महान क्रांतीकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद !
२७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…
‘भारत राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांचे मूळ नाव ‘चंद्रशेखर सीताराम तिवारी’ होते. त्यांच्याविषयी जेवढे म्हणून लिहावे, तेवढे ते अल्पच आहे. ते एक असे सेनानी होते की, जे इंग्रजांच्या हाती कधीही जिवंत न सापडण्याच्या स्वतःच्या प्रतिज्ञेवर अटळ राहिले आणि त्याचमुळे त्यांचे नाव भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले गेले आहे.
चंद्रशेखर आझाद यांनी ‘असहकार चळवळी’त सहभाग घेणे आणि अटक करून न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांनी स्वतःचे नाव ‘आझाद’ सांगून बाणेदारपणा दाखवून देणे
चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या आईने ‘संस्कृत’ शिकण्यासाठी काशी विश्वविद्यालयामध्ये पाठवले होते; परंतु तेथे ते राष्ट्र्रवादाशी एवढे परिचित झाले की, त्यांनी वर्ष १९२१ मध्ये म. गांधींच्या ‘असहकार चळवळी’त उडी घेतली. या चळवळीत भाग घेतल्यामुळे आझाद यांना इंग्रज सरकारने कह्यात घेतले. त्यानंतर त्यांना न्यायाधिशांसमोर उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्यांना त्यांचे आणि पित्याचे नाव विचारले, तेव्हा त्यांनी, ‘माझे नाव आझाद आहे, माझ्या पित्याचे नाव स्वातंत्र्य आणि घराचा पत्ता कारागृह !’, असे बाणेदार उत्तर दिले. यातून त्यांनी केवळ स्वतःच्या बुद्धीमत्तेची चुणूक दाखवली नाही, तर संपूर्ण जगाला हेही दाखवून दिले की, त्यांच्या रोमारोमांत राष्ट्र्रभक्तीची भावना किती ठासून भरली आहे. वरील प्रसंगानंतरच पंडित रामप्रसाद बिस्मिल आणि सरदार भगतसिंह यांसारख्या क्रांतीकारकांनी त्यांना ‘चंद्रशेखर आझाद’ या नावाने संबोधायला प्रारंभ केला अन् पुढे ते त्याच नावाने प्रसिद्ध झाले.
आझाद यांनी म. गांधींच्या चळवळीतून बाहेर पडून क्रांतीकारी कार्य चालू करणे आणि वेश पालटून इंग्रजांना गुंगारा देणे
वर्ष १९२२ मध्ये चौरी चौरा घटनेनंतर म. गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतली. (उत्तरप्रदेशमधील चौरी चौरा येथे असहकार चळवळीच्या अंतर्गत आंदोलकांनी इंग्रज पोलिसांवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी तेथील पोलीस ठाण्याला आग लावली. त्यामध्ये ३ नागरिक आणि २२ इंग्रज पोलीस मृत्यू पावले.) या पालटामुळे चंद्रशेखर आझाद ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’चे सक्रीय सदस्य बनले आणि क्रांतीकारी हालचाली करण्यात गुंतले. त्यानंतर त्यांनी क्रांतीकारकांना हाताशी धरून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी इंग्रजांचा सरकारी खजिना लुटण्यास चालू केले. पुढे ते रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक काकोरीकांडचा परिणाम म्हणून ते फरारी झाले. (उत्तरप्रदेशमधील काकोरी येथे पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह काही क्रांतीकारकांनी रेल्वे अडवून त्यातील इंग्रजांचा सरकारी खजिना लुटला होता. पुढे या प्रकरणी रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह अन्य २ क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली.) फरार झाल्यानंतर ते झाशीजवळच्या एका मंदिरात साधूच्या वेशात राहू लागले; परंतु जेव्हा पोलिसांनी तेथे छापा मारला. तेव्हा ते स्त्री वेश परिधान करून इंग्रजांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले.
