आणले, तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (स्पेस स्टेशनला) वाटेल त्या भ्रमणकक्षेत फिरण्यापासून कोण वाचवणार ? ते अमेरिका किंवा युरोपमध्ये पडणार नाही का ? ५०० टन (५ लाख किलो) वजनाची ही वस्तू भारत किंवा चीन यांवर पाडण्याचाही पर्याय आहे. तुम्हाला या शक्यतेने त्यांना धमकवायचे आहे का ? आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक रशियावरून जात नाही, त्यामुळे सर्व धोका तुम्हालाच आहे. तुम्ही त्यासाठी सिद्ध आहात का ?, असा प्रश्‍न रशियाची अंतराळ संस्था ‘रॉसकोमोस’चे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी अमेरिकाला विचारला आहे. अमेरिकने युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लादल्यानंतर दिमित्रि रोगोजिन यांनी हा प्रश्‍न ट्वीट करून विचारला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर लादलेल्या नव्या निर्बंधांचा परिणाम आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या प्रकल्पाला रशिया करत असलेले सहकार्य काढून घेण्यापर्यंत जाऊ शकतो, असे रशियाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर ४ अमेरिकी, २ रशियन आणि १ जर्मन अंतराळवीर वास्तव्यास आहेत.