युद्धाची घोषणा करत रशियाचे युक्रेनवर आक्रमण
-
युक्रेनचे ४० सैनिक आणि १० नागरिक ठार
-
रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये घुसले
-
युरोपीयन युनियन रशियावर कठोर निर्बंध लादणार
-
भारताने हस्तक्षेप करण्याची युक्रेनची मागणी
-
युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले
कीव (युक्रेन) – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या विरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरे बाँबस्फोटांनी हादरली. रशियाने युक्रेनवर चोहोबाजूंनी आक्रमणे केली. रशियाने युक्रेनच्या पायाभूत सुविधांच्या ठिकाणी क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला, तसेच त्याची २ विमानतळेही उद्ध्वस्त केली. या सर्व घटनेनंतर युक्रेनने देशातील सर्व विमानांची उड्डाणे रहित केली. ‘पूर्व युक्रेनमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे आक्रमण आवश्यक होते’, असे पुतिन यांनी म्हटले आहे. ‘यांसह अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल’, अशी गर्भित चेतावणीही पुतिन यांनी दिली. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या आक्रमणात युक्रेनचे ४० सैनिक आणि १० नागरिक ठार झाले. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या सैनिकांनी रशियाप्रेमी ५० फुटीरतावाद्यांना ठार मारले. रशियाची ७ विमाने आणि १ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावाही युक्रेनने केला आहे; मात्र तो रशियाने फेटाळून लावला.
युक्रेनमध्ये ‘मार्शल लॉ’लागू !
युक्रेनने देशात ‘मार्शल लॉ’ घोषित केला. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी अमेरिकेसह सर्व प्रमुख देशांना रशियावर कठोरात कठोर निर्बंध लादण्याचे आवाहन केले. ‘मार्शल लॉ’ हा नागरी सरकारच्या ऐवजी सैन्याद्वारे प्रशासित केलेला कायदा आहे. आपत्कालीन परिस्थितीत, संकटाला प्रतिसाद देण्यासाठी किंवा व्यापलेल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्शल लॉ घोषित केला जातो. ‘मार्शल लॉ’ घोषित केल्यानंतर नागरी स्वातंत्र्य आणि त्यांचे मूलभूत अधिकार रहित केले जातात. हा कायदा लागू होताच, नागरिकांचा मुक्त संचार, भाषणस्वातंत्र्य यांसारखे मूलभूत अधिकार काही काळासाठी रहित केले जातात.
रशियाने आतापर्यंत पाहिले नसतील, इतके कठोर निर्बंध लादू ! – ब्रिटन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर केलेले आक्रमण पूर्वनियोजित आणि अन्यायकारक आहे. रशियाने आतापर्यंत पाहिले नसतील, इतके कठोर निर्बंध आम्ही त्यांच्यावर लादू, अशी संतप्त प्रतिक्रिया ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी व्यक्त केली. या निर्बंधांना त्वरित मान्यता मिळेल आणि ते आजपासूनच लागू होतील. आम्ही युक्रेनमधील नागरिकांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या रक्षणासाठी आम्ही युक्रेनला सर्वाेतोपरी साहाय्य करू. युरोपीयन युनियनकडूनही रशियावर कठोर निर्बंध लादण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. आम्ही युरोपीयन युनियनमधील रशियाची मालमत्ता गोठवू आणि रशियाच्या बँकांचा युरोपीयन वित्तीय बाजारपेठेतील प्रवेश रोखू.
युक्रेनमध्ये नागरिकांना बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा : जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड !
युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे नागरिक बँकेतून प्रतिदिन केवळ १० सहस्र रिव्निया (युक्रेनियन चलन) पर्यंतच पैसे काढू शकतात, अशी घोषणा युक्रेनच्या मध्यवर्ती बँकेने केली. नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाल्याने पैसे काढणे आणि जीवनाश्यक वस्तू खरेदी करणे, यांसाठी बाजारात नागरिकांची झुंबड उडाली आहे.
नागरिकांनी देशाच्या संरक्षण दलांमध्ये सहभागी व्हावे ! – युक्रेन
युक्रेनियन नागरिकांना देशाच्या संरक्षण दलांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
चीनकडून संयम बाळगण्याचे आवाहन !
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी युक्रेनमधील परिस्थितीशी संबंधित सर्व घटकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. चुनयिंग यांनी रशियाच्या कृतीला मात्र ‘आक्रमण’ असे म्हटलेले नाही.
युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले !
रशियाशी असलेले सर्व राजनैतिक संबंध तोडत असल्याची घोषणा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्वीट करून केली. यासह झेलेन्स्की यांनी ‘ज्यांनी अद्याप रशियामध्ये आपला विवेक गमावलेला नाही, अशा सर्वांनी रस्त्यावर उतरून रशियाचा निषेध करण्याची वेळ आली आहे’, असे आवाहन केले.
युक्रेनमध्ये ३० दिवसांसाठी आणीबाणी घोषित !
युक्रेनकडून देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. युक्रेनच्या खासदारांनी राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या आणीबाणी लागू करण्याच्या आदेशाला मान्यता दिली आहे. ही आणीबाणी २४ फेब्रुवारीपासून पुढे ३० दिवसांसाठी असेल.
रशियाने सैन्य मागे घ्यावे ! – संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस
‘राष्ट्रपती पुतिन यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांचे सैन्य मागे घ्यावे. हा वाद थांबला पाहिजे, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटिनियो गुटरेस यांनी केले आहे.
रशियाच्या सैन्याने युद्ध चालू केल्यानंतर युक्रेनच्या २ गावांवर नियंत्रण मिळवले आहे, असे सांगण्यात येत आहे.
रशियाने नाझी जर्मनीप्रमाणे आक्रमण केले आहे ! – युक्रेन
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या देशातील नागरिकांना म्हटले आहे, ‘रशियाने विश्वासघातकीपणे आक्रमण केले, ज्याप्रमाणे नाझी जर्मनीने दुसर्या महायुद्धात केले होते. रशियाने वाईट मार्गाची निवड केली असतांना युक्रेन स्वतःचे रक्षण करत आहे. काहीही झाले, तरी आपण आपले स्वातंत्र्य रशियाच्या हाती सोपवणार नाही.’
#UkraineRussiaCrisis | Explosions heard in Kharkiv, a major Ukrainian city just south of the Russian border, after Russia’s President Vladimir Putin launched a military operation. Ukrainian forces in the city have been battling Moscow-backed insurgents since 2014: AFP
— ANI (@ANI) February 24, 2022
#LIVE | Republic TV’s @shawansen reports LIVE from Ukraine as explosions rock various cities after Putin’s declaration of ‘military action’.
Tune in to watch here – https://t.co/mwsp0GtTap… pic.twitter.com/SU1eB1qh22
— Republic (@republic) February 24, 2022
(सौजन्य : India Today)
१०० लढाऊ विमाने आणि १२० युद्धनौका आक्रमणासाठी सिद्ध ! – नाटो
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या पार्श्वभूमीवर नाटोचे (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे) सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी रशियाला चेतावणी दिली आहे. ‘रशियाने युक्रेनवर आक्रमण करणे चालूच ठेवले, तर त्याच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही १०० हून अधिक लढाऊ विमाने आणि भूमध्य समुद्रात एकूण १२० हून अधिक युद्धनौका आक्रमण करण्यासाठी सिद्ध ठेवली आहेत’, असे स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले.
आम्ही पळून जाणार नाही ! – युक्रेन
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना आश्वासन दिले की, पुतिन यांनी आक्रमण केले असले, तरी कुणीही पळून जाणार नाही. सैन्य, राजकारणी आदी प्रत्येक जण काम करत आहे. युक्रेन स्वतःचे रक्षण स्वतःच करेल.
भारताने हस्तक्षेप करावा ! – युक्रेनची मागणी
भारताचे रशियाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे रशियाची आक्रमणे रोखण्यात भारत निर्णायक भूमिका बजावू शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित हस्तक्षेप करत रशिया आणि युक्रेनच्या पंतप्रधानांशी संपर्क साधावा, असे आवाहन युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी पंतप्रधान मोदी यांना केले.
विनाशकारी परिणाम होतील ! – अमेरिकेची रशियाला चेतावणी
रशियाने युद्ध पुकारताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला ‘याचे विनाशकारी परिणाम होतील’, अशा शब्दांत चेतावणी दिली आहे. या आक्रमणामुळे होणारी हानी आणि मृत्यू यांसाठी रशिया उत्तरदायी असेल. अमेरिका सहकारी देशांसह रशियाला याचे उत्तर देईल, अशी चेतावणीही अमेरिकेने दिली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा सकाळपासूनचा घटनाक्रम !
१. रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन यांनी रशियाच्या वेळेनुसार मध्यरात्री २ वाजून ५५ मिनिटांनी एका दूरचित्रवाणीद्वारे युक्रेनच्या पूर्व डोनबास भागात सैनिकी कारवाई करण्याची घोषणा केली.
२. पुतिन यांनी हे आक्रमण रशिया स्वसंरक्षणार्थ करत असल्याचे सांगत युक्रेनियन सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले.
३. युक्रेनच्या सर्व बाजूंनी रशियाचे सैन्य आणि रणगाडे उभे करण्यात आले आहेत. रशियाच्या सैन्यच्या एका तुकडीने युक्रेनची राजधानी कीवच्या उत्तरेला असलेल्या बेलारूसमधून, तर अन्य एका तुकडीने दक्षिणेकडे असलेल्या क्रिमियामधून प्रवेश केला आहे. हाच प्रदेश रशियाने वर्ष २०१४ मध्ये युक्रेनकडून हिसकावून घेतला होता.
४. युक्रेनमधील नागरिक जीव मुठीत धरून रहात आहेत. अनेकांनी रहात्या ठिकाणाहून पळ काढला आहे. रशियाने बाँबद्वारे आक्रमण करणे चालू केल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमधील अनेक नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये घेतला आश्रय घेतला आहे. युक्रेनच्या नागरिकांना हे आक्रमण अपेक्षित असले, तरी त्याची व्याप्ती अनपेक्षित होती.
५. रशियाच्या आक्रमणामुळे तेलाच्या किमती ७ वर्षांत प्रथमच १०० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या.
६. रशियन चलन (रूबल) हे डॉलर आणि युरोच्या तुलनेत सर्वकालीन नीचांकी पातळीवर गेले.
भारतीय ज्योतिषाच्या भविष्यानुसार रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला २४ फेब्रुवारीला प्रारंभयातून भारतातील ज्योतिषशास्त्र किती प्रगत आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते ! नवी देहली – ‘माझ्या गणनेनुसार वाटाघाटी किंवा चर्चा २३ फेब्रुवारीपर्यंत होऊ शकतात आणि २४ फेब्रुवारी २०२२ नंतर कोणत्याही दिवशी युद्ध होऊ शकते. २४ फेब्रुवारीनंतर चर्चा अयशस्वी होईल. ग्रह आणि नक्षत्र यांनुसार रशिया अन् युक्रेन यांच्यातील युद्ध कधीही चालू होऊ शकते. त्यातही ते २४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ या काळात हे युद्ध होऊ शकते. यात युक्रेनची हानी होईल. ही परिस्थिती १५ मार्च ते ५ मे २०२२ या काळात नियंत्रणात येऊ शकते’, असे भविष्य ज्योतिषी पंडित संजीवकुमार श्रीवास्तव यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी ट्वीट करून वर्तवले होते. त्यांनी केलेल्या भाकितानुसार २४ फेब्रुवारीच्या पहाटे या युद्धाला प्रारंभ झाला. |