कठीण परिस्थितीत गुरुदेवांशी अनुसंधान ठेवून साधनेचे प्रयत्न करणार्‍या आणि गुरुकृपेने यजमानांच्या मृत्यूसमयी स्थिर रहाणार्‍या श्रीमती कल्पना केसकर !

कठीण परिस्थितीत गुरुदेवांशी अनुसंधान ठेवून साधनेचे प्रयत्न करणार्‍या आणि गुरुकृपेने यजमानांच्या मृत्यूसमयी स्थिर रहाणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील श्रीमती कल्पना केसकर (वय ७२ वर्षे) !

‘वर्ष २०१७ ते वर्ष २०२१ या ४ वर्षांत मला अनेक कठीण प्रसंग आणि परिस्थिती यांना सामोरे जावे लागले. मी सर्व प्रसंगांत माझी हतबलता देवाला सांगत असे आणि तोच त्यावर मार्ग काढत असे. त्या काळात ‘प्रार्थना आणि कृतज्ञता’, हेच माझे साधन होते. गुरुदेवांची कृपा आणि त्यांची शिकवण यांमुळेच या प्रसंगांत मी तरून गेले. यजमानांच्या आजारपणात त्यांची सेवा करतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीमती कल्पना केसकर

१. यजमानांच्या रुग्णाईत स्थितीत अनुभवलेली गुरुकृपा

१ अ. चांगल्या आधुनिक वैद्यांची भेट होणे : वर्ष २०१७ मध्ये आम्ही नवीन ठिकाणी रहायला गेल्यावर आम्हाला तेथील चांगल्या आधुनिक वैद्यांविषयी माहिती नव्हती. नंतर परिचितांनी आम्हाला एका आधुनिक वैद्यांविषयी (डॉ. ओसवाल यांच्याविषयी) सांगितले. ते घरी येऊन यजमानांना तपासून जायचे. त्यांच्या औषधांचा गुणही चांगला यायचा.

१ आ. देवाने घरातील कामे आणि रुग्णाइत व्यक्तींचे औषधपाणी करणे, यांसाठी शक्ती देणे : यजमान आणि दीर यांना कोणत्याही कामाची सवय नव्हती. मलाही वयोमानामुळे स्वयंपाक करणे, कपडे धुणे, घरातील आवराआवर, सर्वांचे औषधपाणी, या गोष्टी सातत्याने करणे क्षमतेबाहेरचे होते. तेव्हा देवानेच मला शक्ती देऊन आणि वेळप्रसंगी साहाय्य देऊन या सर्व गोष्टी शेवटपर्यंत करण्याची संधी दिली अन् समाधानही दिले.

१ इ. स्वयंसूचना सत्रे करू लागल्यावर सेवाभावाने यजमानांची सेवा करणे जमू लागणे : वर्ष २०१७ पासून यजमानांना लघवी-शौच लागल्याचे कळत नसे. त्यांच्या कपड्यांना अनेक ठिकाणी मल लागल्याने बरीच स्वच्छता करावी लागत असे. त्यांचे कधी कधी एकाच दिवशी ५ – ६ कपडे खराब होत असत. त्यांचे कपडे खराब झाले, तरीही ते सांगत नसत. ते त्यांच्यासाठी आणलेली ‘कमोड चेअर’, लघवी पात्र, ‘डायपर’ (अंथरुणातून उठण्याची क्षमता नसणार्‍या रुग्णांसाठी घालायची चड्डी) या सुविधांचा वापर करत नसत. त्यामुळे आरंभी माझी चिडचिड होत असे. नंतर मी ‘यजमानांना समजून घेणे’ आणि ‘स्वीकारण्याची वृत्ती’ यांवर स्वयंसूचना सत्रे करू लागले. काही मासांनी मला परिस्थिती स्वीकारता येऊन सेवाभावाने यजमानांची सेवा करणे जमू लागले. माझी चिडचिड झाल्यास यजमानांची क्षमायाचना करणे आणि त्यासाठी प्रायश्चित्त घेणे मला जमू लागले.

१ ई. कुटुंबीय आणि साधक यांनी केलेल्या साहाय्यामुळे कठीण काळातही साधनेत सातत्य रहाणे : वर्ष २०१९ पासून लहान दीर आणि मुलगा यांचे आजारपण, तसेच अन्य त्रास यांसाठी आम्ही नामजपादी उपाय करत होतो. त्याचा मला पुष्कळ लाभ झाला. ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सकाळचा सामूहिक नामजप यांमुळे माझ्या साधनेत सातत्य राहिले. मुलगी, जावई (श्री. प्रवीण नाईक), नातवंडे कु. आर्य (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) कु. प्राजक्ता (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मुलगा गजानन, आप्तेष्ट आणि साधक यांनी आजपर्यंत केलेल्या साहाय्यामुळेच या २ वर्षांच्या कठीण काळात मी तग धरू शकले. देवानेच या सर्व रूपांतून मला साहाय्य केले.

