‘ईडी’ची नवाब मलिक यांच्यावरील कारवाई चुकीची नाही, आरोप खोटे असतील तर सिद्ध करा ! – चित्रा वाघ, प्रवक्त्या, भाजप
संभाजीनगर – देशद्रोही दाऊद इब्राहिमविषयी काही माहिती असेल, तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यावर कुणी आक्षेप घेता कामा नये. तथ्य नसेल, तर ते बाहेर येईल. आपण जर काही केलेच नाही, तर घाबरायचे कारण काय ? २-३ मासांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे सादर केले होते. पुरावे खोटे असेल, तर ते सिद्ध करा. कारवाई चुकीची नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी २३ फेबुवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, बाँबस्फोट घडवणार्याने नवाब मलिक यांचे नाव घेतले. त्यामुळे त्यांची चौकशी चालू असेल. ईडी जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत मी बोलणे योग्य नाही. जसेजसे पुरावे सिद्ध होत आहेत, तशीतशी कारवाई होत आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्याविषयी ‘ईडी’कडे पुरावे आहेत, त्यामुळे अटक केली आहे.
वैजापूर येथील शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी महिलेला मारहाण केली आहे. याविषयी सत्ताधारी बोलणार नसतील, तर त्यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. छत्रपती शिवाजी महाराज असते, तर या सरकारचा कडेलोट केला असता. पोलीस बोरनारे यांना पाठीशी घालत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर जामीन मिळणारी कलमे लावली आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.