चंद्रशेखर आझाद यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा सूड म्हणून इंग्रज पोलीस अधिकारी साँडर्स याला ठार मारणे
इंग्रजांनी पुढे ‘सायमन कमिशन’ भारतात आणले होते. त्याला लाला लाजपत राय यांनी विरोध केला. या विरोधाच्या वेळी इंग्रज पोलीस अधिकारी साँडर्स याने आंदोलकांवर लाठी मारण्याचा आदेश दिला. त्या लाठी आक्रमणामध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. या मृत्यूचा सूड घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी लाहोरमध्ये साँडर्सला गोळी घालून ठार मारले. यानंतर लाहोरमधील भिंतींवर ‘लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा सूड घेतला आहे’, अशी भित्तीपत्रके जागोजागी चिकटवण्यात आली होती.
चंद्रशेखर आझाद यांनी इंग्रजांशी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणे आणि इंग्रजांनी कह्यात घेऊ नये; म्हणून स्वतःला गोळी घालून हुतात्मा होणे
२७.२.१९३१ या दिवशी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद हे इंग्रज पोलिसांकडून चहूबाजूंनी घेरले गेले. त्या वेळी त्यांनी जवळजवळ २० मिनिटांपर्यंत एकट्यानेच ‘बमतुल बुखारा’च्या (आझाद यांच्या पिस्तुलाचे नाव) साहाय्य्याने लढा दिला. त्यानंतर त्यांच्याजवळ जेव्हा केवळ एकच शेवटची गोळी शिल्लक राहिली, तेव्हा त्यांनी स्वतःच स्वतःला गोळी मारून घेऊन स्वतः केलेल्या प्रतिज्ञेवर ते ठाम राहिले आणि स्वतःला कायमस्वरूपी आझाद केले.
या अंतिम लढाईत त्यांनी इंग्रजांना एवढे भयभीत केले होते की, ज्यामुळे इंग्रज पोलिसांना त्यांच्याजवळ जाण्याचे धाडसच होत नव्हते. बर्याच वेळानंतर जेव्हा आझाद यांच्याकडून गोळी चालवली गेली नाही, तेव्हा इंग्रज पोलीस योग्य ती काळजी घेत त्यांच्याजवळ गेले. त्या वेळी त्या सर्वांची दृष्टी आझाद यांच्या मृत शरिरावर पडली. आज ‘अल्फ्रेड पार्र्क’ आता ‘चंद्रशेखर आझाद पार्क’ या नावाने ओळखले जाते.
आझाद यांची देशाप्रती निष्ठा, समर्पण हे निःस्वार्थी असल्यानेच त्यांना देशभक्तीचे प्रतीक मानले जाणे
असे म्हटले जाते की, आझाद यांनी केवळ एकच कविता लिहिली होती आणि ते सारखे गुणगुणत होते, ‘‘दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आझाद ही रहे हैं, आजाद ही रहेंगे ।’’ खरे पहाता चंद्रशेखर आझाद हे स्वतःच एक मोठे आंदोलन होते. त्यांची देशाप्रती निष्ठा, समर्पण अगदी निःस्वार्थी होते. त्यामुळेच ते आज सुद्धा देशातील युवकांना प्रभावित आणि प्रेरित करतात. भले त्यांना इंग्रजांना भारतातून पळवून लावणे शक्य झाले नसले, तरीही त्यांच्या बलीदानामुळे सहस्रो नवयुवकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. याच कारणामुळे त्यांना देशभक्तीचे प्रतीक मानून आज सुद्धा सर्वजण त्यांचे नाव अत्यंत आदराने आणि सन्मानाने घेत आहोत. अशा प्रकारे आम्हा सर्व भारतियांच्या हृदयात त्यांच्या स्मृती आजही ताज्या आहेत.
लेखक : गोवर्धन दास बिन्नाणी (राजा बाबू), बिकानेर, राजस्थान