समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी केलेले राजकारण !
२५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘रामदासनवमी’ आहे. त्या निमित्ताने…
२५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामदासनवमी आहे. त्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी राजकारण कसे केले, याविषयीचा लेख येथे देत आहोत.
(पूर्वार्ध)
१. समर्थ रामदासस्वामी यांनी ‘लोकसंग्रह करणारा नेता कसा असावा ?’, याविषयी केलेले निरूपण !
अ. ‘मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण ।
तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ।।
– दासबोध, दशक ११, समास ५, ओवी ४
अर्थ : ‘लोकसंग्रह करणार्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत ?’, हे सांगतांना समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच गोष्टींत सावधपणा हवा.
आ. चौथा अत्यंत साक्षप । फेडावे नाना आक्षप ।
अन्याये थोर अथवा अल्प । क्ष्मा करीत जावे ।।
– दासबोध, दशक ११, समास ५, ओवी ५
अर्थ : चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यासंग असला पाहिजे. त्याला इतरांच्या आक्षेपांचे निरसन करता आले पाहिजे, तसेच इतरांच्या लहान-थोर अन्यायांसाठी क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे.
असे म्हणणार्या समर्थ रामदासस्वामींची कार्यक्षेत्रे इतर संतांच्या तुलनेत फार भिन्न होती.
इ. मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हाची देखता ।।
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।।
असे वेळोवेळी म्हणणारे संत रामदासस्वामी हे इतर संतमंडळींपेक्षा साहजिकच निराळे ठरतात. शिवकालीन प्रवृत्ती आणि आकांक्षा यांच्याशी पूर्णतया समरस झालेले रामदासस्वामी हे एकमेव संतकवी म्हटले पाहिजेत.
२. समर्थांनी धर्मापासून दूर गेलेल्या समाजाला ‘महाराष्ट्र धर्म’ सांगून जागृत करण्याचे अपूर्व कार्य करणे
रायांनी करावे राजधर्म । क्षत्री करावे क्षात्रधर्म ।
ब्राह्मणी करावे स्वधर्म । नाना प्रकारे ।।
अशी शिकवण देऊन त्यांनी निस्तेज बनलेल्या जुन्या धार्मिक परंपरांना उजाळा आणि तेज दिले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यानंतर महाराष्ट्रावर ‘राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक’, अशी सर्व प्रकारची आक्रमणे झाली. अशा वेळी राष्ट्रातील कर्तव्यच्युत आणि खर्या धर्मापासून दूर गेलेल्या ब्राह्मण अन् क्षत्रिय समाजाला मार्ग दाखवण्याच्या कामात त्यांनी शिकवलेला ‘महाराष्ट्र धर्म’ अग्रेसर ठरला. एवढेच नाही, तर त्यांची कामगिरी अपूर्व ठरली.
३. समर्थ रामदासस्वामी यांनी त्या काळी केलेले लेखन आजही तितकेच उद्बोधक असणे
मुळातच समर्थ रामदासस्वामी राजकीय परिस्थितीविषयी इतर संतांपेक्षा अधिक जागरूक होते. त्यांचे राजकारणाविषयीचे निरूपण केवळ प्रासंगिक म्हणून दुर्लक्षणीय ठरत नाही. एवढेच नाही, तर आजच्या काळीही ते समाजाला उद्बोधक ठरते. हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा विशेष आहे; पण तो फारसा गांभीर्याने लक्षात घेतला जात नाही. ‘तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी लेखन केले’, असे दिसत असले, तरी तिथेही ते आपल्या मूलश्रद्धांचे अनुसंधान कुठेही सुटू देत नाहीत.
४. देवकारण आणि राजकारण यांचे संमीलन करून हिंदु समाजाला मार्गदर्शन करणारे समर्थांचे उद्बोधन !
