तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणारे वर्धा येथील श्री. शशिकांत रामचंद्र पाध्ये (वय ७५ वर्षे) !

‘वर्धा येथील श्री. शशिकांत रामचंद्र पाध्ये (वय ७५ वर्षे) यांची त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. शशिकांत पाध्ये

सौ. शिल्पा शशिकांत पाध्ये (श्री. शशिकांत रामचंद्र पाध्ये यांची पत्नी)

सौ. शिल्पा शशिकांत पाध्ये

१. आईची सेवा मनापासून करणे : ‘आम्ही भाड्याने रहात असलेले घर जुन्या पद्धतीचेे असल्यामुळे त्याला मोठ्या पायर्‍या होत्या. तेव्हा माझे यजमान (श्री. शशिकांत) प्रतिदिन त्यांच्या आईला पायर्‍यांवरून उचलून न्यायचे. त्यांनी आईची सेवा मनापासून केली.

२. वर्ष २०१८ मध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाल्यावरही ते स्थिर होते. तेव्हा त्यांनी सकारात्मक राहून आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून त्या रोगावर मात केली.

३. पत्नीची काळजी घेणे : मार्च २०२१ मध्ये मला कोरोना झाला असतांना घरातील सर्व कामे करणे, माझी काळजी घेणे आणि व्यष्टी साधना करणे, हे त्यांनी मनापासून केले. मला एकटे वाटू नये, यासाठी ते मला मधूनमधून गुरुदेवांची साधनेविषयीची सूत्रे सांगायचे. तेव्हा मला त्यांचा फार आधार वाटायचा.’

सौ. वैशाली महेश परांजपे (मोठी मुलगी)

१. सचोटीने वागणे : ‘बाबा कार्यालयाच्या वेळा कटाक्षाने पाळत असत. त्यांना कार्यालयाकडून जाण्या-येण्यासाठी गाडी मिळाली होती; पण त्यांनी कधीही तिचा अपवापर केला नाही. ते घरून वर्धा रेल्वेस्थानकापर्यंत आणि नागपूर रेल्वेस्थानकापासून कार्यालयात पायी जायचे. ते प्रतिदिन साधारण १५ ते २० कि.मी. चालायचे; पण त्यांनी कधीही त्याचा बाऊ केला नाही.

२. स्वीकारण्याची वृत्ती : मी ‘एल्.एल्.बी.’चे शिक्षण घेत असतांना एका नाटकात काम करत होते. सरावाहून घरी परत यायला मला रात्रीचे १२ वाजायचे. बाबा तोपर्यंत जागे रहायचे; पण ते मला कधीच ‘तुझ्यामुळे मला झोपायला विलंब होतो’, असे म्हणाले नाहीत.

सौ. वैशाली महेश परांजपे

३. साधनेत साहाय्य करणे : आम्ही वर्धा येथे श्री. भिडे यांच्या घरात भाड्याने रहायचो. श्री. भिडे यांची २ मुले संघाचे पूर्णवेळ काम करतात. त्यामुळे बाबांना ‘आपल्या मुलींनीही जीवनातील काही काळ देशासाठी द्यायला हवा’, असे वाटायचे. त्यांनी मला ‘१ – २ वर्षे तरी तू देशासाठी सेवा कर’, असे सांगितले होते. आम्ही सनातनमध्ये आल्यावर आम्हाला देशकार्य आणि राष्ट्रकार्य करण्यासह साधना करण्याचे महत्त्व समजले. तेव्हा त्यांनी मला रामनाथी आश्रमात साधनेसाठी जायला अनुमती दिली.

४. वेळेचे नियोजन करणे : त्यांचे सकाळपासूनचे नियोजन ठरलेले असते. ते स्वतःची व्यष्टी साधना आणि नामजप पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष देतात.

५. शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ

अ. ते वय किंवा शारीरिक त्रास यांचा विचार न करता उत्साहाने सेवेत सहभागी होतात. ते वयाच्या ७० व्या वर्षी संगणकावर मराठी टंकलेखन करायला शिकले. त्यामुळे ते विज्ञापनांचे टंकलेखन किंवा त्या संबंधित अन्य सेवाही करू शकतात.

