वैज्ञानिक संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत ! – डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु
पुणे – वैज्ञानिक संशोधन कसे चालते ? याची योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. त्याकरीता उद्योग आणि महाविद्यालय यांमध्ये देवाणघेवाण अन् समन्वय असणे आवश्यक आहे. तरच प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधनाची परिपूर्ण माहिती मिळेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अंतर्भाव असलेली ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’ ही याकरीता उपयुक्त असून वैज्ञानिक संशोधन करतांना विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दलची आवड, संयम आणि सातत्य असणे आवश्यक आहे, प्रत्येक वेळी नवे संशोधन करणे आवश्यक नसते, तर जुन्या संशोधनात नाविन्यपूर्ण गोष्टी शोधणेही संशोधनाचा एक भाग आहे. भारत देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असतांना संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
वैज्ञानिक संशोधनात आवड, संयम आणि सातत्य गरजेचे -डॉ.नितीन करमळकर https://t.co/rCToWjwwCm
— Maharashtra lokmanch (@MLokmanch) February 22, 2022
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळीचे ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालय’ येथे करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्याचे उद्घाटन झाले. या वेळी ए.आर्.डी.ई.चे संचालक आणि उत्कृष्ट वैज्ञानिक डॉ. व्ही.व्ही. राव, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, प्राचार्य प्रा. डॉ. सविता दातार आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
डॉ. व्ही.व्ही. राव म्हणाले, ‘‘कोणतेही तंत्रज्ञान एका क्षेत्रातील व्यक्तीच्या ज्ञानाच्या जोरावर पूर्ण होतेच असे नाही. त्याकरीता विविध क्षेत्रांतील तज्ञांचा सल्ला घेऊन परिपूर्ण संशोधन करीत तंत्रज्ञान विकसित केले जाते.’’