अमेरिकेतील ४० विद्यापिठांमध्ये शिकवला जाणार जैन धर्मावरील अभ्यासक्रम !

प्रातिनिधिक छायाचित्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठ, कनेक्टिकट विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, प्लोरिडा विद्यापीठ आदी ४० विद्यापिठांमध्ये जैन धर्मावरील अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. यात जैन धर्मावर विद्यार्थ्यांना पीएच्.डी. करता येईल तसेच अहिंसेचे तत्त्व, सात्त्विक आहार यांवर विशेष अभ्यासक्रम असणार आहेत, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ’ या संस्थेने दिली आहे. अमेरिकेखेरीज इस्रायल, संयुक्त अरब अमिरात, तसेच आशियातील काही देशांतील विद्यापिठांतही जैन धर्मावरील अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे. अमेरिका आणि अन्य देशांच्या विद्यापिठांमध्ये हा अभ्यासक्रम चालू करण्याचा हा प्रकल्प ४५० कोटी रुपयांचा आहे.

‘फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुलेख जैन यांनी सांगितले की, सध्या अहिंसा, सात्त्विक आहार आदी शब्दांचा वापर अमेरिकेसह अनेक देशांत वाढला आहे. या संकल्पना समजावून घेण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची अनेकांनी सिद्धता दर्शवली आहे. त्यामुळे जैन धर्माची लोकांना अधिकाधिक माहिती व्हावी; म्हणून विविध विद्यापिठांत त्याचे अभ्यासक्रम प्रारंभ होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अमेरिका आणि कॅनडामध्ये सुमारे दीड लाख जैन धर्मीय रहातात. त्यांच्याकडून अशा प्रकल्पासाठी देणग्या मिळतात. त्यांतून जैन धर्मावर सखोल संशोधन केले जाते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्याही दिल्या जातात.