छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष ठरवण्याचे षड्यंत्र चालू आहे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

नाडण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. हर्षद खानविलकर

देवगड – सद्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहासही समाजापर्यंत पोचत नाही. शाळेतील अभ्यासक्रमात महाराजांचा इतिहास थोडक्यात सांगितला जातो. सामाजिक प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी चुकीचा इतिहास प्रसारित केला जातो. महाराजांना ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) ठरवण्याचे मोठे षड्यंत्र सध्या समाजात चालू आहे. अफझलखान वधाचे छायाचित्र लावणे, हाही गुन्हा ठरवला जात आहे. महाराजांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले, त्या सर्व समस्या आजही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महाराजांप्रमाणेच आपल्यालाही ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून संकटांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले.

तालुक्यातील वरची पुजारेवाडी, नाडण येथील शिवप्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीने १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी सकाळी विजयदुर्गवरून ‘शिवज्योत’ चांभारघाटीपर्यंत आणण्यात आली. तेथून ढोलताशांच्या गजरात नाडणपर्यंत शिवज्योतीची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. भजनाचा कार्यक्रमही झाला. रात्री ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ता म्हणून हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा उद्देश आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी करून दिली.

श्री. खानविलकर मार्गदर्शनात म्हणाले, ‘‘सध्या आणि स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे एकही राज्यकर्ता आपल्याला मिळालेला नाही. याचे कारण असे की, छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्यासाठी राजमाता जिजाऊंप्रमाणे स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांचे संस्कार करणारी माता असावी लागते. महाराज गर्भात असतांनाच त्यांच्यावर रामायण, महाभारत, गीता या धर्मग्रंथांचे संस्कार केले होते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये स्वधर्माबद्दल स्वाभिमानाचा संस्कार झाला होता. हेच संस्कार आजच्या युवक-युवतींवर करणे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्मज्ञान नसल्याने धर्माचरण केले जात नाही. परिणामी हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांना बळी पडतात. हिंदु बांधव धर्माचरणी नसल्याने संकटांचा सामना करणे, स्वतःचे आणि धर्माचे रक्षण करणे यांसाठी असमर्थ ठरत आहेत. युवकांची दिशाभूल होऊन त्यांच्यातील व्यसनाधीनता वाढत आहे. आपली संस्कृती, आचरण विसरल्याने धर्मावर होणार्‍या आघातांना रोखण्याची बुद्धी हिंदु बांधवांना होत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी स्वतःच्या जीवनातील थोडा वेळ देऊन हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षण वर्ग, स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग यांसारख्या विनामूल्य उपक्रमांत सहभागी होऊन राष्ट्र आणि धर्म कर्तव्य बजावण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.’’

क्षणचित्रे

१. ‘गावात धर्मशिक्षण वर्ग, स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करूया’, अशी इच्छा नाडण गावाचे सरपंच श्री. विजय पुजारे यांनी व्यक्त केली.

२. कार्यक्रमाचे आयोजन गावातील युवकांनी पुढाकार घेऊन केले होते. सर्वश्री सिद्धेश पुजारे, एकनाथ पुजारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. या वेळी श्री. खानविलकर यांच्यासह समितीच्या अन्य कार्यकर्त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘आदर्श शिवजयंती’ साजरी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.