नवी मुंबई महापालिकेचा ४ सहस्र ९१० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संमत

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्ष २०२२-२३ साठी ४ सहस्र ९१० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर करून संमत केला. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही.

या अर्थसंकल्पात ४ सहस्र ९१० कोटी रुपये जमा आणि ४ सहस्र ९०८ कोटी २० लाख रुपये खर्चासह १ कोटी ८० लाख रुपये शिल्लक अपेक्षित धरण्यात आली आहे. खर्चाच्या बाजूमध्ये आरोग्य सुविधांवर २२४ कोटी ८१ लाख रुपये, नागरी सुविधांसाठी १ सहस्र ४७२ कोटी रुपये, परिवहन सेवेवर १६१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

विकासकामांमध्ये पामबीच मार्गावर घणसोली ते ऐरोली आणि अरेंजा चौक येथे अन् ठाणे-बेलापूर मार्ग तुर्भे येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. नेरूळमध्ये ‘सायन्स पार्क’ उभारणे, शहरात सर्वत्र एल्.ई.डी विद्युत् दिवे बसवणे, प्रत्येक विभागात विद्युत् आणि गॅस यांच्या शवदाहिनी बसवणे, मोरबे धरणावर सौरऊर्जा प्रकल्प करणे ही महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.