प.पू. दास महाराज यांनी त्यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ झाल्यानंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि आलेल्या अनुभूती !
पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज (वय ८० वर्षे) यांनी त्यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ झाल्यानंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि आलेल्या अनुभूती !
२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा’ (टीप) पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गौतमारण्य आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिर परिसरात झाला.
(टीप – वयोमानपरत्वे व्यक्तीच्या इंद्रियांची क्षमता उणावते. ‘ती क्षमता टिकून रहावी’, यासाठी धर्मशास्त्रात वयाच्या ८० व्या वर्षी ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ करण्यास सांगितला आहे.)
या विधीनंतर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रकृती उत्तम रहावी, साधकांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यांसाठी प.पू. दास महाराज यांनी १ सहस्र ३०० कि.मी. प्रवास करून त्यांचे गुरु भगवान श्रीधरस्वामी यांच्या समाधीस्थळी आणि अन्य तीर्थक्षेत्री जाऊन प्रार्थना केल्या. त्या वेळी त्यांच्या अनेक संत आणि मठाधीश यांच्याशी भेटी झाल्या.
माघ कृष्ण पक्ष सप्तमी (२३.२.२०२२) या दिवशी प.पू. दास महाराज यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांनी त्यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’नंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
(भाग १)
प.पू. दास महाराज यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. ‘श्री गुरूंनी शिष्याचा हात धरल्यावर ते त्याला मोक्षापर्यंत नेतात’, याची आलेली प्रचीती !
१ अ. भगवान श्रीधरस्वामींनी प.पू. दास महाराज यांना अनुग्रह दिल्यानंतर त्यांचा फुलाप्रमाणे सांभाळ करणे आणि समाधी घेण्याआधी ‘तुला दुसर्या रूपात पुन्हा भेटीन’, असे सांगणे : ‘वर्ष १९५३ मध्ये माझ्या वयाच्या ११ व्या वर्षी भगवान श्रीधरस्वामींनी मला सज्जनगडावर अनुग्रह दिला. भगवान श्रीधरस्वामींनी शिष्य म्हणून माझा स्वीकार केला आणि मला पादुका देऊन साधना करायला सांगितली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे माझी साधना चालू झाली. वर्ष १९७३ मध्ये भगवान श्रीधरस्वामींनी समाधी घेतली. या दीर्घकाळात त्यांनी माझा फुलाप्रमाणे सांभाळ केला. त्यांनी मला अनेकदा जीवघेण्या प्रसंगांतून वाचवून पुनर्जन्म दिला. देह ठेवण्यापूर्वी त्यांनी मला ‘मी तुला दुसर्या रूपात पुन्हा भेटीन’, असे वचन दिले होते.
१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यावर त्यांच्या ठिकाणी भगवान श्रीधरस्वामींचे दर्शन होणे : वर्ष २००२ मध्ये माझी परात्पर गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा तिथेच मला श्रीधरस्वामींचा दृष्टांत झाला. तेव्हा मला परात्पर गुरुदेवांच्या ठिकाणी श्रीधरस्वामीच दिसत होते. या अनुभूतीमुळे ‘परात्पर गुरुदेव हेच आधी श्रीधरस्वामींच्या रूपात माझा सांभाळ करत होते’, अशी माझी निश्चिती झाली.
१ इ. भगवान श्रीधरस्वामींनी व्यष्टी साधना करवून घेणे आणि परात्पर डॉ. आठवले यांनी समष्टी साधना करवून घेऊन साधनेला पूर्णत्व आणणे : परात्पर गुरुदेवांनी भगवान श्रीधरस्वामींच्या रूपात अनुग्रह देऊन माझी व्यष्टी साधना करवून घेतली आणि वर्ष २००२ मध्ये मला भेटून माझ्याकडून समष्टी सेवा करवून घेऊन माझ्या साधनेला पूर्णत्व आणले. त्यांनी समष्टीच्या कल्याणासाठी माझ्याकडून पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाची सेवा करवून घेतली. या सेवेत असंख्य संकटे आली; पण त्यातूनही श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांनी मला जीवदान दिले.
१ ई. श्रीमन्नारायणाने मोक्षाप्रत नेण्यासाठी भगवान श्रीधरस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन रूपांत येऊन साधना करवून घेतल्यामुळे मन कृतज्ञतेने भरून येणे : अशा प्रकारे वयाच्या ७९ व्या वर्षापर्यंत श्रीमन्नारायणाने दोन रूपांत येऊन माझा सांभाळ केला अन् अनेक संकटांतून वाचवून मला पुनर्जन्म दिला. ‘एकदा साधकाचा हात पकडला की, त्याला मोक्षाला नेण्याचे दायित्व श्री गुरूंचेच असते’, या वचनानुसार भगवान श्रीधरस्वामी परात्पर गुरुदेवांच्या रूपात येऊन माझ्याकडून साधना करवून घेत आहेत. माझ्या साधनेच्या पूर्ततेसाठी श्रीमन्नारायणाने दोन रूपांत अनुग्रह दिल्याचे लक्षात येऊन माझे अंतःकरण भरून आले.
२. ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’नंतर इंद्रियांना अलौकिक शक्ती मिळाल्याचे जाणवणे
माझ्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ झाला. विधी झाल्यानंतर त्यांच्या संकल्पशक्तीमुळे माझ्या इंद्रियांना अलौकिक शक्ती मिळाल्याचे मला जाणवू लागले.
