‘गुरु स्थुलातून निराळे असले, तरी गुरुतत्त्व एकच असते’, याची श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी साधिकेला आलेली प्रचीती !

२३ फेब्रुवारी २०२२ या दिवशी श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकटदिन आहे. त्यानिमित्त…

श्री गजानन महाराज (शेगाव)

१. श्री दुर्गादेवीचा नामजप करत असतांना अकस्मात् ‘गण गण गणात बोते’, असा नामजप चालू होणे

‘५.३.२०२१ या दिवशी दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. सुमनमावशी (पू. (श्रीमती) सुमन नाईक) नामजप करत होत्या. त्या वेळी मी तेथे बसून श्री दुर्गादेवीचा नामजप करत होते. ३० मिनिटे झाल्यावर माझा हा नामजप अकस्मात् थांबला आणि माझा आतून ‘गण गण गणात बोते’, असा नामजप चालू झाला. ‘माझ्या आतून ४ – ५ पुरुष हा नामजप मोठ्या आवाजात करत आहेत’, असे मला जाणवत होते.

२. माझ्याकडून हा नामजप ५ – ६ वेळाच झाला आणि मी भानावर आले. ‘मी कधी श्री गजानन महाराज यांची साधना केली नाही, तरीही माझ्याकडून हा नामजप कसा झाला ?’, असे मला वाटले. तेव्हा मला काहीच समजत नव्हते. नंतर मी लक्षपूर्वक श्री दुर्गादेवीचा नामजप करू लागले.

सौ. सुजाता रेणके

३. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना ‘श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन आहे’, असे समजणे

मी संध्याकाळी ६.४५ वाजता दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यासाठी हातात घेतले. पहिल्या पृष्ठावर ‘आज श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे’, असे मी वाचले. ते वाचतांना माझी भावजागृती झाली. मला काही ठाऊक नसतांना ‘माझा ‘गण गण गणात बोते’, असा नामजप का झाला ?’, हे माझ्या लक्षात आले.

४. कृतज्ञता

त्या वेळी मला प.पू. गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता वाटली. गुरुदेव नेहमी सांगतात, ‘‘स्थुलातून गुरु निराळे असले, तरी गुरुतत्त्व एकच असते.’’ प.पू. गुरुदेवांच्या कृपेने महान संतांच्या प्रकटदिनाच्या दिवशी त्यांच्या तत्त्वाची मला अनुभूती घेता आली.

‘हे गुरुदेवा, या सामान्य जिवाला किती मोठी अनुभूती दिलीत. त्याबद्दल माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत. देवा, असे महान गुरु या जिवाला लाभले, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक