साधकांवर मातृवत् प्रेम करणार्या आणि ‘केवळ अन् केवळ प.पू. गुरुदेव !’ हेच जीवन असणार्या पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक !
माघ कृष्ण पक्ष नवमी, दासनवमी (२५.२.२०२२) या दिवशी सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचा ४० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती नरेंद्र दाते यांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. व्यष्टी साधना आणि भावजागृती यांचे प्रयत्न तळमळीने करणे अन् साधकांकडूनही तसे प्रयत्न करवून घेणे
सौ. मनीषातार्ईला गेल्या अनेक मासांपासून आमवाताचा त्रास होत आहे. त्यामुळे तिला पुष्कळ वेदना होतात. तिला दैनंदिन कृती करायलाही अडचणी येतात. असे असतांनाही ती करत असलेले व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे प्रयत्न पाहिल्यावर अचंबित व्हायला होते. ती स्वतः व्यष्टी साधना आणि भावजागृती यांचे प्रयत्न तळमळीने करते अन् साधकांकडूनही तसेच करवून घेते की, त्याला तोड नाही.
२. समष्टी साधनेची तीव्र तळमळ असल्याने समष्टीशी एकरूप होणे
ताई परात्पर गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी जिवाचे रान करून प्रयत्न करते. तिची संतांचे आज्ञापालन करून प्रत्येक कृती करण्याची तळमळ असते. ‘त्यासाठी काय करू ?’, असे तिचे अखंड चिंतन चालू असते. तिचे स्वतःचे असे वैयक्तिक जीवनच नाही, एवढी ती समष्टीशी एकरूप झाली आहे. ती कपडे, अलंकार, खाणे-पिणे यांविषयी अनासक्त आहे.
३. साधकांवर मातृवत् प्रेम करणे
ताईचे सर्व साधकांवर मातृवत प्रेम आहे. तिच्या व्यस्ततेतूनही ती नियमितपणे साधकांशी अनौपचारिक बोलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सर्वच साधकांना तिचा आधार वाटतो.
४. परात्पर गुरुदेवांप्रतीच्या दृढ श्रद्धेच्या बळावर प्रत्येक परिस्थिती स्वीकारणे
ताईने स्वतःची शारीरिक स्थिती पूर्णपणे स्वीकारली आहे. तिचे त्याविषयी काहीच गार्हाणे नसते. ‘प्रत्येक परिस्थिती ही स्वतःच्या साधनेसाठी देवाने निर्माण केली आहे’, अशी तिची दृढ श्रद्धा आहे. ‘केवळ आणि केवळ प.पू. गुरुदेव !’, असेच तिला सतत वाटत असते.
५. सद्गुरु राजेद्र शिंदे यांनी केलेले कौतुक
एकदा सद्गुरु राजेद्र शिंदे म्हणाले, ‘‘सनातनच्या साधकांचे वैशिष्ट्य आहे की, कोणत्याही परिस्थितीत ते आनंदी असतात. मनीषाताई त्याचे उदाहरण आहे.’’
६. सौ. मनीषा पाठक यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. मला मनीषाताईच्या सहवासात आनंद जाणवतो.
आ. मला तिच्या खोलीत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच मला सौ. मनीषाताईचा सहवास मिळत आहे, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
– सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.२.२०२२)