प.पू. दास महाराज यांनी ध्यान लावल्यानंतर त्यांना विदेही स्थिती प्राप्त होत असल्याविषयी त्यांनी सांगितलेली सूत्रे
१. पूर्वी प.प. भगवान श्रीधरस्वामींच्या सान्निध्यात असतांनाही विदेही स्थिती असणे आणि आता साधकांसाठी नामजप करायला लागल्यापासून विदेही अवस्था प्राप्त होणे
‘ऑगस्ट २०१९ मध्ये आम्ही रामनाथी येथील सनातच्या आश्रमात आलो. एकदा मी पू. माईंना (पत्नीला) म्हटले, ‘‘मी पायाने अधू आहे. मला सेवा करणे शक्य नाही. तू तरी सेवा कर. ‘आपण आश्रमातील नुसता प्रसाद-महाप्रसाद घेतला’, असे होऊ नये.’’ त्यानंतर पू. माई धान्य निवडण्याच्या सेवेला जाऊ लागल्या. काही दिवसांनी ‘पू. माई धान्य निवडण्याची सेवा करत आहेत’, हे गुरुदेवांना समजले. तेव्हा गुरुदेवांनी १४.८.२०१९ या दिवसापासून आम्हाला साधकांसाठी नामजप करायला सांगितला. तेव्हापासून गुरुदेवांच्या कृपेने आमची साधकांसाठी नामजप करण्याची सेवा चालू झाली आणि त्या वेळेपासूनच माझ्या विदेही स्थितीला आरंभ झाला. यापूर्वी प.प. भगवान श्रीधरस्वामींच्या सान्निध्यात असतांनाही माझी विदेही स्थिती असायची; परंतु मधल्या काही वर्षांत व्यावहारिक जीवनाची घडी बसवण्याच्या धावपळीमध्ये ध्यानसाधना न्यून झाल्याने माझी ही स्थिती अल्प झाली होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांसाठी नामजप करण्याची सेवा चालू केल्यानंतर मला पुन्हा समाधी अवस्था प्राप्त होऊन माझी विदेही स्थिती होऊ लागली आहे.
२. गुरूदेवांना तळमळीने हाक मारल्यावर ते यज्ञस्थळी उपस्थितीत रहाणे, यज्ञानंतर ‘ॐकारा’चा नाद ऐकू येणे, ‘हरि ॐ तत्सत्’चा जप होणे, हाताच्या मुद्रा होणे’, असे आपोआप होत असणे
२ अ. ‘गुरुदेवांना तळमळीने हाक मारल्यावर ते धावून येतात’, याची अनुभूती येणे : त्यानंतर साधकांचे रक्षण होण्यासाठी मारुतिरायांचे कवच निर्माण व्हावे; म्हणून ५ ‘हनुमत्कवच’ यज्ञ केले. तेव्हा मला ‘परात्पर गुरु डॉक्टर यज्ञस्थळी यावेत’, असे वाटायचे. ही इच्छा गुरुदेवांनी ५ व्या यज्ञाच्या वेळी पूर्ण केली. त्या वेळी पूर्णाहुतीच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर यज्ञस्थळी उपस्थित राहिले. ज्याप्रमाणे वासरु हंबरल्यावर गाय पान्हा सोडायला धावून येते, त्याप्रमाणे शिष्याने हाक मारल्यावर गुरुदेव आईप्रमाणे धावून आले. ‘जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती’, याप्रमाणे होण्यासाठी गुरुदेवांना तळमळीने हाक मारायला हवी.
२ आ. ‘ॐकारा’चा नाद ऐकू येणे : या यज्ञानंतर खोलीत आल्यावर मला ‘ॐकारा’चा नाद ऐकू येऊ लागला. मी निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘हा नाद बाह्य ठिकाणाहून ऐकू येत नव्हता.’ त्या वेळी कु. माधवीताई खोलीत होत्या. त्यांनी ‘तो अनाहत नाद असून तो तुमच्या अनाहतचक्रातून येत आहे’, असे सांगितले. त्यानंतर ७.७.२०२० या दिवशी संध्याकाळी साधकांसाठी नामजप करतांना मला आपोआप ‘ॐकारा’चा नाद येऊ लागला.
२ इ. स्वतःची जाणीव नसणे : या स्थितीतच साधकांसाठी नामजप करतांना ‘ॐकारा’चा नाद ऐकू येणे, जपमाळ आपोआप हातातून गळून खाली पडणे, तोंडवळ्यावर हास्य उमटणे, समाधीस्थिती असूनही डोळे उघडे असणे, ‘हरि ॐ तत्सत्’चा जप होणे, हाताच्या मुद्रा होणे, ‘हनुमान मुद्रा’ होणे’, असे आपोआप होत होते. हे सर्व होत असतांना मला माझे भान नसायचे. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच झाले आहे.’
– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२०)