‘डर्टी डझन’ असा उल्लेख करून किरीट सोमय्या यांनी केली महाविकास आघाडीतील १२ नेत्यांची नावे प्रसारित !
मुंबई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ‘डर्टी डझन’ असा उल्लेख करून महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे स्वत:च्या ‘ट्विटर’ खात्यावर प्रसारित केली आहेत. यामध्ये अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या नावांचा समावेश आहे.
याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘यांतील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक झाली असून उर्वरित १० जणांनाही अटक होईल. अजित पवार यांचा जरेंडेश्वर कारखाना केव्हा कह्यात घेण्यात येईल, याची मी वाट पहात आहे. हसन मुश्रीफ आधीच संकटात आहेत. प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर आणि जितेंद्र आव्हाड यांचाही यात समावेश आहे. हे ‘डर्टी डझन’ महाराष्ट्राला लुटत आहेत. त्यांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया चालू झाली आहे.’’