युक्रेन-रशिया वाद : रशियाची ‘फॉल्स फ्लॅग’ आक्रमणाची सिद्धता !
१. रशियाने युक्रेनच्या सीमेवर प्रचंड सैन्य आणि शस्त्रास्त्रे तैनात करणे अन् युक्रेननेही त्याच्याविरोधात लढण्यासाठी सज्जता करणे
‘रशिया युक्रेनवर आक्रमण करील आणि युद्ध होईल’, असे अनेकांना वाटत आहे. ‘युक्रेननेही त्याच्या सैन्याला सज्ज रहाण्याचे आदेश दिले आहेत’, असे वृत्त आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर अनुमाने दीड लाख सैनिक, तसेच अत्याधुनिक रणगाडे, तोफा, लढाऊ हेलिकॉप्टर्स आणि विमानेही तैनात केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून तेथे विविध सैनिकी कवायती चालू आहेत. ‘या कवायतींच्या माध्यमातून रशिया एक दिवस युक्रेनवर आक्रमण करू शकतो’, असे युक्रेन, युरोप आणि अमेरिका यांना वाटत आहे. असे असले, तरी तज्ञांना आणि मलाही असे वाटते की, ही लढाई होण्याची शक्यता फारच न्यून आहे.
रशिया युक्रेनला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होऊ नये’, असे रशियाला वाटते. (सोव्हिएत संघाच्या विरोधात सामूहिक सुरक्षा देण्यासाठी अमेरिका, कॅनडा आणि अनेक पश्चिम युरोपीय राष्ट्र यांनी वर्ष १९४९ मध्ये ‘उत्तर अटलांटिक करार संघटना’ (नाटो) स्थापन केली.) रशियाच्या या दीड लाख सैनिकांची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे युक्रेन लढाईची सिद्धता करत आहे आणि ते योग्यही आहे. या पार्श्वभूमीवर ‘अनेक देशांचे सैनिक युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी पोचले आहेत’, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
२. ‘रशिया युक्रेनवर आक्रमण करील’, अशी भीती अमेरिकेला वाटणे आणि त्यात तथ्य असणे
रशियाचे युक्रेन सीमेवर प्रचंड मोठे सैन्य उभे आहे. दुसरीकडे रशियाने युक्रेनच्या क्रिमिया या भागावर आक्रमण करून त्याला यापूर्वीच त्याच्या बाजूने वळवले आहे. ‘सोव्हिएत संघातून बाहेर पडलेले देश हे पाश्चात्त्य (युरोपीय) देशांना मिळू नयेत’, अशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची दादागिरी आहे. यासाठी ते साम, दाम, दंड आणि भेद अशा पद्धतींचा वापर करतात अन् त्या देशांना ‘नाटो’कडे जाण्यापासून घाबरवतात. त्यामुळे पूर्वानुभवानुसार रशिया अचानकपणे आक्रमण करुन युक्रेनला त्याच्या अधीन करून घेईल, असे अमेरिकेला वाटते.
‘नाटो’ची लढाई करण्याची क्षमता असली, तरी त्यांच्याकडे तसे करण्याचे धाडस नाही. त्यामुळे वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवावा, असे ‘नाटो’च्या फ्रान्स आणि जर्मनी या देशांना वाटते; पण रशिया अन् चीन हे वाटाघाटी किंवा मुत्सद्देगिरी यांनी सरळ होणारे देश नाहीत. त्यामुळे ‘रशिया युक्रेनवर आक्रमण करील’, अशी भीती अमेरिकेला नक्कीच वाटते आणि त्यात पुष्कळ तथ्यही आहे.
३. रशियाने ‘फॉल्स फ्लॅग युद्धा’ची सिद्धता करणे; पण त्याने तसे न करण्यासाठी अमेरिकेकडून त्याच्यावर दबाव आणण्याची शक्यता असणे
रशिया ‘फॉल्स फ्लॅग’ युद्धाची सिद्धता करत असावा, अशी अमेरिकेची शंका आहे. ‘फॉल्स फ्लॅग’ हे ‘ग्रे झोन वॉरफेअर’चे अजून एक शस्त्र आहे. ‘ग्रे झोन वॉरफेअर’ म्हणजे जेथे युद्धही नाही आणि शांतताही नाही. ‘फॉल्स फ्लॅग’प्रमाणे रशिया असा कांगावा करील की, युक्रेनचे सैनिक त्याच्यावर आक्रमण करत आहेत. त्यामुळे तो आत्मरक्षणासाठी त्यांना प्रत्युत्तर देत आहे.’ म्हणजेच युक्रेनच्या सैनिकांनी आक्रमण केले; म्हणून रशिया युद्ध चालू करू शकतो. अशा प्रकारच्या कारवाया रशियाने यापूर्वीही केलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिका आणि ‘नाटो’ यांना भीती वाटते आणि ती रास्त आहे.
असे असले, तरी आता अशा प्रकारे ‘फॉल्स फ्लॅग’चे आक्रमण करणे तितके सोपे राहिलेले नाही. जगातील अनेक उपग्रह युद्धभूमीवर लक्ष ठेवून असतात. याखेरीज तेथे विविध गुप्तहेर संस्था आणि शोध पत्रकारिता करणारे पत्रकार यांचेही लक्ष असते. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गुप्त माहिती मिळवण्याची पद्धती ही अतिशय प्रगत झालेली आहे. त्यावरून लढाई होणार कि नाही ? हे आपल्याला फार पूर्वीच कळू शकते. त्यामुळे अशा प्रकारचे ‘फॉल्स फ्लॅग’ आक्रमण करणे सोपे नाही. अशा प्रकारच्या ‘फॉल्स फ्लॅग’ युद्धाचे रूपांतर लढाईमध्ये करण्याची शक्यता सध्या अल्प आहे. रशियाने अशा प्रकारच्या कारवाया करू नये, यासाठी अमेरिकाही त्याच्यावर (रशियावर) दबाव टाकत राहील.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
४. रशिया-युक्रेन युद्धाच्या सावटाचा जगावर होत असलेला परिणाम !
युद्ध होईल तेव्हा होईल; पण सध्या ‘ग्रे झोन वॉरफेअर’ची लढाई चालू आहे. त्याचा असा परिणाम झाला आहे की, अमेरिका आणि ‘नाटो’ यांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेनमधून परत बोलावले आहे, तसेच युक्रेनशी व्यापार थांबवला आहे. युक्रेनमध्ये गेलेले पर्यटकही परत आलेले आहेत. बंदुकीची एकही गोळी न सोडता अन् तोफा आणि रणगाडे यांचा वापर न करताही त्यांचे नागरिक युक्रेनमधून पळून गेले आहेत. त्यामुळे लढाई न करताही रशियाला एक मोठा विजय मिळाला आहे. केवळ या ‘ग्रे झोन वॉरफेअर’मुळे युक्रेनची आर्थिक स्थिती अतिशय वाईट होत चालली आहे. आज युरोप आणि अन्य देश यांना ४० टक्के ऊर्जा, वायू आणि तेल हे रशियाकडून पोचवले जाते. येणार्या काळात रशिया त्यांना अधिक प्रमाणात वायू आणि तेल देणार आहे. आता या परिस्थितीमुळे रशिया आणि युरोप यांच्यात जे आर्थिक संबंध निर्माण होणार होते, त्याला विराम मिळेल. जोपर्यंत ही युद्धाची शक्यता संपत नाही, तोपर्यंत युरोपीय देश आणि रशिया यांच्यात ऊर्जेसाठी होणारा करार थांबेल.
५. रशिया-युक्रेन युद्धाला जागतिक स्वरूप येण्याची शक्यता असणे
सध्या जे ‘ग्रे झोन वॉरफेअर’ चालले आहे, ते जागतिक आहे. एका बाजूला रशिया आणि चीन, तर दुसर्या बाजूला अमेरिका अन् नाटोची इतर राष्ट्रे आहेत. त्यामुळे याला अप्रत्यक्षरित्या जागतिक स्वरूप आलेलेच आहे. जर खरोखरचे युद्ध झाले, तर दोन्ही बाजूच्या देशांचे सैन्य समोरासमोर येऊ शकते. त्यामुळे थोड्याफार कमी अधिक प्रमाणात तेथे जागतिक युद्धाचा धोका निर्माण झालेला आहे. असे असले, तरी येथे पुन्हा एक सांगणे आवश्यक आहे की, अशा प्रकारचे ‘ग्रे झोन वॉरफेअर’ करणे, ही रशियाची सवय आहे. अमेरिकेचे खरोखरचे युद्ध करण्याचे धाडस नाही. ‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही रशियावर प्रचंड आर्थिक निर्बंध लादू’, असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक निर्बंध लादण्याखेरीज अमेरिका दुसरे काही करील, याची शक्यता अल्प आहे. अर्थात् अमेरिका शस्त्रास्त्रे पुरवेल; पण युद्धात सहभागी होण्याची शक्यता फार अल्प आहे.