४ अ. देवकारणासह राजकारण करण्यास शिकवणारे एकमेव संत समर्थ रामदासस्वामी ! : समर्थांनी आपल्या देवकारणात राजकारण आणले, घुसवले आणि नुसते घुसवले नाही, तर ते यशस्वीही करून दाखवले. ही गोष्ट सोपी नव्हती.
राजकारण बहुत करावे । परंतु कळोच न द्यावे ।।
अर्थ : राजकारण करावे; परंतु अन्य लोकांना कळू देऊ नये.
असे ते स्पष्टपणाने सांगतात; मात्र यातील मर्म नीटपणे समजून घेतले पाहिजे. दासबोधातील अकराव्या दशकातील पाचवा आणि एकोणिसाव्या दशकातील नववा, हे दोन समास राजकारणालाच वाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ‘त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेली पत्रे, ‘आनंदवनभुवन’सारखे स्तोत्र आणि तुळजाभवानीचे स्तोत्र’, यांत राजकारणाचे निरूपण आले आहे.
४ आ. समर्थांच्या राजकारणात कुटीलता नसून त्यातही त्यांचे संतहृदय वास करत असणे : ‘दासबोध’ या ग्रंथात ‘राजकारण’ हा शब्द एकूण २७ वेळा निरनिराळ्या संदर्भात आला आहे. ‘राजकारण’ असे उच्चारताच प्रत्यक्ष न सांगताही कितीतरी राजकीय व्यवहार सूज्ञांच्या लक्षात यावेत’, अशीच हा शब्द योजण्यात त्यांची अपेक्षा असावी. त्यांचा आध्यात्मिक प्रवृत्तीवाद, म्हणजेच स्वधर्म आहे आणि त्यातलेच एक अंग राजकारण आहे; म्हणूनच प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे, ‘त्यांच्या राजकारणात कुटीलता मुळीच नव्हती.’ त्यांच्या ‘या राजकारणातही त्यांचे संतहृदय वास करत होते’, ही गोष्ट लक्षणीय आहे.
४ इ. समर्थ रामदासस्वामींच्या राजकारणात स्वधर्मरक्षणाची कल्पना असून त्यांनी ते भक्तीचेच एक अंग मानले असणे : ‘त्यांच्या वाङमयातील राजकारणाचा प्रवेश क्रमप्राप्त आणि परिस्थितीप्राप्त आहे’, हे कधीही विसरता कामा नये. ‘त्यांचे राजकारण कोणत्या पायावर आधारलेले आहे ?’, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यात्म, उपासना आणि आचारधर्म या त्रिसूत्रींच्या संदर्भात त्यांच्या राजकारणाची उभारणी झाली आहे. त्यातून त्यांनी परमार्थाला पोषक ठरणारी जीवननिष्ठा निर्माण केली आणि तिला पुन्हा भक्तीसारख्या उदात्त भावनेत सामावून घेतले. मुळातच ‘राजकारण’ हा शब्द त्यांनी मुख्यार्थानेच आणि अत्यंत व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात स्वधर्मरक्षणाची कल्पना आहे. त्यासाठी त्यांनी मुत्सद्देगिरी, व्यवहारचातुर्य, व्यवहारबुद्धी आणि राजकीय हालचालींचे डावपेच यांचेही विवेचन केले आहे, तरीही त्यांनी ‘राजकारण’ हे भक्तीचेच एक अंग मानले आहे. प्रथम त्यांनी भक्तीच्या धाग्यात सर्व लोकांना बांधले आणि मग त्यांनी ‘धर्मरक्षणार्थ काय करायचे ?’, याचे विवेचन केले.