१ उ. देवाच्या कृपेने यजमानांना परिस्थितीची जाणीव होणे : दळणवळण बंदी असतांनाही यजमान त्यांच्या लहान भावाला घेऊन बाहेर जायचे. त्यांना थांबवणे मला अशक्य होते. नंतर देवानेच त्यांना हळूहळू परिस्थितीची जाणीव करून दिली आणि त्यांनी बाहेर जाण्याचा हट्ट थांबवला. यजमानांना अकस्मात् लागलेली सिगारेट ओढण्याची सवयही याच काळात नकळत सुटली. ही देवाचीच कृपा होती.

१ ऊ. यजमान घरात पडूनही त्यांना रुग्णालयात भरती करावे न लागणे : यजमानांना ‘वयामुळे विस्मरण होणे, शारीरिक क्षमता न्यून होणे, ऐकू न येणे, मधुमेह, असे शारीरिक त्रास, त्यातच हटवादी स्वभाव’, यांमुळे मला यजमानांवर सतत लक्ष ठेवावे लागायचे. ते ३ वेळा घरात चालतांना भिंतीचा अंदाज न आल्याने पडले आणि त्यांच्या डोक्याला खोक पडली. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला; परंतु थोड्या औषधोपचाराने जखम भरली. ईश्वरी कृपेनेच त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले नाही.

१ ए. सेवाभावाचे महत्त्व लक्षात येऊन यजमानांच्या संबंधित प्रत्येक कृती अधिकाधिक मनापासून करण्याचा प्रयत्न होणे : यजमानांचे निधन होण्याच्या ८ मास आधी यजमानांना ऐकू येणे जवळपास बंद झाले होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना ‘खुणेने सांगणे, स्पर्श करून लक्ष वेधून घेणे, हळूहळू सांगणे’, असे करावे लागे. त्यांना जेवतांना अन्न बारीक करून द्यावे लागत असे. मला कधीकधी या कृती करण्याचा कंटाळा येत असे; परंतु लगेच सेवाभावाची आठवण होऊन प्रत्येक कृती अधिकाधिक मनापासून करण्याचा प्रयत्न होत असे.

२. यजमानांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. यजमानांच्या मृत्यूनंतर डॉ. ओसवाल यांनी त्वरित मृत्यूचा दाखला देणे : यजमानांचे निधन झाल्यानंतर डॉ. ओसवाल यांना बोलावले असता ते लगेच आले. त्यांनी त्वरित मृत्यूचा दाखलाही दिला. त्यामुळे आमची पुढील धावपळ टळली. काही जणांच्या बाबतीत मृत्यूचा दाखला मिळण्यात पुष्कळ अडचणी आल्याचे मी ऐकले होते. गुरुकृपेनेच आम्हाला डॉ. ओसवाल यांचे पुष्कळ सहकार्य लाभले.

२ आ. यजमानांच्या निधनानंतर ‘गुरुमाऊलीने यजमानांचा लिंगदेह स्थूलदेहापासून वेगळा केला’, असे वाटणे : यजमानांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताही त्रास जाणवत नव्हता. ‘ते झोपले आहेत’, असेच वाटत होते. ‘जणूकाही गुरुमाऊलीने अलगदपणे त्यांचा लिंगदेह स्थूलदेहापासून वेगळा केला’, असे मला वाटले.

२ इ. यजमानांच्या निधनानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी विचारपूस करणे, त्यांनी सांगितल्यानुसार दत्ताचा नामजप करणे आणि वातावरणात जडपणा न जाणवणे : यजमानांचे निधन झाल्यानंतर मला सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा भ्रमणभाष आला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी १० दिवस दत्ताचा नामजप केला. घरात भ्रमणभाषवर दत्ताचा नामजप लावूनही ठेवला होता. आम्ही प्रतिदिन श्रीरामरक्षा म्हणत होतो आणि गरुड पुराण ऐकत होतो. त्यामुळे वातावरणात जडपणा नव्हता.

३. कृतज्ञता आणि प्रार्थना

गुरुमाऊलीची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा आणि त्यांनी दिलेली शिकवण यांमुळे यजमानांचे जाणे मला सहजतेने स्वीकारता आले. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘श्रीमन्नारायणाच्या चरणी यजमानांना विसावा मिळो. यजमानांच्या निधनाने निर्माण झालेल्या पोकळीत ईश्वराच्या नामाचे चैतन्य भरून उरावे आणि मिळणारा वेळ भावभक्ती वाढवण्यासाठी सत्कारणी लागावा’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

– श्रीमती कल्पना केसकर, पुणे

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक