छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आत्मसात केला, तर राष्ट्रासाठी भरीव आणि आदर्श कार्य करू शकू ! – सरपंच अजय महाडिक, खांदाट-पाली

खांदाट-पाली (चिपळूण) गावात शिवजयंती उत्साहात साजरी

शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित शिवप्रेमी

चिपळूण, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. पूर्वी शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांच्या पराक्रम आणि युद्धनीती यांविषयीचा पूर्ण इतिहास शिकवायचे. आता मात्र हाच इतिहास खूप अल्प शिकवला जात आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीला शिवरायांचे समग्र जीवनकार्य ज्ञात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आत्मसात केला, तर राष्ट्रासाठी भरीव आणि आदर्श कार्य करू शकू, असे प्रतिपादन खांदाट-पाली गावचे सरपंच अजय महाडिक यांनी केले.

ते शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी माजी सैनिक श्री. केशव महाडिक, पोलीस पाटील श्री. राजेंद्र महाडिक, महिला बचत गट प्रमुख सौ. दीप्ती रूपेश महाडिक, ग्रामपंचायत सदस्य विकास मोहिते, श्री. नरेंद्र महाडीकगुरुजी, योगेश महाडिक, अजय आत्माराम महाडिक, सूरज महाडिक, हिंदु जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, डॉ. हेमंत चाळके आणि युवक-युवती उपस्थित होते.

शिवजयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाडीत लहान मुलांनी जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मावळे यांचा देखावा साकारलेला होता. या मिरवणुकीची सांगता ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. या वेळी सरपंच अजय महाडीक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. निवृत्त पोलीस अधिकारी भास्कर महाडिक यांनी त्यांच्या मनोगतात उत्साही सहभागाबद्दल युवकांचे कौतुक केले.

निर्भय हिंदु हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होऊ शकतो ! – महेश लाड

हिंदु जनजागृती समितीचे कु. महेश लाड यांनी उपस्थितांना स्वरक्षण प्रशिक्षण  विषयीचे महत्त्व सांगितले. धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी विविध घटनांची उदाहरणे देत कु. लाड म्हणाले, ‘‘ हिंदु युवतींवर ‘लव्ह जिहाद’च्या अंतर्गत केल्या जाणार्‍या अत्याचारांना निर्भयपणे सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाला स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. निर्भय हिंदु हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होऊ शकतो.’’

या ठिकाणी प्रशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी सरपंच अजय महाडिक यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

धार्मिक कार्यात हिंदु जनजागृती समितीचे योग्य ते मार्गदर्शन लाभते ! – सरपंच अजय महाडिक 

हिंदु जनजागृती समितीचा आमच्या भागातील कार्यक्रमांत आवर्जून सहभाग असतो. धार्मिक कार्यात समितीचे योग्य ते मार्गदर्शन लाभते !