खानवडी (पुणे) येथील मराठी शाळेचे इंग्रजी शाळेमध्ये रूपांतर !

  • मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व सर्वश्रूत असतांना मराठी शाळेचे इंग्रजी शाळेत रूपांतर होणे दुर्दैवी ! – संपादक

  • मराठी शाळा अल्प होत असतांना आणि सर्वत्र मराठी भाषेची गळचेपी होत असतांना असा निर्णय घेणे अयोग्य आहे. मराठी भाषेचे महत्त्व समजून तिचा प्रसार आणि प्रचार करण्याऐवजी मराठी माध्यमाच्या शाळेचे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रूपांतर करणे कितपत योग्य आहे ? – संपादक 

पुणे – जिल्ह्यातील खानवडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे इंग्रजी माध्यमाच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये रूपांतर करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पुणे जिल्हा परिषदेस अनुमती दिली आहे. राज्य सरकारने या शाळेला ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ असे नाव दिले असून शाळेमध्ये पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे वर्ग असणार आहेत. त्यामुळे खानवडी येथील पुणे जिल्हा परिषदेची इंग्रजी माध्यमाची जिल्ह्यातील पहिलीच उच्च माध्यमिक शाळा ठरणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२२-२३) ही निवासी शाळा चालू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती रणजित शिवतारे यांनी दिली.

या शाळेकरिता राज्य सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुदान दिले जाणार नसल्याचे सरकारने स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच या शाळेमध्ये आवश्यक वर्ग खोल्या, भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे बंधनही जिल्हा परिषदेवर घालण्यात आले आहे.