राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर विभागीय चौकशी चालू असतांनाही अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार !
पुणे – राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिक्षण विभागातील तीन वरिष्ठ अधिकारी असतांनाही परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे हे शक्य झाल्याची चर्चा चालू आहे. सहसंचालक दर्जाच्या अधिकार्याकडे आयुक्तपदाचा अथवा अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देऊ नये त्यामुळे कामावर नियंत्रण रहात नाही, असा संकेत आहे; मात्र सुपे यांची नियुक्ती करतांना हा संकेत पाळला गेलेला नाही.
शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांनी सुपे यांच्यावर दबाव टाकून जी.एस्. सॉफ्टवेअर आस्थापनाला काळ्या सूचीतून बाहेर काढले; तसेच डॉ. प्रितीष देशमुख, सौरभ त्रिपाठी आणि इतर यांच्याशी संगनमत करून ७ सहस्र ८८९ परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र ठरवले. शिक्षक पात्रता परीक्षेतील अनियमिततेच्या प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. परीक्षेतील अनियमिततेसमवेत सुपे यांना एकाच वेळी २ पदांचा कार्यभार कसा देण्यात आला ? याची चौकशी करावी याची मागणी केली जात आहे.