सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या देवतांचा नामजप केल्यामुळे सौ. स्नेहल गांधी यांच्या कोरोनाबाधित काकांना (श्री. विनायक वाटवे (वय ६७ वर्षे) यांना) आलेली अनुभूती
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
१. साधिकेची मावशी आणि तिचे यजमान (काका) प.पू. कलावती आईंचे भक्त असणे अन् त्यांना सनातन संस्थेने सांगितलेली साधनाही पटणे
‘माझे काका (पुणे येथील माझ्या मावशीचे यजमान, श्री. विनायक वाटवे, वय ६७ वर्षे), मावशी आणि मावस भाऊ पुणे येथे रहातात. मावशी आणि काका प.पू. कलावतीआई यांचे भक्त आहेत. काका सतत ‘ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप करतात आणि प.पू. कलावतीआई यांची भजनेही म्हणतात. त्यांना सनातन संस्था सांगत असलेली साधनाही पटते.
२. मावशीच्या यजमानांना कोरोनाचा संसर्ग होणे आणि त्यांच्यावर घरीच औषधोपचार चालू असणे
एप्रिल २०२१ मध्ये मावशीच्या यजमानांना ताप येत होता. त्यांची कोरोनाची चाचणी केल्यावर ते कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. त्यानंतर रुग्णालयात पलंग (बेड) उपलब्ध नसल्याने आधुनिक वैद्यांनी सुचवल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषधोपचार करण्याचा त्यांच्या मुलाने (मावसभावाने) निर्णय घेतला आणि तसे उपचार चालू केले.
३. सर्व वैद्यकीय उपचार करूनही काकांच्या प्रकृतीत सुधारणा न होणे आणि त्यांच्या मुलाने त्याविषयी कु. मृण्मयीला (सौ. स्नेहल गांधी यांच्या मुलीला) सांगून आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी विचारणा करणे
माझा मावसभाऊ कोरोनाच्या संदर्भातील पूर्ण काळजी घेऊन काकांची सर्व सेवा करत असे. त्यांना बरेही वाटू लागले होते; पण एके दिवशी अकस्मात् त्यांना पुष्कळ थकवा आला आणि त्यांचे खाणेपिणे अगदी अल्प झाले. त्यामुळे घरच्या सर्वांनाच ताण येऊन भीतीही वाटत होती. मावसभावाने माझी मुलगी कु. मृण्मयी हिला भ्रमणभाष करून कळवले की, ‘वैद्यकीय उपचार चालू असूनही वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. ते नेहमी शिवाचा नामजप करायचे आणि प.पू. कलावतीआईंची भजने म्हणायचे; परंतु आता तेही म्हणणे त्यांना शक्य होत नाही. त्यांना पुष्कळ थकवा आहे आणि आम्ही सगळे प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. तेव्हा तू मला तुमच्याकडे सनातन संस्थेने सांगितलेले काहीतरी उपाय सांग.’
४. कु. मृण्मयीने काकांची दृष्ट काढायला सांगणे आणि कोरोनाच्या संदर्भात प्रतिकारक्षमता अन् आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला देवतेचा नामजप भ्रमणभाषवर लावून ठेवण्यास सांगणे, तसे केल्यावर काकांच्या प्रकृतीत सुधारणा होणे
कु. मृण्मयीला क्षणभर ‘काय करावे ?’, हे कळत नव्हते; पण तिने स्थिर राहून त्याला काकांची कापराने दृष्ट काढायला सांगितली. तसेच ‘कोरोनासंदर्भात प्रतिकारक्षमता अन् आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला देवतांचा नामजप आणि रामरक्षास्तोत्र त्यांच्याजवळ भ्रमणभाषवर मोठ्याने लावून ठेव अन् तूही नामजप कर’, असे सांगितले. त्याप्रमाणे त्याने लगेच श्रद्धापूर्वक ते सर्व केले आणि आश्चर्य म्हणजे काकांची प्रकृती हळूहळू सुधारायला लागली. ते थोडे थोडे खायला लागले आणि दुसर्या दिवशी ते स्वतःहून उठून बसले आणि ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजपही करू लागले.
या अनुभूतीमुळे सर्वांनाच सनातन संस्थेने सांगितलेल्या नामजपाची महती कळली. ‘मृण्मयीने सांगितलेल्या उपायांमुळे काका बरे झाले’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.
गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळेच मृण्मयीला कोरोनासंदर्भात प्रतिकारक्षमता अन् आध्यात्मिक बळ वाढण्यासाठीचा देवतांचा नामजप नातेवाइकांना सांगण्यास सुचले. यासाठी आम्ही तुमच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– सौ. स्नेहल संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |