महाशिवरात्रीच्या निमित्ताने समष्टी सेवेतून शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्या ! – कु. वर्षा जेवळे, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर येथे ‘ऑनलाईन महाशिवरात्री धर्मप्रसार अभियान शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले !
सोलापूर – महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ करून घेण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची यानिमित्ताने संधी आहे. समाजातील अनेक लोकांना धर्मशिक्षणाच्या अभावी शिवपिंडीला बेल कसे वहावे ? शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? याविषयी ठाऊक नसते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध ठिकाणी प्रवचनांचे आयोजन करून शिवपूजनाचे शास्त्र सांगून समाजाला त्याविषयी अवगत करायला हवे. यासमवेतच महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर स्वच्छता अभियान, हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा, ग्रंथप्रदर्शन, अशा विविध समष्टी सेवा करण्याची सुवर्णसंधी आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १७ फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन महाशिवरात्री धर्मप्रसार अभियान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या शिबिराला १२० हून अधिक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी सनातनच्या सोलापूर येथील पू. (कु.) दीपाली मतकर यांनी भगवान शिवाविषयी भावपूर्ण मानसपूजा सांगितली. शिबिराच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी जिल्ह्यात धर्मप्रेमींनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. राजन बुणगे यांनी धर्मप्रेमींना महाशिवरात्रीच्या निमित्ताने ध्येय निश्चित करून समष्टी सेवा कशा प्रकारे करू शकतो ? याविषयी मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन श्रीमती हर्षा लंके यांनी केले.
विशेष
१. शिबिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने धर्मप्रेमींनी समष्टी सेवा कशी करावी ? हे प्रायोगिक भागाद्वारे सांगितले.
२. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये, यासाठी समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘संस्कृती रक्षण अभियाना’च्या वेळी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचे कथन धर्मप्रेमींनी केले.
३. शिबिरानंतर अनेक धर्मप्रेमींनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन, हस्तपत्रकांचे वितरण, प्रवचनांचे आयोजन करणे, अशा विविध समष्टी सेवांमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले.