‘दी कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर खाते तात्पुरते केले बंद !

  • कट्टरतावाद्यांकडून धमक्या मिळत असल्यामुळे केली कृती !
  • काश्मिरी हिंदूंवर धर्मांधांनी केलेल्या अत्याचाराला चित्रपटाद्वारे वाचा फोडणार्‍या दिग्दर्शकाला धमक्या देणार्‍यांवर पोलीस कधी कारवाई करणार ?
‘दी कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री

नवी देहली – १९९० च्या दशकात लक्षावधी काश्मिरी हिंदूंवरील वंशसंहाराविषयी प्रकाश टाकणार्‍या आगामी ‘दी कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या जिविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचे ट्विटर खाते तात्पुरते बंद केल्याचे त्यांच्या इन्स्टाग्राम खात्याद्वारे पोस्ट करून सांगितले.

त्यांनी म्हटले, ‘ट्विटरवरून मला जिवे मारण्याच्या अनेक धमक्या येत होत्या. हे मी पचवू शकतो; परंतु ‘माझी मुले आणि कुटुंब यांच्या विरोधातही कृती केली जाईल’, अशा स्वरूपाच्या धमक्या येऊ लागल्याने काही दिवसांसाठी मी ट्विटर खाते बंद केले आहे. अग्निहोत्री यांनी, ‘मी सध्या ताण-तणावातून जात आहे’, असे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.