४ ई. समर्थांचे राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि रामराज्य यांचे स्वप्न साकार करणारे असणे अन् ती काळाची आवश्यकता असणे : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि रामराज्य यांचे जे स्वप्न होते, ते साकार करण्यासाठी कटीबद्ध असलेले त्यांचे राजकारण होते’, हे कधीही विसरता कामा नये. काही जण हेतूतः त्यांच्या ‘राजकारण’ या शब्दावर आणि त्यांच्या एकूणच कार्यावर आक्षेप घेत रहातात, ‘ते ब्राह्मणांचे कैवारी, प्रतिगामी आणि केवळ शिवाजीराजांच्या राजकारणासाठीच कार्य करणारे होते.’ वस्तुतः अध्यात्म आणि भक्ती यांच्या जोडीला त्यांनी उघडपणे राजकारण आणून बसवले; कारण ती त्या वेळची आणि त्या काळची अतीव निकड होती.
४ उ. सध्या चाललेले कुटीलतेचे राजकारण समर्थांना अभिप्रेत नसणे आणि त्यांच्या राजकारणात शुद्ध अन् सखोल वैचारिकता असणे
जाणत्याचें धूर्तपण । जाणत्याचें राजकारण ।
जाणत्याचें निरूपण । ऐकत जावें ।।
– दासबोध, दशक १८, समास २, ओवी १४
अर्थ : ‘जाणत्याचे चातुर्य, मुत्सद्देगिरीने वागणे, तसेच अध्यात्मनिरूपण या सर्वांचे श्रवण करून ते जाणून घ्यावे’, असे ते म्हणतात.
यावरूनच लक्षात येते, ‘सध्या जे कुटीलतेचे राजकारण चालते, ते त्यांना अभिप्रेत नव्हते.’ त्यांच्या राजकारणात शुद्ध आणि सखोल वैचारिकता आहे. दासबोधातील ‘उत्तम पुरुष’ या समासात त्यांनी आरंभी ‘वस्त्रभूषणे हा शरिराचा; तर विवेक, विचार आणि राजकारण हा अंतरीचा शृंगार आहे’, असे म्हटले आहे. ‘वस्त्र, आभूषणांनी सजवलेले आणि मुळात सुंदर, सतेज असलेले शरीर ‘अंतरी नस्ता चातुर्यबीजा’ खरी शोभा पावत नाही’, असे त्यांनी स्वच्छपणे म्हटले आहे.
४ ऊ. धर्मरक्षण करणारे राजकारण अभिप्रेत असलेल्या समर्थांचे म्लेच्छांचे पारिपत्य झाल्यावर आनंद दर्शवणारे शब्द !
बुडाला औरंग्या पापी । म्लेंचसंव्हार जाहाला ।
मोदली मांडलीं छेत्रें । आनंदवनभुवनीं ।।
अर्थ : ‘पापी औरंग्या बुडाला आहे, तसेच त्याच्यासह अनेक म्लेंच्छांचा नायनाट झाला आहे. त्यामुळे त्यांनी नष्ट केलेली देवस्थाने पुन्हा उभारली गेली आहेत. सर्वत्र आनंद पसरला आहे’, असे ते धीटपणाने म्हणतात.
उदंड जाहालें पाणी । स्नान संध्या करावया ।
जप तप अनुष्ठाने । आनंदवनभुवनीं ।।
अर्थ : दुष्ट लोकांचा भार नाहीसा झाला, तसेच मोडलेली तीर्थे पुन्हा बांधली गेली. त्यामुळे लोक निर्भयपणे स्नान-संध्या करू लागले आणि त्यामुळे जणू पाणी उदंड झाले. जप-तपामध्ये कोणताच अडथळा नव्हता. त्यामुळे लोक वेगवेगळी अनुष्ठाने आणि पुरश्चरणे आनंदाने करू लागले.
यातून ‘राजकीय क्षेत्रात काय घडावे ?’, ही अपेक्षा त्यांनी स्पष्टपणाने इथे व्यक्त केलेली आहे.’
(क्रमशः)
– डॉ. (सौ.) वासंती इनामदार-जोशी, कोल्हापूर
(साभार ः मासिक ‘हरि-विजय’, दीपोत्सव २००७)