स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इस्लाममधील बुरखा

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

पंजाबमध्ये विधीमंडळात एक मुसलमान महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. विधीमंडळाच्या शपथविधीच्या वेळी त्या जेव्हा सभागृहात आल्या, तेव्हा त्या मुसलमानांच्या शिष्टाचाराप्रमाणे बुरख्यात आल्या, एका स्वतंत्र बाजूस बसल्या, त्यांचे मुखदर्शन तर अशक्य होतेच; पण सभा पद्धतीप्रमाणे सर्व प्रतिनिधींना हस्तांदोलन करायचे होते, तेव्हाही मोठा पेच पडला ! ‘कुराणात बुरखा राखावा’, असे उल्लेख आहेत, हे अगदी खरे आणि त्या माननीय महिलेच्या त्या भावनेला तिच्यापुरता सन्मानही दिला पाहिजे. यातून ‘मुसलमान महिला कशा स्वधर्माभिमानी असतात त्या !’, असे त्या उदाहरणाचे मोठे कौतुक का करायचे ? आणि तिच्यापेक्षा हिंदु महिलांनी सवाई स्वधर्मनिष्ठ झाले पाहिजे, अशा हेव्याने बंगाल प्रभृति उत्तरेकडे ज्या हिंदूत बुरख्याची बुरसटलेली चाल आहे त्यांनी बुरखा सोडूच नये म्हणून का आम्ही सांगायचें ? दक्षिणेतील विधीमंडळातूनही हिंदु महिलांनी डोक्यापासून पायापर्यंत शिवलेल्या एका पिशवीत घुसून वावरत जावे नि सभागृहात एका कोपर्‍यात बसावे, असा उपदेश का द्यायचा ?

तुर्कांसारख्या इस्लामिक राष्ट्रांनी त्यांची रूढी त्यागली, ती हिंदी मुसलमानांनी भूषण म्हणून मिरवणे, हे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे !

प्रतिकात्मक छायाचित्र

बुरख्याची चाल ही एक अत्यंत अडाणी, अडगळीची विद्रूप रूढी आहे. ती मागच्या छप्पन्न पोथ्यांतून आली असली, तरी ती आज टाकली पाहिजे, हे हिंदी मुसलमानांच्या ध्यानात आले नसले, तरी जगातील प्रगत मुसलमानांच्या ध्यानात आलेले आहे. ज्या मासात ‘लाहोरच्या विधीमंडळातील मुसलमान महिला प्रतिनिधी सभागृहातही बुरख्यातच बसतात’, हे वृत्त मुसलमान समाजाच्या स्वाभिमानाचे एक प्रशंसार्ह उदाहरण म्हणून वृत्तपत्रात छापत होते. त्याच्याच मागच्या मासात ही बातमी छापून आली, ‘अल्बेनियाच्या राजाने (बाल्कनकडील) आपल्या मुसलमान प्रजेला सक्त आज्ञा सोडली की, जी स्त्री बुरखा घेऊन बाहेर फिरेल, तिचा तो एक दंडनीय अपराध समजला जाईल.’ तुर्कांनी त्यांच्या राज्यातून बुरख्याला कधीच चाट दिली.

इराणनेही बुरखा निषेधिला आहे. त्याची कारणेही ध्यानात ठेवण्यासारखी आहेत. पैकी एक कारण असे की, तुर्कच्या विधीमंडळात महिलांना प्रतिनिधी म्हणून बसण्याचा अधिकार मिळाला, ते दिवस राज्यक्रांतीचे होते. विरुद्ध पक्ष केव्हा घातपात करील, याचा केमाल पक्षाला विश्वास नसे. आता विधीमंडळात जर बुरखा घेऊन ५-५० महिला प्रतिनिधी घेऊन येण्याची अडाणी नि अवखळ चाल पाडली, तर त्या बुरख्यात खरोखरी ती महिला प्रतिनिधीच आहे कि कुणी तोतया नाही ? हे तरी कसे कळणार ? एखादा मारेकरीही त्या बुरख्यात महिला प्रतिनिधी म्हणून आत घुसू शकेल. केमालवर मारेकरी घातलेही गेले आहेत. अशा स्थितीत अशा धर्मवेडाच्या आहारी जाण्याजितके तरुण तुर्क दुधखुळे नव्हते ! ज्या महिलेलाला इतका टेंभा मिरवायचा आहे, तिने आपले अंतःपुर (कक्ष) सोडून बाहेर पडावेच का मुळी ? बाजारहाटाच्या भर दाटीत घुसावयाचे नि मग लोक शिवतात; म्हणून चिडायचे हा खुळेपणा होय, नाही तर खोडसाळपणा तरी ! तुर्कांसारख्या इस्लामिक राष्ट्रांनीही जी त्यांची रूढी अडाणी म्हणून त्यागली, ती जर हिंदी मुसलमान मोठे भूषण म्हणून मिरवत राहिले, तर त्यांच्याच पायावर धोंडा पाडून घेतील !

युरोपियनांनी बायबलमधील सूत्र त्यागून स्त्रीसमानता अंगीकारत असतांना हिंदूंनी महिलांच्या पूजनाचे सूत्र अंगीकारणे आवश्यक !

ते युरोपियन पहा ! बायबलमध्ये स्त्रिया नि दास हे केवळ आश्रित दयेचे विषय समानतेचे नव्हेत; पण आजच्या व्यवहारात ती पोथी गुंडाळून ठेवून त्यांनी आज राष्ट्रधारणास अवश्य त्या प्रकारे स्त्रीसमानतेचे, स्वातंत्र्याचे नवनवे निर्बंध पटापट घडवले. समरांगणातही महिलांचे सैन्य झुंजत आहे ! दासप्रथा तर स्वतःच्या लोकांपुरती तरी निषिद्ध नि दंडात्मक ठरवली ! आम्ही करावयाचे तर त्यांचे अनुकरण उपयुक्त त्या प्रमाणात करावे. मनुस्मृतीत ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ हे वचन आहे, तसेच ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ये रमन्ते तत्र देवताः ।’ हेही वचन आहे ! पहिल्या वचनासाठीच मनुच्या नावे रडत बसण्यात काय अर्थ ? त्याचे दुसरे वचनही आमचे ब्रीदवाक्य नि त्या स्मृतीकारांचा गौरव का ठरू नये ?

संकलक – चंद्रशेखर साने (साभार : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमधील सारांश, ‘किर्लोस्कर’, जून १९३७)