हिंदू विश्‍वकल्याणाचा विचार मांडतो, तर मुसलमान हिंदूंचा विनाश होण्याचा विचार करतात ! – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

रायपूर (छत्तीसगड) – हिंदूंना ज्यांच्यापासून धोका आहे, जे हिंदूंना ‘काफीर’ म्हणतात, ते त्यांच्या पूर्वजांनाच ‘काफीर’ म्हणत आहेत; कारण भारतातील सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदुच आहेत. आम्ही विश्‍वकल्याणाचा विचार मांडतो, तर मुसलमान हिंदूंचा विनाश होण्याचा विचार करतात, असे प्रतिपादन पुरी (ओडिशा) येथील पुर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले. शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती यांनी या वेळी विविध विषयांवर विचार मांडले.

शंकराचार्यांनी मांडलेले विचार

१. तरुणांना धर्म आणि अध्यात्म यांच्याशी जोडले पाहिजे !

आताचे तरुण सनातन परंपरेपासून भटकले आहेत. त्यांना विज्ञानाच्या शिक्षणासह धर्म आणि अध्यात्म यांच्याशीही जोडले पाहिजे. त्यामुळे ते जागृत होतील आणि तीच राष्ट्राची शक्ती असेल, तसेच त्यामुळे राष्ट्ररक्षण आणि हिंदु राष्ट्राचा उद्देश यशस्वी होईल. हे सर्व संप्रदायांसाठीही लाभदायक असेल; कारण आपल्याला विश्‍वकल्याण हवे आहे.

२.  प्रत्येक परिवाराने मुलांना सनातन संस्कृतीनुसार शिक्षण द्यावे !

आमची सनातन व्यवस्था शास्त्रसंमत सिद्धांतावर आधारित आहे. समाजाची निर्मिती सुसंस्कारित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत आचार-विचार यांमुळे होत असतेे. तेव्हाच रामराज्याची व्यवस्था निर्माण होते. हे कोणतेही सरकार करू शकत नाही. प्रत्येक परिवाराने त्यांच्या मुलांना सनातन संस्कृतीनुसार शिक्षण द्यावे, तेव्हाच पोषक वातावरण निर्माण होईल आणि तेच हिंदु राष्ट्र असेल. यात आध्यात्मिक ऊर्जा ओतप्रोत भरलेली असेल. यामध्ये युवा शक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आजची युवा शक्ती दिग्भ्रमित आणि नैराश्याने ग्रस्त आहे.

३. हिंदु राष्ट्र सर्वसमावेशक असेल !

‘हिंदु राष्ट्रामध्ये मुसलमान असतील का ?’, या प्रश्‍नावर शंकराचार्य म्हणाले की,  हिंदु राष्ट्रामध्ये सुसंस्कृत आणि सुरक्षित समाज बनवण्यासाठी योगदान देणार्‍या प्रत्येक पंथ अन् जात यांचे स्वागत केले जाईल.

४. राजकीय पक्षांना वाटते की, त्यांच्याकडून धर्मसंसद चालवली जावी !

धर्मसंसदेविषयी विहिंपचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल माझ्याकडे ७० वेळा तरी आले होते. त्यांनी धर्मसंसदेची स्थापना केली; मात्र आता भाजप, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांना वाटते की, धर्मसंसद त्यांच्याकडून चालवली जावी.

५. वाद चालू असल्यामुळे हिजाबवर बोलणे योग्य ठरणार नाही !

हिजाबच्या वादावर शंकराचार्य म्हणाले की, माझ्याकडे नेते आले, तर मी त्यांना सर्व स्थिती समजावून सांगेन. माझे विचार सर्वोच्च न्यायालयही नाकारू शकत नाही. आता वाद चालू असल्याने यावर बोलणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मोठे वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आधी सर्व परिस्थिती समजून घेईन.