दुसर्या राज्यस्तरीय ‘एल्बो बॉक्सिंग’ स्पर्धेत भरत गुजले याला सुवर्ण, तर चैतन्या गुजले हिला रौप्य पदक !
सातारा, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील सनातनचे साधक श्री. प्रताप गुजले यांचे चिरंजीव भरत प्रताप गुजले याने दुसर्या राज्यस्तरीय ‘एल्बो बॉक्सिंग’ स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले असून या स्पर्धेतील ‘उत्कृष्ट फायटर’ म्हणून त्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कन्या चैतन्या प्रताप गुजले हिने रौप्य पदक पटकावले आहे. भरत आणि चैतन्या या दोन्ही भावंडांची पुणे येथे होणार्या राष्ट्रीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
१. महाराष्ट्र राज्य ‘एल्बो बॉक्सिंग असोसिएशन’ आणि ‘सातारा एल्बो बॉक्सिंग असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्या राज्यस्तरीय ‘एल्बो बॉक्सिंग’ स्पर्धा पार पडल्या. वडूज (जिल्हा सातारा) येथील स्वयंवर मंगल कार्यालयात १९ आणि २० फेब्रुवारी या दिवशी झालेल्या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतील स्पर्धक सहभागी झाले होते. भरत गुजले याने १६ वर्षांखालील ५४ ते ५६ किलो वजनी गटात सहभाग घेतला.
२. चैतन्या प्रताप गुजले हिने १४ वर्षांखालील ४४ ते ४६ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. ओकिनावा मार्शल आर्ट, क्षात्रतेज कराटे आणि स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने गुजले कुटुंबियांचे अभिनंदन करण्यात आले असून समाजातील विविध स्तरांतूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
३. प्रताप गुजले हे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. क्षात्रतेज कराटे आणि स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून युवकांना कराटे अन् विविध खेळांविषयी मार्गदर्शन करत आहेत.
ही गुरुदेवांची कृपा ! – प्रताप गुजले
प्रत्येक स्पर्धेमध्ये स्पर्धक अथक परिश्रम करत असतो, तसेच भरत आणि चैतन्या यांनी केले; मात्र स्पर्धेमध्ये माझ्या मुलांना जे यश प्राप्त झाले आहे, ते गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे प्राप्त झाले आहे, असे मी समजतो.