परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या सौ. मनीषा महेश पाठक !

सौ. मनीषा पाठक

१. सौ. मनीषा पाठक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. प्रेमभाव : ‘सौ. मनीषाताईंना साधकांविषयी पुष्कळ प्रेम आहे. ‘प्रत्येक साधक गुरुदेवांचा लाडका आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्या प्रत्येक साधकाशी त्याच भावाने बोलतात.

वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर

१ आ. तत्त्वनिष्ठ : सौ. मनीषाताई साधकांना साधनेविषयीचे सूत्र सांगतांना नेहमी तत्त्वनिष्ठ राहून सांगतात. त्या कोणतेही सूत्र भावनेच्या स्तरावर हाताळत नाही.

१ इ. वेळेचे गांभीर्य असणे : त्या अनावश्यक बोलण्यात अजिबात वेळ घालवत नाहीत आणि कुणी अनावश्यक बोलत असल्यास त्या त्यांना त्याची जाणीव करून देतात.

१ ई. साधकांना साधनेत साहाय्य करणे

१ ई १. साधनेसाठी प्रोत्साहन देणे : मी मनीषाताईंकडे पूर्णवेळ साधना करण्याविषयीचे विचार व्यक्त केले. तेव्हा मी माझ्या मनातील द्वंद्व आणि अडचणी यांविषयी त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी मला त्यावर योग्य दृष्टीकोन देऊन साहाय्य केले. त्यांनी मला योग्य दिशा दिल्यामुळे मला निर्णय घेणे सोपे झाले.

१ ई २. साधकत्वाचे महत्त्व सांगणे : त्या सांगतात, ‘साधनेत पातळीपेक्षा साधकत्वाला अधिक महत्त्व आहे आणि साधकत्व असलेला साधकच गुरुचरणी टिकून रहातो.’

१ उ. सतत सेवारत असणे : त्यांच्याकडे एखादे सूत्र आले, तर ते त्या लगेच पूर्ण करतात. ‘त्यांच्याकडे एखादी अडचण मांडली आणि ती सुटली नाही’, असे कधीच होत नाही. त्यांना कितीही शारीरिक त्रास होत असला, तरी त्या सतत सेवारत असतात.

२. सौ. मनीषा पाठक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे : ‘मी सौ. मनीषाताई यांच्याकडे एका सेवेनिमित्त गेले होते. तेव्हा त्या सतत ‘परम पूज्य, परम पूज्य’, असे म्हणत गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात होत्या.

२ आ. सौ. मनीषाताईंची मर्दनसेवा करतांना त्यांनी गुरुदेवांना आळवणारे भजन लावणे, त्यामुळे अनावश्यक बोलणे टळून भाव अन् आनंद अनुभवता येणे : मर्दनसेवेच्या पहिल्या दिवशी माझ्याकडून अनावश्यक बोलणे झाले; परंतु दुसर्‍या दिवशी मर्दनसेवा करतांना मनीषाताईंनी गुरुदेवांना आळवणारे भजन लावले. त्यामुळे सेवा म्हणजे ४५ मिनिटांचा भावसत्संगच झाला.

त्यांच्या या कृतीतून ‘अनुसंधानात राहून सेवा कशी करायची ?’, हे मला शिकायला मिळाले. तसेच ‘अनुसंधानात राहून केलेल्या सेवेतील आनंद निरंतर रहातो’, हेही मला जाणवले.

३. अनुभूती

अ. मनीषाताईंच्या खोलीत मला गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले.

आ. मी त्यांची मर्दनसेवा सेवा करतांना ‘माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण निघत आहे’, असे मला जाणवत होते.

इ. त्यांची मर्दनसेवा झाल्यावर मला थकवा न येता उत्साह जाणवत असे.

‘हे गुरुदेवा, आपणच मला सौ. मनीषाताईंकडून शिकण्याची संधी दिली. त्यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२१)