६. या युद्धात भारत रशियाची बाजू घेईल का ?
‘भारताने अमेरिका आणि पाश्चात्त्य (युरोपीय) देश यांची बाजू घ्यावी’, अशी सूचना अमेरिकेने नुकतीच केली होती. रशिया आक्रमण सिद्धतेची कारवाई करत आहे. भारताचे अमेरिका आणि युरोपीय देश यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांची बाजू आपण घेऊ शकतो; परंतु सध्या भारताने असा निर्णय घेतलेला आहे, ‘भारत त्याविषयी फारसे बोलणार नाही आणि मतप्रदर्शनही करणार नाही.’ भारताने एवढेच म्हटले आहे, ‘होऊ घातलेले युद्ध हे मुत्सद्देगिरीने किंवा संयुक्त राष्ट्रांच्या साहाय्याने थांबवले जावे; कारण जर हे युद्ध झाले, तर ते सर्व जगासाठी धोकादायक आहे.’ दोन्ही बाजूचे देश भारतावर दबाव टाकतील; पण अशा वेळी भारताने स्वतःचे राष्ट्रीय हित जपायला पाहिजे. भारताने कुणाचीही बाजू घेऊ नये. संयुक्त राष्ट्राला यात ओढून त्यांना यावर लक्ष ठेवण्यास सांगितले पाहिजे.
७. युद्धाची शक्यता वाटली, तर भारत सरकारने युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणावे !
अलीकडे सहस्रावधी भारतीय विद्यार्थी युक्रेन अणि रशिया या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यांना वाटते की, त्यांच्यावर विदेशी शिक्षणाचा शिक्का असेल, तर त्यांना चांगल्या नोकर्या मिळू शकतील. आजच्या घडीला १८ सहस्रांहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. खरे पहाता भारतातील शिक्षण युक्रेनहून अधिक चांगले आहे; परंतु आपल्या विद्यार्थ्यांना विदेशाची ओढ एवढी अधिक आहे की, त्यामुळे ते तेथे पोचले आहेत.
आलेल्या वृत्तानुसार प्रत्येक आठवड्याला ‘एअर इंडिया’ची २ विमाने युक्रेनला जातील आणि विद्यार्थ्यांना आणतील. एका विमानातून अधिकाधिक २०० ते २५० विद्यार्थी येऊ शकतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आणणे सोपे नसून त्यासाठी प्रचंड व्यय येईल. भारत सरकार विद्यार्थ्यांना परत आणण्याची सिद्धता करत आहे; पण क्षमता वाढवायची असेल, तर भारताला हवाई दलाचे साहाय्य घ्यावे लागेल. मला अशी खात्री आहे की, सरकार एकूणच सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या काय परवडणारे आहे, याचा पूर्ण अभ्यास करून सरकार योग्य तो निर्णय घेईल. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. युद्ध होण्याची शक्यता नाही, हे मी यापूर्वीही म्हटले आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते; म्हणून अमेरिकेसारखे पळून जायचे, हे काही योग्य नाही. त्यामुळे आपण परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि ‘खरोखरंच युद्ध होईल, असे वाटले’, तर विद्यार्थ्यांना तेथून आणण्याचा वेग वाढवावा अन् त्या सर्वांना तेथून परत आणावे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.
‘फॉल्स फ्लॅग’ म्हणजे काय ?‘फॉल्स फ्लॅग’ ही अशी एक सैन्य कारवाई असते, जेथे एक देश गुपचूपपणे मुद्दामहून स्वत:ची संपत्ती आणि मनुष्य यांना हानी पोचवतो; परंतु जगासमोर असे सांगतो की, त्याच्या शत्रू देशाने असे केले आहे. त्या आडून अशी हानी करून घेणारा देश त्याच्या शत्रू देशावर आक्रमण करतो. |