मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत बाँबस्फोट करणार्या आतंकवाद्यांकडून भूमी खरेदी करण्याचे कारण काय ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथे बाँबस्फोट करणार्यांसमवेत भूमी खरेदीचा व्यवहार का केला ? एखाद्या मंत्र्यांनी आतंकवाद्याकडून भूमी खरेदी करण्याचे कारण काय ?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला आहे. अंमलबजावणी संचानालयाने (‘ईडी’)ने केलेली कारवाई नियमानुसार आहे. संपूर्ण व्यवहारात ‘टेरर फन्डिंग’ची (आतंकवादी कारवायांना पैसा गेल्याची) गोष्ट स्पष्ट दिसत आहे. दाऊद, जो देशाचा शत्रू आहे किंवा त्याच्या बहिणीशी व्यवहार कसे करू शकतो ?, असेही ते म्हणाले.
Nawab Malik Arrested: मलिक पर Devendra Fadnavis ने लगाए आरोप, कहा- ‘देश के दुश्मनों को दी गई जमीन’
— रिपब्लिक.भारत (@Republic_Bharat) February 24, 2022
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांसमवेत संबंध आणि आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य केल्याच्या गंभीर आरोपाखाली नवाब मलिक यांना ‘ईडी’ने अटक केली आहे. त्यांना पी.एम्.पी.एल्. कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर मुंबई येथील भूमींचा व्यवहार करत होती. हसीना हिला या व्यवहारात ५५ लाख रुपये मिळाले होते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या साहाय्याने नवाब मलिक यांना भूमी मिळाली होती. सर्व पैसा हसीना पारकर, म्हणजेच दाऊद याला मिळाला आहे.
ते म्हणाले की, नवाब मलिक यांच्या संदर्भातील हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि ‘ईडी’ने काही ऑपरेशन केले. त्यात दाऊद ‘रिअल इस्टेट’मधून (बांधकाम व्यवसायातून) ‘टेरर फंडिंग’ करत असल्याचे दिसून आले आहे. ‘ईडी’नेही ९ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यात अनेक दुवे (लिंक) मिळाले आहेत. त्यात मंत्री नवाब मलीक यांचे नाव आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ज्या भूमीचा व्यवहार केला आहे, त्याचा मूळ भूमी मालकांना कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यांच्यावर दबाव होता.
या विषयावर राजकारण नको !
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षाने ‘टेरर फंडिंग’चा निषेध करायलाच पाहिजे. देशाचा शत्रू असलेल्या दाऊद याच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी. सहस्रो कोटी रुपयांची भूमी ३० लाख रुपयांत घेतली. त्याचे पैसे मूळ मालकाला मिळाले नाहीत. या व्यवहारानंतर मुंबईवर ३ वेळा आतंकवादी आक्रमणे झाली. आतंकवादी कृत्यात हा पैसा वापरला गेला. राजकारण करण्याचा विषय नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी देशहिताची भूमिका घ्यावी.
हा तर चुकीचा पायंडा पडेल…
फडणवीस म्हणाले की, मलिक यांना राजकीय गुन्ह्यांत नव्हे, तर ‘टेरर फंडिंग’मध्ये अटक झाली आहे. त्यात मलिक हे मंत्रीपदाचे त्यागपत्र देणार नसतील, तर संविधानिक स्थिती निर्माण होईल. राजकारणाचा स्तर इतका खाली पडला, तर एक वाईट आणि चुकीचा पायंडा पडेल. दाऊद याच्याशी संबंधित व्यवहार केलेल्या मंत्र्याला वाचवायला सर्व पक्षांनी एकत्र येणे धोक्याचे आहे. आम्हाला मलिक यांचे त्यागपत्र मागण्याची वेळ यायला नको. त्यांनीच त्यागपत्र द्यायला हवे.