अपघातस्थळी पोचण्यासाठी केंद्रस्तरीय यंत्रणा उभारा !
अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या सूचना
प्रशासनाला उशीरा आलेली जाग ! मोठ्या प्रमाणात अपघात घडून अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर जागी होणारी प्रशासकीय यंत्रणा उपजिल्हाधिकार्यांच्या सूचनांचे त्वरित पालन करेल का ? असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
सोलापूर, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – रस्ते अपघात झाल्यास पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी समन्वयाने काम करायला हवे. सर्वांच्या समन्वयासाठी आणि अपघातस्थळी लवकर पोचण्यासाठी एक केंद्रस्तरीय यंत्रणा उभी करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जाधव बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस्.आर्. शिंदे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे महेश येमुल, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता ए.पी. देवकाते यांच्यासह समितीमधील सदस्य उपस्थित होते.
या वेळी जाधव यांनी सांगितले की, रस्त्यावर अपघात घडल्यानंतर सर्व विभागाची यंत्रणा ४८ घंट्यांच्या आत घटनास्थळी पोचून अपघात घडल्याचे कारण जाणून घेतात. पुन्हा त्याठिकाणी अपघात घडू नये, यासाठी कार्यवाही करतात; मात्र अपघात घडल्यानंतर घायाळ झालेल्यांना त्वरित साहाय्य लाभले, तर त्यांचे प्राण वाचू शकतात. यासाठी सर्व विभागाच्या सहकार्याने एक केंद्रबिंदू मानून यंत्रणा उभी करायला हवी. या यंत्रणेकडे रुग्णवाहिका, क्रेन आणि अन्य आवश्यक साधने असायला हवीत.