३. श्री गुरूंप्रतीच्या कृतज्ञतेमुळे भगवान श्रीधरस्वामींच्या समाधीस्थानी दर्शनाला जाण्याची प्रेरणा मिळणे आणि त्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे आशीर्वाद मागणे
‘आपल्या साधकांवर गुरुमाऊलीची किती कृपा असते !’, या कृतज्ञतेपोटी मला भगवान श्रीधरस्वामींच्या समाधीस्थानी जाण्याची प्रेरणा झाली. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील वरदहळ्ळी (वरदपूर) येथे भगवान श्रीधरस्वामींची समाधी आहे. याविषयी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना दूरभाषवरून कळवले. मी त्यांना प्रार्थना केली, ‘मला भगवान श्रीधरस्वामींच्या दर्शनाला जायची प्रेरणा झाली आहे. तेव्हा तुमचा आशीर्वाद असावा.’
४. तीर्थस्थळांना दिलेल्या भेटी !
४ अ. वरदहळ्ळी, जिल्हा शिवमोग्गा, कर्नाटक.
४ अ १. भगवान श्रीधरस्वामींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणे आणि त्यांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांना उत्तम आरोग्य लाभावे अन् हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी प्रार्थना करणे : शुक्रवार, २५.१२.२०२१ या दिवशी आम्ही सकाळी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून प्रवासाला आरंभ केला. आम्ही त्या दिवशी रात्री कारवार येथे मुक्काम केला. दुसर्या दिवशी आम्ही वरदहळ्ळी येथे पोचल्यावर भगवान श्रीधरस्वामींच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि त्यांना प्रार्थना केली, ‘हे स्वामी, परात्पर गुरुदेवांच्या रूपात येऊन आपण हिंदु राष्ट्राचा संकल्प केला आहे. कार्य सिद्धीस नेण्यास आपण समर्थ आहात. या कार्यातून आपण आम्हा साधकांची साधना करवून घेत आहात; पण या कार्यात वाईट शक्तींशी लढा चालू असल्याने परात्पर गुरुदेवांची प्राणशक्ती उणावत असते. त्यामुळे आमचा जीव कासावीस होतो. त्यांना अधिकाधिक प्राणशक्ती मिळावी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, तसेच आगामी आपत्काळात आपण सर्व साधकांना शक्ती पुरवावी’, अशी तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
४ अ २. समाधीस्थळाच्या ठिकाणी उत्तम व्यवस्था होणे आणि तेथील व्यवस्थापकांनी परात्पर गुरु डॉक्टरांसाठी प्रसाद देणे : भगवान श्रीधरस्वामींच्या समाधीस्थळाचे व्यवस्थापन श्री. श्रीधर हेगडे पहातात. त्यांनी आमची उत्तम सोय केली. आम्ही वरदहळ्ळी येथे २६ आणि २७.१२.२०२१, हे दोन दिवस मुक्काम केला. त्यांनी आमचा सत्कार केला आणि परात्पर गुरुदेवांसाठी प्रसाद दिला.
४ अ ३. भगवान श्रीधरस्वामींची सेवा केलेल्या पू. जानकीअम्मा आणि जनार्दनस्वामी यांचे दर्शन होणे : वरदहळ्ळी येथून निघतांना पू. जानकीअम्मा आणि जनार्दनस्वामी यांचे दर्शन झाले. हे दोघे भगवान श्रीधरस्वामींच्या सेवेत असायचे. आता पू. अम्मांचे वय ९२ वर्षे आहे. त्यांच्यात उठण्याची शक्ती नाही, तरी त्या दोन्ही हातांत काठ्या घेऊन आमच्याकडे आल्या आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला.
– आपला चरणसेवक,
प.पू. दास महाराज, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१४.२.२०२२)
(क्रमशः)
किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांच्याशी झालेली भेट
१. प.पू. दास महाराज यांनी प.पू. देवबाबांचे दर्शन घेणे आणि त्यांनी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आशीर्वाद देणे : २८.१२.२०२१ या दिवशी आम्ही वरदहळ्ळी येथून मंगळुरू जिल्ह्यातील तालीपडी (किन्नीगोळी) येथे प.पू. देवबाबा यांच्या दर्शनासाठी गेलो. तिथे त्यांचे दर्शन घेऊन आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला. आम्ही त्यांच्या चरणी ‘हिंदु राष्ट्र लवकरात लवकर येऊ दे’, अशी प्रार्थना केली. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, ‘‘हो. आता हिंदु राष्ट्रासाठीच माझी साधना चालली आहे. १.१.२०२२ या दिवसापासून मी केवळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच साधना करणार आहे.’’
२. परात्पर गुरु डॉक्टरांशी दूरभाषवर बोलून त्यांनी ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’तून शक्ती दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे : किन्नीगोळी येथूनच आमचे दूरभाषवर परात्पर गुरुदेवांशी संभाषण झाले. ते आश्चर्याने म्हणाले, ‘‘तुम्ही किन्नीगोळीपर्यंत गेलात !’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘माझा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ आपल्या संकल्पाने झाला. तेव्हापासून मला उत्साह जाणवत आहे. त्यातून मला शक्ती मिळाली. प्रवासाला निघतांना मला वाटले, ‘मला इतका प्रवास झेपेल का ?’; पण आपण शक्ती दिल्याने तो झेपला. आपल्या चरणी कृतज्ञता !’’
– आपला चरणसेवक,
प.पू. दास महाराज, (१४.२.२०२२)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |