नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा ! – रत्नागिरी भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र

देशविघातक कृत्य करणारे नवाब मलिक

रत्नागिरी – देशविघातक कृत्य करणारे नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून पदच्युत करा, अशी मागणी येथील रत्नागिरी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे पत्र येथील भाजपच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, तालुका अध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेवक राजेश तोडणकर, सुप्रिया रसाळ , सौ. रायकर, सौ. करमरकर, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की,

नबाब मलिक यांच्यावर ‘ईडी’चे माध्यमातून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ८ दिवस कोठडीचा आदेश केला. मलिक यांच्यावर असणारे आरोप, हे अत्यंत गंभीर आहेत. देश विघातक कृत्य करणार्‍या प्रवृत्ती, वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटांमध्ये सहभागी असलेल्या देशद्रोही प्रवृत्तीसमवेत संबंधित असलेल्या व्यक्तींबरोबर मलिक यांचे संबंध आहेत. त्यांचे सोबत काही आर्थिक व्यवहार झालेले दिसतात, अशा प्रकारचे गंभीर आरोप आहेत. एक प्रकारे देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍या प्रवृत्तीसमवेत असलेले संबंध म्हणजे देशविघातक कृत्य ठरणारे आहे. असे आरोप असणारे मंत्री मंत्रिमंडळात रहाण्यासाठी पात्र नाहीत. आपल्या देशाची आपल्या राज्याची परंपरा संकेत पाहिले असता अशा प्रकारचे आरोप असणारी व्यक्ती मंत्रिमंडळात रहाणे, हे पूर्णतः अयोग्य आहे. लोकशाही परंपरेला साजेसे नाही. देशद्रोहासारखे आरोप ज्या ठिकाणी लावले गेले आहेत अशा मंत्र्यांनी तात्काळ त्यागपत्र देणे अभिप्रेत आहे; मात्र संबंधित व्यक्ती स्वतः त्यागपत्र देत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून अशा आरोपी मंत्र्याला डच्चू दिला पाहिजे. जनभावना लक्षात घेता आणि संसद विधिमंडळ यांची उज्ज्वल परंपरा लक्षात घेऊन तात्काळ माननीय मुख्यमंत्री यांनी नबाब मलिक या आरोपी मंत्र्याला पदच्युत करावे.