आ. त्यांनी भ्रमणभाषमधील प्रणालीही उत्सुकतेने आणि मनापासून शिकून घेतल्या. त्यामुळे आता ते सामाजिक प्रसारमाध्यमांच्या संबंधित (सोशल मिडियाची) सेवा करू शकतात.

६. कृतज्ञताभाव

अ. माझे आजोबा (वडिलांचे वडील कै. रामचंद्र पाध्ये) ज्योतिषी होते. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले होते, ‘‘केवळ गुरुकृपेमुळेच तुझे आयुष्य सुरळीत चालू आहे.’’ तेव्हा माझ्या वडिलांना वाटायचे, ‘आपल्याला गुरु नाहीत, तर माझ्यावर गुरुकृपा कशी असू शकेल ?’ बाबा सनातन संस्थेच्या संपर्कात झाल्यावर त्यांच्या लक्षात आले, ‘मी गुरुकृपेमुळेच सनातनमध्ये आलो आहे.’ तेव्हा त्यांना माझ्या आजोबांच्या म्हणण्याचा अर्थ कळू लागला. ते नेहमीच म्हणतात, ‘‘भगवंताने मला माझ्या पात्रतेपेक्षा भरभरून दिले आहे. मी कृतज्ञ आहे.’’

आ. ‘सनातन संस्थेसारख्या राष्ट्र आणि धर्म यांचा सर्वांगीण विचार करणार्‍या संस्थेत मला सेवा करायला मिळते’, याबद्दल त्यांना कृतज्ञता वाटते.’

सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर (लहान मुलगी)

सौ. भार्गवी क्षीरसागर

१. आई-वडिलांची सेवा मनापासून करणे : ‘बाबांनी त्यांच्या आई-वडिलांची सेवा मनापासून केली. माझी आजी १३ वर्षे पलंगावर होती. माझ्या आई-बाबांनी आजीची सर्व सेवा करणे, तिने रात्री काहीही मागितले, तरीही आणून देणे इत्यादी सर्व केले. आम्ही लहान असतांना आमची आजी बाबांना रात्री ११ वाजताही बाहेरून एखादी वस्तू आणायला सांगत असे. त्या वेळीही ते लगेच सायकलने बाहेर जायचे आणि आजीला हवी असलेली वस्तू आणून द्यायचे.

२. प्रामाणिकपणे नोकरी करणे : बाबांनी प्रामाणिकपणे नोकरी केली. ते नोकरी करत असतांना त्यांनी कोणाकडूनही काम करून देण्यासाठी पैसे घेतले नाहीत. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु त्यांनी ते सहजतेने स्वीकारले.

३. सेवेची तळमळ : त्यांचे वय ७५ वर्षे आहे. त्यांची शारीरिक स्थितीही चांगली नाही, तरीही ते सेवा तळमळीने करतात. ज्ञानशक्ती प्रसार अभियान चालू झाल्यापासून ते प्रतिदिन ‘सेवेला कुठे जायचे ?’, असे विचारतात आणि सेवा संपायला कितीही वेळ झाला, तरी उत्साहाने सेवा करतात.’

सौ. वैशाली महेश परांजपे, नागपूर आणि सौ. भार्गवी नीरज क्षीरसागर, वर्धा यांना बाबांमध्ये जाणवलेले पालट

१. चिडचिड न्यून होणे : ‘बाबा साधनेत येण्यापूर्वी त्यांचा स्वभाव फार कडक होता. ते घरात मोठे असल्याने ‘सर्वांनी त्यांचे ऐकायला हवे’, असे त्यांना नेहमी वाटत असे; परंतु सनातन संस्थेमध्ये आल्यानंतर त्यांचा तो भाग उणावला. आता त्यांची चिडचिड होत नाही.

२. ते प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा देतात. काही कारणास्तव आढाव्याला कुणी उपस्थित नसतील, तर ‘प.पू. गुरुमाऊलींना आढावा देत आहोत’, या भावाने ते एकटेच संपूर्ण आढावा देतात.

३. त्यांच्या तोंडवळ्यावरील आवरण न्यून झाल्याचे जाणवते.

४. ते नेहमी आनंदात असतात.

हे श्रीकृष्णा, तूच आम्हाला आमची काही पात्रता नसतांना अशा आई-बाबांच्या पोटी जन्म दिलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

(२५.१०.२०२१)